‘मस्त’च की हो!

कष्टातून उभारलेल्या छोटेखानी उद्योगाबद्दल सांगत आहे उद्योजक किरण चिंतामण बावीस्कर

0

‘कुरकुरीत जवस तोंडात टाकला किंवा हळद-मीठ लावलेली बडीशेप खाल्ली की तोंडातून उद्गार बाहेर पडतात’ मस्त. आपण आपल्या उत्पादनाचं ब्रँड नेम हेच का ठेवू नये? अशा विचारातून आम्ही अतिशय खडतर परिस्थितीशी लढा देऊन ‘मस्त’ची बारा उत्पादनं बाजारात आणली आहेत. अर्थातच त्याची चव, दर्जा आणि नैसर्गिक तत्वांमुळे आमचा प्रवास विस्तारतोय.

आयुष्याशी झगडा करत मी उद्योजक कधी झालो ते कळलंच नाही. ‘पाण्यात पडलं की पोहता येतं’, ही गोष्ट माझ्याबाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली. शून्यातून वर येण्यासाठी बऱ्याच कसरती कराव्या लागल्या, त्या करत गेलो. कधी निराशही झालो; पण हरलो नाही. हा लढा अजूनही चालूच आहे. लढत असताना आकाशाला गवसणी घालण्याचा उद्देश आहे.

आमचं पेठ रोड इथं किराणा मालाचं पिढीजात दुकान होतं. हे दुकान काही कारणाने बंद पडलं. आता उदरनिर्वाहाचंच साधन नसल्यावर कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. त्यासाठी मी माझा ज्याच्याशी आजपर्यंत कधी संबंध आला नव्हता असे व्यवसाय- नोकऱ्याही केल्या. ग्राफिक डिझायनिंग केलं, एका स्थापत्यविशारदांकडं नोकरी केली; पण मूळ पिंड व्यवसायिकाचा असल्यानं त्यामध्ये मी रमलो नाही.

प्रचंड नैराश्य आलं. माझ्या घराच्या जवळ काही गाळे होते, तिथं माझ्या पत्नीनं पिको-फॉल शिवण, इतकंच नाही तर साडीचंही दुकान सुरू केलं. त्यासाठी गाठीशी शेवटचे दहा-वीस हजार रुपये शिल्लक होते, ते भांडवल म्हणून वापरले. तरीही यश येत नव्हतं. आयुष्यात कोणताही प्रयत्न केला तरी आपण कुठं कमी पडतोय, ते कळत नव्हतं. मार्ग दिसत नव्हता. पुन्हा नैराश्य आलं. जेव्हा आपल्याला टोकाचं नैराश्य येतं तेव्हा सगळं संपलं असं होत नाही; कुठूनतरी काहीतरी आशेचा झोत येतोच. असंच काहीसं आमच्या बाबतीत घडलं.

माझी पत्नी रुपाली काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. तिथून परत येताना तिच्या आईनं तिला मुखवास तयार करून बरोबर दिला होता. त्याची चव आणि दर्जा इतका चांगला होता की ‘आपण हाच व्यवसाय का करू नये,’ ही कल्पना एकदम चमकली आणि तिथून विचारप्रक्रिया सुरू झाली.

आम्ही सुरुवातीला घरी प्रायोगिक तत्वावर मुखवास तयार केला, यात बडीशेपेचे काही प्रकार आणि रोस्टेड जवस होते. नंतर आही आवळा कँडीसरखी उत्पादनंही सुरू केली. चव आणि दर्जाची गुणवत्ता समजण्यासाठी सुरुवातीला हे पदार्थ आम्ही गल्लीत वाटले, घरी येणाऱ्या पाहुण्यांना दिले.

त्यांच्या सूचनेनुसार त्यातील घटकांचे प्रमाण ठरवले. ते अधिक ‘क्रंची’ आणि ‘टेस्टी’ होण्याच्या दृष्टीनं अभ्यास केला. प्रसंगी तज्ज्ञ आणि इंटरनेटचाही त्यासाठी वापर केला. चांगल्या पद्धतीनं भाजलेली ही उत्पादनं असल्यानं ती कुरकुरीत राहिलीच; पण त्यात कोणत्याही प्रकारचं प्रीझर्व्हेटिव्ह घालत नसल्यानं हे पदार्थ पौष्टिक आणि नैसर्गिक तत्वांच्या अनुषंगानं प्रामाणिकही आहेत. तसंच अबालवृद्धांपासून सर्वजण खाऊ शकतात. हृदय, यकृत यांच्यासाठी उत्तम असलेल्या जवसाचाही मुखवास आम्ही तयार केलाय.

काही पदार्थ आमच्या बंगल्यावरील युनिटमध्ये आम्ही स्वतः तयार करतो तर काही पदार्थ आमच्या गुणवत्तेनुसार बाहेरून तयार करून घेतो. पॅकिंग आणि ग्रेडिंग, वितरक शोधणं हे काम आम्हीच करतो. दोन वर्षांपूर्वी ‘मस्त’ हे ब्रँडनेम आम्ही दोघांच्या सहमतीनं घेतलं. कोणताही चवदार पदार्थ खाल्ल्यावर तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडतो ‘मस्त’, तेच आमचं ब्रँडनेम.

आमची १२ ते १५ उत्पादनं नाशिक, पुणे, मुंबईला वितरकांकडे, मॉलमध्ये विक्रीसाठी जातात. तालुकापातळीवरून आम्हाला त्याचा विस्तार वाढवायचा आहे. आम्ही त्यासाठी दिवसातून १६ ते १८ तास काम करतो. ‘मस्त’च्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. आमच्या संसारवेलीवरच्या दोन कळ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यांमध्येही मजल मारण्याच्या तयारीत आम्ही आहोत. एकच सांगावंसं वाटतं, जेव्हा मेहनत करूनही स्वप्नं पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही, कारण झाडं नेहमी पानं बदलतात; मुळं नाही.

(शब्दांकनः शिल्पा दातार जोशी)

LEAVE A REPLY

*