Type to search

अग्रलेख फिचर्स संपादकीय

नेत्यांची थोरवी आणि रामलल्लाची प्रतीक्षा

Share

‘1992 पासून कोणीही श्रीरामलल्लाची पूजा, प्रसाद आणि वस्त्रे-प्रावरणे यांची चिंता केली नाही. यासाठी निधीची तरतूद वाढवली नाही. श्रीरामलल्लाकडे वस्त्रांचे अठ्ठावीसच जोड आहेत. ते पुरेसे नाहीत. पूजाअर्चा, प्रसाद, पुजारी, मदतनीस आणि सेवेकरी यांचे वेतन असा महिन्याकाठी एक लाखांचा खर्च येतो. ते बिल कोणाला द्यायचे याचे अद्याप आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे तो खर्च देणार कोण हे कळत नाही’ अशी खंत अयोध्येतील श्रीरामलल्लाचे मुख्य पुजारी सत्येंद्र दाव यांनी व्यक्त केली आहे.

अयोध्येतील राममंदिर हा देशात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या विवादाचा निकाल दिला असला तरी या विषयात देशातील जनतेला विलक्षण रस आहे. अयोध्या प्रश्नावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजली. पुढारपण मिरवले. देशभर प्रसिद्धी मिळवली. सत्ताही उपभोगली. तथापि ही सारी कृपा ज्या रामलल्लाने केली त्याचीही नेत्यांनी आश्वासनावरच बोळवण केली. अयोध्येतील राममंदिर कसे व कोणत्या शैलीत बांधले जाईल? सभामंडप वातानुकूलित असेल का? याविषयी नेते लंब्याचौड्या गप्पा मारतात. अयोध्या विवाद मिटला असला तरी रामलल्लाचे नाव घेतल्याशिवाय अनेकांना आपल्या कामात आणि भाषणात ‘राम’ वाटत नाही त्याच राजकारण्यांनी रामलल्लाकडे इतके दुर्लक्ष करावे? देशातील जनतेला वारंवार तीच ती आश्वासने दिली जातात. रस्ते नीट बांधू, चोवीस तास पाणी पुरवू, मुलांना नोकर्‍या देऊ अशी अनेक आश्वासने नेते देतात. त्या बदल्यात जनतेने मताचे दान आपल्या पदरात टाकावे अशी नेत्यांची अपेक्षा असते.

अयोध्येतील रामल्ललाने नेत्यांच्या पदरात प्रसिद्धी आणि सत्ता टाकली, पण नेत्यांनी त्या बदल्यात रामलल्लाला काय दिले? अठ्ठावीस दिवस त्याला तेच-तेच कपडे घालावे लागतात. प्रसाद म्हणून रोज भाजी, पोळी आणि खीर खावी लागते. उपवासाच्या दिवशी फक्त फलाहारावर समाधान मानावे लागते. त्याची पूजा करणार्‍यांना वेतन कोण देणार याची चिंता त्याला का करावी लागते? देशातील नेत्यांचे मोठेपण असे की, नेत्यांच्या कर्तृत्वामुळे सध्या विराजमान असलेल्या रामलल्लांच्या हातात मात्र आश्वासने पूर्ण होण्याची वाट पाहण्याशिवाय सध्यापुरते तरी राजकारणी आणि नेत्यांनी दुसरे काही ठेवलेले नाही. त्यात नेत्यांची तरी काय चूक? फक्त जनतेची चिंता वाहणे एवढे एकच काम त्यांना असते का? त्यांच्या खांंद्यावर देशाचा भार असतो.

कुटुंबाच्या सात पिढ्यांचे कल्याण साधायचे असते. त्यामुळे नेत्यांची आश्वासने कधीही गंभीरपणे घ्यायची नसतात. हे आता श्रीराम असो अथवा श्रीकृष्ण; त्यांनी लक्षात घेतले तर बरे! हाच संदेश राममंदिराचे मुख्य पुजारी देऊ इच्छित असावेत का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!