Type to search

Featured अग्रलेख फिचर्स संपादकीय

ग्रामीण कार्यकर्त्याचा गौरव

Share

दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असल्याने भाजपचे उमेदवार डॉ. अशोक उईके यांनी माघार घेतली. विरोधकांनी सूज्ञपणा दाखवला. ‘झाकली मूठ’ कायम ठेवली. आमदार झिरवाळ यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांचे अभिनंदन केले. त्यांना उपाध्यक्षपदी आसनस्थ केले.

‘विरोधक डाव्या बाजूला बसतात. म्हणून डावीकडे जरा जास्त लक्ष द्या’ अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. तो धागा पकडून झिरवाळ यांनी धमाल केली. ‘सतत मोबाईलवर बोलण्याच्या सवयीने मला डाव्या कानाने कमी ऐकू येते’ असे झिरवाळ यांनी आभार भाषणात सांगितले व सभागृहात हास्यकल्लोळ झाला. भाजपच्या साडेतीन दिवसांच्या सत्तानाट्यावेळीसुद्धा झिरवाळ यांचे नाव चर्चेत आले होते.

राज्यात सरकार स्थापण्याच्या तयारीत असलेल्या महाविकास आघाडीला ‘जोर का झटका’ बसला होता. त्यावेळच्या शपथविधीचे साक्षीदार आमदार झिरवाळही होते. मात्र नाट्यमय घडामोडीनंतर ते आघाडीच्या गोटात सामील झाले. त्यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास व्यक्त केला. तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या झिरवाळ यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र औटघटकेच्या बंडखोरीमुळे मंत्रिपदाची त्यांची संधी हुकली, अशा बातम्याही आल्या होत्या. आघाडी स्थापनेवेळच्या वाटाघाटीत विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. या पदावर कोण विराजमान होणार याची आघाडीत उत्सुकता होती. मात्र काही दिवसांपासून या पदासाठी झिरवाळ यांच्या नावाची चर्चाही होती. ती अखेर फलद्रूप झाली.

आदिवासी समाजातून पुढे आलेल्या झिरवाळ यांची या पदासाठी पक्षनेतृत्वाने निवड केली. त्यामुळे वंचित समाजासाठी काम करणार्‍या ग्रामीण कार्यकर्त्याचा उचित सन्मान झाला आहे. झिरवाळ यांनी काहीकाळ तहसील कार्यालयात कारकून म्हणून सरकारी सेवा केली आहे. नंतर नोकरीला राम-राम ठोकून ते व्यवसायात आले, पण अपयश आल्याने बांधकाम मजूर म्हणूनही त्यांना राबावे लागले, पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

स्व. माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे ते स्वीय सहायक होते. सरपंचपदापासून झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नंतर आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष अशी त्यांच्या यशाची सतत चढती कमान राहिली आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक ही त्यांची ओळख आहे. झिरवाळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला प्रथमच विधानसभा उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरहरी झिरवाळ यांचे ‘देशदूत’तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!