Type to search

दुग्धव्यवसायाचा ‘सूर्योदय’!

Diwali Prerana Special

दुग्धव्यवसायाचा ‘सूर्योदय’!

Share
शेती करत असतानाच राजेंद्र कळमकर यांनी दुधाचा जोडव्यवसाय उभा केला. गुणवत्ता आणि चव यामुळे तो इतका विस्तारला की ‘सर्योदय’ या ब्रँडनेमने कळमकर यांनी दुधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही सुरू केली, तीही त्यांच्या स्वतःच्या दुकानांमधून! त्यांच्या या कामामुळे त्यांना कृषिरत्न हा पुरस्कारही मिळाला आहे. त्याबद्दल त्यांची मुलाखत!

 

प्रश्नः तुम्ही शेतात कोणती पिकं घेता?

कळमकरः नाशिक जिल्ह्यात मोहाडी येथे माझी राहत्या घराजवळच चाळीस एकर शेती आहे. मळ्यात द्राक्षंबाग, टोमॅटो, ढोबळी मिरची, कारली या पिकांची आम्ही लागवड करतो. शेतकऱ्याला खूप काबाडकष्ट करूनही दरमहा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याइतके पैसे मिळतील याचीही शाश्वती नसते. फसवणुकीच्याही शक्यता असतात. अशावेळी नैराश्य येतं. माझ्याही बाबतीत असंच घडलं. २००९ साली एकानं मला ५० ते ६० लाख रुपयांना फसवलं. आता खायचं काय, हा प्रश्न होता. माझं संपूर्ण घर शेतीवर अवलंबून असल्यानं मी शेतीला त्याच्याशीच पूरक जोडव्यवसाय करायचं ठरवलं.

प्रश्नः तुम्ही कोणता जोडव्यवसाय निवडला?

कळमकरः २०११ साली शेतीला पूरक म्हणून मी दुग्धव्यवसाय निवडला. सुरुवातीला गीर आणि अन्य जातीच्या पाच गायी घेतल्या. याद्वारे हमखास उत्पन्न मिळेल, घरखर्च चालेल, याचा विचार केला. नंतर वाढत जाऊन माझ्याकडच्या गायींची संख्या दीडशे झाली. कालांतराने द्राक्षशेतीसाठी गायींची संख्या कमी केली. ४० एकर क्षेत्रावर सध्या साठच्या आसपास गायी आणि पंचवीस वासरं आहेत.

विविध ऋतूंमध्ये गायींची निगा कशी राखता?

– पहाटे चार वाजता आमच्या कामाची सुरुवात होते. आमच्या गोठ्यात गायींसाठी मोकळी जागा भरपूर आहे. त्यांना नैसर्गिक सावली देणारी मोठाली झाडं आहेत. गायींसाठी वेगळ्या जागेची व्यवस्था आणि वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधली आहे. त्यांना रोज सकाळी-संध्याकाळी अंघोळ घातली जाते. तसंच त्यांच्यासाठी काही प्रमाणात चारा शेतातच लावला आहे. काही चारा बाहेरून विकत आणला जातो. उन्हाळ्यात सुका चारा साठवून ठेवला जातो. गोठा कोरडा राहील, गायींना आजार होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घेतली जाते. पावसाळा आणि हिवाळ्यात गोठा ऊबदार राहील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात तसंच उन्हाळ्यात सावलीच्या व्यवस्थेबरोबरच शॉवर्सही गोठ्यामध्ये बसवले आहेत. गायींचं दूध काढण्यासाठी डिलावल कंपनीचं यंत्रही घेतलं आहे. तसंच यंत्राद्वारे दुधाच्या निर्जंतुकीकरणाचीही व्यवस्था केलेली आहे. स्वच्छताआणि चांगला दर्जा कायमच राखला गेल्यानं ग्रेडिंगची गरज पडत नाही.

प्रश्नः दुधाची विक्री कुठं होते? इतर पदार्थांबद्दल…

कळमकरः गोठ्यापाशी आमची स्वतःचीच डेअरी आहे. तिथून दूध सुरतला ‘अमूल’साठी पुरवलं जातं. अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्यामुळे आमच्या डेअरीमध्ये बाहेरच्या गावातूनही लोक दूध खरेदी करण्यासाठी येतात. दुधाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असली तरी ते उरतंच! उरलेल्या दुधापासून खवा तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचं यंत्र आणलं. ते लोकांना चवीसाठी दिल्यावर इतकं आवडलं की ‘सूर्योदय ब्रँड’ अंतर्गत त्याचीही विक्री सुरू झाली. ताजा आणि चांगल्या दर्जाचा खवा असल्यानं त्याची किंमत थोडी जास्त असली तरी ग्राहक मिळाले. त्यानंतर श्रीखंड, दही, रसगुल्ला, गुलाबजाम, लस्सी हे पदार्थही आम्ही आधुनिक पद्धतीनं यंत्राद्वारे तयार करू लागलो. तूप मात्र रीतसर विरजण लावून, ताक करून आणि लोणी कढवून तयार केलं जातं. रवाळ घरगुती चवीच्या गावरान तुपालाही मागणी वाढत गेली. सांगलीच्या एका ग्राहकाने ४० लिटर तूप नेलं. आम्ही स्वतःची दोन दुकानं (नाशिक आणि मोहाडी) सुरू केली. माझे भाऊ इथल्या विक्रीची व्यवस्था पाहतात.

प्रश्नः प्रायोगिक तत्वावर तुम्ही दुग्धव्यवसाय सुरू केला. उत्कृष्ट दर्जामुळे त्याचा व्याप वाढलाय. याबाबत आपण काय सांगाल?

कळमकरः मी शेतकरी म्हणून शंभर टक्के प्रामाणिक आहे, शेती आणि दुधाच्या व्यवसायातही. गरज आहे, तेवढेच पदार्थ तयार करतो. चव, दर्जा आणि स्वच्छता याबाबत तडजोड करत नाही. म्हणूनच आमचा व्याप वाढला आहे. तो आणखी वाढेल हे अपेक्षित आहे. त्याबाबतची गणितं तयार आहेत.

 मुलाखतः शिल्पा दातार जोशी

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!