Type to search

अग्रलेख फिचर्स संपादकीय

भाषाविषयक धोरणे कालसंगत हवीत !

Share

‘आदिवासी समाजातील लाखो लोक आजही दारिद्य्र व भूकबळीसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून नवनवीन उपकरणे शोधून आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही काम करणे सुुरुवातीला सोपे नसतेच. लोकबिरादरी प्रकल्पात सुरुवातीच्या काळात वीज, पाणी व रस्त्यांचा अभाव असल्याने कामाची वाटचाल अत्यंत खडतर होती. आदिवासींची भाषा वेगळी! त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचणी यायच्या. मग स्थानिक आदिवासींची भाषा आणि मराठी भाषा यांचा एक छोटा शब्दकोष तयार केला. त्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यामुळे आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपचार करणे सोपे झाले’ असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले आहे.

कुष्ठरोगी आणि माडिया आदिवासींमध्ये आमटे परिवाराचे मोठे काम आहे. आमटे परिवाराची तिसरी पिढी हे कार्य नेटाने पुढे नेत आहे. आपल्या क्षेत्रातील अनुभवाचा आधार घेऊन अशी माणसे जेव्हा समाजाला सल्ला देतात व समस्यांवर मात करण्याचे मार्ग सुचवतात तेव्हा त्यांचे कानमंत्र समाजाने संवेदनशीलतेने ऐकले पाहिजेत. ते अमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमटे दाम्पत्याला माडिया भाषा येत नव्हती. तथापि त्यांनी त्याबद्दल माडिया भाषेला अथवा ती भाषा बोलणार्‍या आदिवासींना जबाबदार धरले नाही. मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून आदिवासींना बोल लावला नाही. त्यांनी माडिया भाषा शिकून घेतली. बोलीभाषांच्या बाबतीत हाच व्यापक दृष्टिकोन समाजाने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अनेक बोली बोलल्या जातात.

पूर्वी राज्याच्या मराठी मुलखाच्या सीमा बर्‍याच आकुंचित होत्या. आजच्या सात-आठ जिल्ह्यांइतक्याच आकारमानाची काही राज्ये होती. अहमदनगर, सोलापूर असे आजच्या मराठी मुलखातील अनेक जिल्हे राज्यात समाविष्ट नव्हते. इतिहास बदलत गेला तशा मराठी मुलखाच्या सीमा विस्तारल्या. असंख्य बोलीभाषा एकत्र आल्या. ‘बारा कोसात भाषा बदलते’ (‘कोस’ म्हणजे साधारण दोन मैल) असे म्हणतात. याला आजही समाजमान्यता आहे. गणेश देवी हे भाषा संशोधक व अभ्यासक आहेत. त्यांच्या संशोधनानुसार राज्यातील किमान चाळीसहून जास्त बोलीभाषा मृत्युपंथाला लागल्या आहेत. फक्त भाषा मरत नाहीत.

भाषेबरोबर त्या-त्या भागाचा इतिहास आणि संस्कृती नष्ट होते. लोकसाहित्याचा आणि मौखिक साहित्याचा ठेवा नष्ट होतो. या ठेव्याची जपणूक करण्याचे काम आमटे परिवार तसेच मेळघाट परिसरात डॉ. कोल्हे दाम्पत्याने प्रत्यक्ष आचरणातून करून दाखवले आहे. बोलीभाषांकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन सर्व समाजाने स्वीकारायला हवा. आता महाराष्ट्राचा नितांत अभिमान असलेले राज्यकर्ते सत्तेवर आहेत. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी हा दृष्टिकोन सामावून घेणारी धोरणे त्यांनी तयार करावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!