Wednesday, April 24, 2024
Homeअग्रलेखसारस्वतांकडून अपेक्षाभंग होऊ नये !

सारस्वतांकडून अपेक्षाभंग होऊ नये !

‘माणसाचे माणूसपण टिकवायचे काम मातृभाषाच करते. मातृभाषेपासून समाज दूर जाता कामा नये. माणसे जितकी जास्त शिकतात तितकी जातीयवादी होत असावीत का? ही शंका दिवसेंदिवस बळावत आहे. साहित्यिकच एखाद्या धर्माचे प्रतिनिधी वा वकील बनून लिखाण करू लागले तर ते साहित्य संकुचित ठरेल. त्यातून नवा भारत घडवण्याची प्रेरणा कशी मिळणार?’ असे प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी उपस्थित केले आहेत.

समाजातील भेदाभेद आणि समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा असल्याची जाणीव तीव्र होत आहे. याची कारणे नव्याने सांगायची आवश्यकता नाही. समाजात कट्टरतावाद फैलावू नये, माणसा-माणसांत जाती आणि धर्माच्या नावाखाली दरी निर्माण होऊ नये व समाज एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न करण्याची मुख्य जबाबदारी राजकीय नेत्यांची आहे याची जाणीव त्यांना नसेल असे कसे म्हणावे? आपल्या विखारी विधानांनी समाज कट्टरतावादाच्या गर्तेकडे धावत आहे याची जाणीव बोलक्या नेत्यांना नक्कीच असावी. तथापि स्वार्थी राजकारणाची पट्टी त्यांनी डोळ्यांवर बांधून घेतली आहे.

- Advertisement -

‘साहित्यात दहशतवाद निर्माण झाला आहे’ अशी भीती ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढार्‍यांचा पदर धरणार्‍या अनेक मराठी सारस्वतांनी त्या पुढार्‍यांचेच अनुकरण का करावे? चांगला माणूस आणि समाज घडावा हा साहित्याचा हेतू असला पाहिजे. खरे तर प्रत्येक धर्माच्या उभारणीमागे तोच हेतू सगळ्या धर्मांच्या संस्थापकांनी बाळगला आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, चोखोबा, गोरा कुंभार, समर्थ रामदास स्वामी, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, जनाबाई, सखूबाई, कान्होपात्रा आदी अनेक संतांच्या साहित्याने मराठी सारस्वत समृद्ध केले आहे. केवळ विधायक दृष्टिकोन हाच त्या सर्व साहित्यात आढळणारा समान धागा आहे. म्हणून त्या साहित्यातील माणुसकी पिढ्यान् पिढ्या मराठी मनात रुजलेली आहे. अन्य भारतीय भाषांमध्येसुद्धा हाच प्रकार आढळतो.

त्या साहित्यातूनच कोल्हापूरचे शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महर्र्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी अनेक समाजसुधारकांना प्रेरणा मिळाली. साहजिकच साहित्यिकांच्या साहित्यातून मानव धर्माचा आविष्कार जनतेला अभिप्रेत आहे. दुर्लक्षित झालेले साहित्य अल्पजीवी ठरते. चोखंदळ वाचक अशा साहित्यापासून दूरच असतात. लोकशाही राज्य पद्धतीत एनकेनप्रकारेण सत्ता हस्तगत करण्यासाठी उद्युक्त झालेले नेते चांगला समाज घडवणे ही जबाबदारी सपशेल टाळतात. त्यामुळेच साहित्यिकांबद्दलचा आदर वाढतो. त्यांच्याकडून भरकटलेल्या समाजाला नवी जाणीव देणार्‍या साहित्याची अपेक्षा आहे. रामदासजी फुटाणे आणि रा. रं. बोराडेंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांची चिंता नव्या दमाचे मराठी साहित्यिक समजून घेतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या