Type to search

कथा : इंजक्शन

दिवाळी - कथा/काव्य

कथा : इंजक्शन

Share

बहुदा सकाळ झाली असावी ! बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांच्या चिवचिवाटावरून ओळखले मी ! आज तशी उठण्याची इच्छाच झाली नाही. सर्व अंग थंड आणि जड पडल्यासारखे वाटतेय. तसा अलीकडे पडूनच असतो. तब्येत ठिक नसते माझी. घरातल्या घरात सुद्धा काही हालचाल करता येत नाही. सर्व गोष्टी एकाच जागेवरुन कराव्या लागतात. कारण आता वय झालंय ना माझं !

तसा दिवसभर या खोलीत एकटाच असतो मी ऽऽ ! नाही म्हणजे ैअधनं-मधनं मुलगे, सुना किंवा नातवंडे यांच्यापैकी कोणीतरी येतो आणि चौकशी करून जातो. चौकशी मात्र लांबूनच करतात हां ! न जाणे या म्हाताऱ्याचा आजार त्यांना लागला तर? तसा अगदी जवळून चौकशी करायला फक्त एकच जण येतो. तो म्हणजे रोज येणारा डॉक्‍टर. दिवसातनं दोनदा येतो आणि ” कश्‍ये आहाऽत आजोबा, बरे व्हाल हां लवकर ‘ असे म्हणून इंजेक्‍शन टोचून जातो.

अरे हे काय? आज सकाळ झाली तरी कोणीच कसे उठवायला आले नाही अजून ! एरवी या वेळेस धाकटा आप्पा किंवा मोठा नाना यापैकी कुणीतरी येतातच. आज कसे नाही आले कुणी? आणि डोळेही आज उघडत नाहीत कसे ते? हातपायही हालवता येत नाहीत.

आज डॉक्‍टरला सांगायला हवं हे सगळं आणि हे काय मग हा गोंधळ कसला ऐकू येतोय. दुरून कुणीतरी रडत असल्यासारखा. म्हातारपणात काय काय सहन करावं लागतं.

तसा मी एकटाच म्हटले तरी चालेल आता. आता मी ज्या अंधाऱ्या खोलीत निजलो आहे, तीही तशी माझ्यासारखीच एकाकी. खरं तर ही आमच्या आजोबांची हवेली ! आजपासून बरोबर 82 वर्षांपूर्वी मी ज्या खोलीत सध्या निजलो आहे त्याच ठिकाणी माझी आई बाळंत झाली… आणि माझा जन्म झाला. बालपण तसे आरामातच गेले माझे. पण मी लाडावलो नाही. तरुणपणातच स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. आई-वडिल, आजोबा-आजी, बहिण-भावंड सर्वांचा प्रेमाने सांभाळ केला.

पूर्वजांच्या हवेलीसमोरच त्याही पेक्षा मोठी अशी नवी हवेली बांधली. माझ्या कर्तृत्वाने आई-बाप धन्य झाले. पण आता या माझ्या उतराई पोरांना त्याचे आहे का काही? आजारी पडल्यानंतर बापाची अडगळ वाटते म्हणून एकट्यालाच इथे आणून टाकलेय मला.

अरेऽऽऽ ! तुम्ही जेव्हा लहान होता आणि थोडा जरी आजारी पडायचात ना तेव्हा तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपायचो मी आणि तुमची आई तुम्हाला. तुमच्या लहानशा तापासाठीही रात्र-रात्र जागून काढायचो आम्ही !… अन्‌ आता मात्र…! नालायक निघालात रे पोरांनोऽऽऽ!

दुरून येणारा आवाज वाढलाय बहुतेक. अगदी माझ्या खोलीत असल्यासारखा येतोय. पण तरीही क्षीण वाटतोय. आणि हे काय कुणीतरी अगदी माझ्या जवळ बसल्यासारखे वाटतेय. आणि रडतच असावेत.

अरे, अरेऽऽ! नका रे गलका करु ! या म्हाताऱ्याला स्वस्थ पडू तरी द्या रेऽ! या वयात शांतता म्हणून मिळत नाही आजकाल ! म्हाताऱ्याचा द्वेषच करतात सगळी….

आज मला उठता का येत नाहीये? डोळेही उघडत नाहीत ती ! छातीतही फार शांत आणि थंड वाटतेय आता ! कालच्या रात्री सारखं नाही. कालची रात्र आजही आठवते मला. काल हातापायाला पेटके यायचे. छातीत गलबलून येत होतं म्हणून धाकट्याला ठेवून घेतलं सोबतीला. उत्तर रात्री फारच त्रास झाला. धाप लागली. श्‍वास जवळजवळ थांबलाच. छातीचे ठोके वाढले. पोटात कसेसेच होऊ लागले आणि जीव घाबरा झाला.

