Type to search

अग्रलेख फिचर्स संपादकीय

शपथ देखाव्यापुरती नसावी

Share

राज्यात पाच दिवसांचा आठवडा करण्याची सरकारी सेवकांची मागणी राज्य सरकारने अखेर पूर्ण केली. या निर्णयाची अंमलबजावणी परवा सुरू झाली. आता पाच दिवसांत अधिक कार्यक्षमता दाखवून कामे उरकण्याची जबाबदारी सरकारी सेवकांवर आली आहे. त्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून सर्व सरकारी अधिकारी व सेवकांना त्यांच्या कार्यालयात एक शपथ देण्यात आली. ‘कार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा वा सुट्यांमुळे जनतेच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. सर्व ऊर्जा, सर्जनशीलता व उत्साहाने वैभवशाली नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

वचनांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जनतेचे सेवक म्हणून आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे स्वीकारत आहोत. तशी हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत’ अशी ही शपथ आहे. सर्व सरकारी सेवकांनी ती गांभीर्यपूर्वक घेतली असेल अशी अपेक्षा जनतेने करावी का? मार्च महिन्याचा आज पहिला सोमवार! सरकारी कामकाजाचा व पहिल्या आठवड्याचा पहिला दिवस! शपथ घेतल्यानंतर आजपासून तसा अनुभव येईल अशी जनतेला अपेक्षा आहे, पण तसे खरेच होईल याची खात्री कोण देणार? सरकारी सेवकांना शपथ देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

केंद्रीय दक्षता आयोगाने 2014 पासून ‘भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह’ पाळण्यास सुरुवात केली. ‘आम्ही लाच घेणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही’ अशी शपथ त्यावेळी देशभरातील सर्व सरकारी सेवकांना दिली गेली होती. त्या शपथेचे काय झाले? किती सरकारी सेवक त्या शपथेशी प्रामाणिक राहिले? किती सरकारी कार्यालये भ्रष्टाचारमुक्त झाली? उलट गेल्या पाच वर्षांत पकडल्या गेलेल्या लाचखोरांची भरमसाठ संख्या पाहता सरकारी सेवकांनी घेतलेली शपथ किती पोकळ होती हेच त्यांनी सिद्ध केले. लाचेशिवाय कोणतेही काम सरकारी कार्यालयात होत नाही हे वास्तव कोण नाकारणार? किंबहुना आपले काम करून घेण्यासाठी लाच देणे हाच प्रजेचा धर्म आहे असे वाढत्या भ्रष्टाचाराने सिद्धच होते. लाचखोरीत पकडले गेलेले बहुतेक सरकारी सेवक निर्दोष सुटतात.

पूर्वीच्याच जागी किंवा बढतीवर रुजू होऊन नव्या दमाने व नव्या जोमाने खाबुगिरी सुरू करतात. शपथा घेतल्या तरी त्या पाळायच्या नसतात याची सरकारी सेवकांना खात्री असावी. त्यामुळेच शपथा घ्यायला ते सदैव तयारच असतात. पुढे मात्र ‘मोले घातले रडाया…’! शपथा घेऊन विधिमंडळात जाणारे लोकप्रतिनिधी तरी घेतलेल्या शपथेचे किती कसोशीने पालन करतात? शपथा घेणे सर्वच पातळ्यांवर केवळ उपचार बनला आहे. तोंडाला पाने पुसण्याचाच हा देखावा नाही का? पाच दिवस कामाच्या वेळेत सरकारी सेवक जागेवर बसून प्रामाणिकपणे लोकांची कामे निरपेक्षपणे पार पाडतील, असा अनुभव मराठी प्रजेला येईल तो सुदिन लवकर उगवेल का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!