Type to search

अग्रलेख फिचर्स संपादकीय

पुन्हा नागरिकशास्त्राचे प्राथमिक धडेे !

Share

कोरोना, स्वाइन फ्लूसारखे संसर्गजन्य रोग समाजजीवनातील नागरिकशास्त्राचे महत्त्व वारंवार पटवून देत आहेत. कोणतेही काम सुरू करताना हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पाळणे, खोकताना व शिंकताना रुमाल वापरणे, नम्रतेने वागणे अशा छोट्या-छोट्या सवयींमुळे करोना, स्वाइन फ्लूसारख्या साथींच्या रोगांचा संसर्ग टाळता येऊ शकतो, हे नव्याने जनतेच्या मनावर बिंबवले जात आहे. तथापि अशा सवयींबद्दल कधीकाळी प्राथमिक शिक्षणात अभ्यासक्रम होता त्याची आठवण करून देण्याची वेळ का आली? सुजाणपणाचे संस्कार करणारे नागरिकशास्त्र केव्हा व का हद्दपार झाले?

नागरिकशास्त्र शिकवायची आणि सुजाण नागरिक घडवण्याची जबाबदारी विस्मृतीत गेली आहे. उत्तम व्यक्ती घडवण्यास कारणीभूत ठरणार्‍या नागरिकशास्त्राचे महत्त्व फक्त 10-20 गुणांपुरतेच मर्यादित कोणी केले? नागरिकशास्त्र हा फक्त अभ्यासाचा नव्हे तर अंगी बाणवण्याचा विषय आहे हे मुलांच्या मनावर बिंबवावे लागते याचाच विसर कसा पडला? त्यामुळेच बहुतेक मुले फक्त परीक्षेच्या आधल्या दिवशी नागरिकशास्त्राचे पुस्तक उघडतात व त्या विषयाचा पेपर झाल्यावर पुस्तक अडगळीत जाऊन पडते, अशी आजची परिस्थिती आहे. मुलांवर सुजाणपणाचे संस्कार करण्याची जबाबदारी पालक विसरले आहेत. त्यामुळे ही जबाबदारी शाळांंनी पार पाडावी ही अपेक्षा कशी रास्त ठरणार?

घरात आणि समाजात कसे वागावे? स्वच्छता कशी पाळावी? अशा अनेक गोष्टींची रुजवण करण्यात अभ्यासक्रमातील पुस्तकांनी कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही पुस्तके पुरवणी वाचनात समाविष्ट हवीत. सांगलीचे उद्योजक वि. रा. वेलणकर तथा धनी वेलणकर यांनी काही वर्षांपूर्वी ‘जगात वागावे कसे?’ या पुस्तकातून अनेक गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या होत्या. सभ्यपणे कसे बसावे? कसे वागावे? इथपासून अगदी केळे कसे खावे? शौचालयाचा वापर कसा करावा? अशा नित्याच्या गोष्टींचा उहापोह त्यांनी या पुस्तकात केला आहे.

सचित्र गोष्टींमधून सामाजिक वर्तनाच्या पद्धती समजावून सांगणारी गीता प्रेसची छोटी-छोटी पुस्तकेसुद्धा उल्लेखनीय आहेत, पण गेल्या दोन दशकांत वाचनसंस्कृती लोप पावत आहे. पालक वाचन करणारे असतील तर मुलांची आपोआपच पुस्तकांशी दोस्ती होते. आज किती पालक अवांतर वाचन करतात? मुले वाचणार नाहीत व पालकांना त्यांच्याशी गुणात्मक संवाद साधण्यास वेळ नाही. मग कसे घडणार सुजाण नागरिक? तथापि कारणे कितीही सबळ व महत्त्वाची वाटत असली तरी नागरिकशास्त्राला दुर्लक्षून आणि सुजाणपणाशी फारकत घेऊन देश पुढे जाणार नाही, हाच संदेश एरव्ही घातक ‘करोना’ व्याधीने दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!