‘आप्पा, अरे आप्पा, मी ओरडलो,’ थोड्याच वेळात सगळे धावून आले. डॉक्‍टरही आला असावा बहुतेक ! कारण मोठी सुनबाई म्हणत होती ; “” डॉक्‍टर देऊन टाका न “ते’ इंजेक्‍शन त्यांना बघा ना किती त्रास होतोय… या इंजेक्‍शनमुळे त्यांची सुटका तरी होईल या त्रासातून ”. धाकट्या आप्पाने बहुदा विरोध केला असावा. तो म्हणत होता, ” पण मी ते इंजेक्‍शन नाही देऊ देणार त्यांना… त्यांनी किती त्रास काढला आपल्यासाठी आणि आपण असे वागायचे म्हणजे..’

” अरे! मग त्यांना अशाच त्रासात ठेवणार का कायम, डॉक्‍टर द्या ते इंजेक्‍शन’, इति मोठा. शेवटी ते इंजेक्‍शन दिले असावे. मला टोचल्यासारखे वाटले. मग छान गार झोप लागली. नाहीतरी अलिकडे त्रास वाढलाच होता माझा. जीवाला शांतता अशी ती नव्हतीच. बरं केलं ते इंजेक्‍शन दिलं…. आणि म्हणून मला आज असे छान थंड वाटतेय ! पण मग हालचाल तर काहीच कशी करता येत नाहीये?

“तूप चोळा म्हणजे वास येणार नाही ‘ कुणीतरी बोलतंय बहुतेक ! असे कसलं तुप, कसला वासऽ काही कळत नाही ! आणि हे काय माझ्या अंगाला हे काय चोळतंय कोणी. अरे तुपंच की हे! अरे अरेऽ हे काय चाललंय. म्हाताऱ्याची चेष्टा करताय की काय?

आवाज आता वाढत चाललाय. खूप माणसं आजूबाजूला जमली असावीत. पण माझे डोळे का उघडत नाहीयेत?

“पाणी तापलंय? झाली सर्व तयारी ! आणा बाहेर त्यांना ‘ असे काहीसं बोलतंय कुणी? अरेऽऽऽ हे कायऽऽ मला उचलंत कशासाठी? आधी मी म्हातारा म्हणून इथे आणून टाकले आणि आता मला बाहेर फेकून देता की काय? अरे हे काय चाललेय?

“बसवा त्यांना पाटावर…धरा रे त्याबाजूने कुणीतरी… सांभाळून… पाणी घाला’… काय काय ऐकायला येतंय. अरे हे काय अंगावर गरम पाणी का टाकताय माझ्या. जीवाचे हाल चालवलेत रे.. बहुतेक मला आंघोळ घालत असावेत. पण मग मला उठता का येत नाही आणि डोळेही उघडता येत नाहीत. पण एक चांगले झाले की मला आंघोळ घातली. डॉक्‍टरने सांगितली असावी बहुदा! नाहीतरी मला अवघडल्यासारखंच झालं होतंऽ आता आंघोळीने बरं वाटेल.

मला झोपवतेय कुणीतरी. पण हे अंगाला टोचतयं का? आणि माझे हातपाय असे का बांधताय? अरेऽ आप्पाऽऽ, अरे नानाऽऽ हे काय चाललेय ! असहाय म्हाताऱ्याचा खेळ चालवलाय का रे हा. कुणीतरी बघा रेऽ हे काय चाललेय ते !

मी आता बऱ्याच वेळापासून शांत पडलोय. आवाजही आता कमी झालेत. पण असे मंत्रांसारखे ध्वनी मात्र कानावर पडतायेत. या वयात काय काय भास होतात. आऽ आईऽ आऽऽ ईऽऽऽऽऽ गं ! अरे हे काय तोंडाला चटका का दिला कोणी? आता मात्र फार झालं ! म्हाताऱ्या माणसाचा आवाज दाबण्यासाठी चक्क त्याला चटका? कुठे फेडाल रे हे पाप तुम्ही…. आणि माझ्या अंगावर हे जड ओझं कसलं ते? काही तरी उबदार आणि गरम लागतेय. बापरे? खूपच उष्णता वाटतेय. जळाल्यासारखी? कुऽ कुठून आली ही उष्णता, सर्व अंगभर पसरतेय ती माझ्या आणि, आणि माझ्या डोक्‍यापर्यंत आली ही आगऽ ! आऽऽ वाचवा ! आईऽऽ आऽऽऽऽईऽऽ आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ….. !

 

(……आणि मोठ्याने “फट ‘ असा आवाज होतो. ” कवटी फुटली वाटतं’ उपस्थितांपैकी कुणीतरी बोलतं… “आप्पा, नाना, बस्स करा आता’ आता परतायला हवं’ आणखी कुणीतरी बोलतं…. हळू हळू त्याठिकाणी शांतता पसरते, प्रचंड शांतता! भयाण शांतता!! मृत्यांगणातली स्मशान शांतता!!!.)

-पंकज जोशी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!