Wednesday, April 24, 2024
Homeअग्रलेखविज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी…

विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी…

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) तरुणाईत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘युविका’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सुटीच्या दिवशी तरुणांना अंतराळ विज्ञान व भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची माहिती दिली जाते.

श्रीहरीकोटा येथे अग्निबाणाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी दहा हजार लोक बसतील, अशी व्यवस्था केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून ‘इस्त्रो’च्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना तेथे घेऊन जावे, असे आवाहनही मोदींनी केले. ‘युविका’त ‘जय विज्ञान व जय संशोधन’ हा दृष्टिकोन अवलंबला गेल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी ‘इस्त्रो’च्या उपक्रमाला जी दिशा दिली ती अत्यावश्यक आहे. ‘इस्त्रो’ने नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

- Advertisement -

अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या स्वयंसेवी संस्थादेखील वेगळ्यारितीने वैज्ञानिक दृष्टिकोनाला पूरक कामच करीत आहेत. तथापि भारतीय समाजावरील अंधश्रद्धांचा पगडा कमी का होत नाही? अनेक गोष्टींतील विरोधाभास कायम आहे. ग्रहणे पाहायला लोक गर्दी करतात, पण असंख्य लोक ग्रहणकाळात नदीपात्रात उभ्याने जप करण्यातही गुंतलेले आहेत. एकविसाव्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही पौर्णिमा-अमावस्या म्हटल्यावर लोक थबकतात. एखादे काम त्या दिवशी करायचे की नाही या संशयात पडतात. रस्त्याने जाताना काळे मांजर आडवे गेल्यास चार पावले मागे जातात. चेटकीण व जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून महिलांची हत्या होते. कोणताही तर्कसंगत विचार न करता समाज तथाकथित बाबा, बुवा, महाराज व बापूंच्या कच्छपी लागतो.

आसाराम नावाच्या स्वयंघोषित महाराजाला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली तुरुंगात डांबावे लागते. तरीही त्याच्या तथाकथित भक्तांचे डोळे अजून मिटलेलेच! विज्ञान तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टींची उकल होत आहे. तरी अनेक जुनाट व कालबाह्य रुढी-परंपरांचे जोखड भारतीय समाजाच्या मानेवर घट्ट बसलेलेच आहे. भारत ‘विश्वगुरू’ बनेल असे उच्चरवात बोलले जाते. तथापि अंधश्रद्धांच्या पगड्यामुळे देश ‘विश्वशिष्य’ तरी होईल का? असा प्रश्न विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना पडत असेल.

विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून त्यांच्यातील संशोधकवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी ‘इस्त्रो’ने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्यास विद्यार्थी चिकित्सक बुद्धीने जुनाट व कालबाह्य रुढी-परंपरांमागचा कार्यकारण भाव शोधू लागतील. जादूटोणा, नरबळी, काळी जादू, जारणमारणविद्या आदी अनेक अंधश्रद्धांमागचे सत्यशोधनाचे प्रयत्न करतील. सरकार व सामाजिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांबरोबरच विद्यार्थी चिकित्सक झाल्यास समाजाच्या धारणा वेगाने बदलतील. विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीला हातभार लावणार्‍या ‘इस्त्रो’च्या उपक्रमांचे अनुसरण ‘इस्त्रो’सारख्या विज्ञाननिष्ठ अन्य संस्थांनीदेखील करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या