पैठणीची ‘श्रीमंती’ जिवंत ठेवण्यासाठी….

पैठणीची कित्येक वर्षं जुनी कलाकुसर जिवंत ठेवण्यासाठी गेली चाळीस वर्षं झटणाऱ्या कसबी माणसाची कथा!

0

जरतारी, कशिदाकारी, वेगवेगळ्या रंगसंगतीची पैठणीची ‘श्रीमंती’ मोहून टाकते. तलम, मुलायम, वेगळ्या धाटणीच्या सुंदर नक्षीदार साड्यांमधली महाराणीच जणू पैठणी! ही साडी मूळची पैठणची असली तरी नाशिकमधील येवला तालुका पैठण्यांसाठीच ओळखला जातोय.

येवल्यातच बालपण घालवलेले कृष्णदास बाजीराव रासने हे तब्बल चाळीस वर्षं हातमागावर पैठण्या विणत आहेत. निवृत्तीचं वय झालं तरी ही परंपरा पुढं नेण्यासाठी पुढच्या पिढ्यांनाही घडवत आहेत.

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी रासने यांच्या वडिलांचं निधन झालं. १९६३ साली त्यांनी सरकारी प्रशिक्षण शाळेत सुतारकाम, लोहारकाम, वीणकाम यांचं प्रशिक्षण घेतलं. त्याबद्दल त्यांना २५ रुपये मानधनही मिळत असे. त्यानंतर हातमागावर साड्या आणि शाली विणण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं ते अद्यापही चालू आहे.

१९७७-७८ साली औरंगाबादमधील पैठणला जाऊन सरकारी पैठणी केंद्रात हिमरू शाली विणण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि रीतसर शालीही विणायला सुरुवात केली. त्यानंतर पोटापाण्यासाठी या व्यवसायात १५ वर्षं गॅप घेऊन भिवंडी इथं नोकरी केली.

त्यावेळी त्यांचे काही सहकारी म्हणाले, ‘‘तुम्ही इतकी चांगली पैठणी विणता, मग नोकरी का करता?’’ त्यानंतर १९९७ साली त्यांनी कल्याणला पैठणी विणण्याचा कारखाना उभा केला. रासने सांगतात, ‘‘कारखान्यासाठी मला दहा हातमाग विकत घ्यावे लागले. याच दरम्यान दिल्लीला प्लॅन इंटरनॅशनलतर्फे भरलेल्या प्रदर्शनात माझ्या पैठणीला दुसरं पारितोषिक मिळालं.’’

मुलाचं लग्न झाल्यावर ते नाशिकला परतले. साल होतं, २००७-०८. चालू कारखाना बंद करून परतणं जिवावर आलं होतं. ते सांगतात, ‘‘मी सर्व हातमाग कारागिरांच्या सुपूर्त केले आणि आजही त्यातील काही कारागीर या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात.’’ सतत कलाकुसर करण्यात आयुष्य गेल्यामुळे नाशिकला आल्यावर आडगाव परिसरात राहत्या घरी पुन्हा हातमागावरील कामाला सुरुवात झाली.

रासने यांचं छोटं दुमजली घरच आता पैठण्यांचं माहेरघर झालंय. तीन-चार महिलांनाही त्यांनी या कामात तरबेज केलंय. चांदी वापरून तयार केलेल्या साडीपासून रेशमी-जरतारी पैठण्यांपर्यंत सर्व गोष्टींची बांधणी इथं होते. साडीचा काठ जेवढा मोठा तेवढी किंमत भारी.

एक साडी विणायला एका व्यक्तीला तीन महिने इतका कालावधी लागतो. कष्टही खूप असतात. त्यामुळं साहित्य, मजुरी धरून एका साडीची किंमत किमान ४५ हजार रुपयांपासून ते काही लाखांपर्यंत आहे.

या साड्यांना शंभर वर्षांची गॅरंटी आहे. येवल्यातील दुकानदार, नाशिक-औरंगाबाद येथील शोरूम हे त्यांचे ग्राहक आहेत. हातमागावरील साडी आणि यंत्राद्वारे विणलेली साडी यातील फरक दाखवत असताना मूसळ पैठणीचा दर्जा बनावट, सेमी साड्यांमुळे झाकोळला जात असल्याची खंत ते व्यक्त करतात.

बंगलुरूहून येणारं रेशीम, सुरतला तयार होणारी जर, त्याचा धागा तयार करण्यासाठी जुन्या सायकलपासून तयार केलेल्या चरख्यावर तयार केलेला बारीक रेशमी धागा ही त्यांच्या साड्यांची वैशिष्टय आहेत. चरख्यावर, कोनवर भरलेल्या रेशमाच्या लट्यांची कलाकुसरही इथं पाहायला मिळते. वर्षाला १३ ते १४ साड्या तयार करणाऱ्या रासने यांच्याकडं पुणे, मुंबई, बंगळुरूतून पैठणीची ड्रेस मटेरियल तयार करण्याची मागणीही वाढते आहे. कला जिवंत ठेवण्यासाठीची त्यांची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.

 – शिल्पा दातार-जोशी

 

LEAVE A REPLY

*