Type to search

तिरंगा, राष्ट्रगीत आणि ‘गोल्ड’

Diwali Prerana Special

तिरंगा, राष्ट्रगीत आणि ‘गोल्ड’

Share

अंगात १०२ ताप. डॉक्टरांनी मनाई केली. पण मनातलं सुवर्णपदक स्वस्थ बसू देईना..काही झालं तरी स्पर्धेत उतरायचंच.. गोल्ड मिळवायचं गोल्ड…. मूळचा चांदवडचा आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ सांगतोय २४ ऑगस्ट १८ ला जाकार्ता येथे झालेल्या स्पर्धेचा थरारक अनुभव…

‘ऑगस्ट महिन्यातील 19 तारखेला जकार्ता पालेमबंगचं वातावरण तसं फारच दमट होतं. अंगाची लाही-लाही होण्याइतपत उन आणि गरम हवा. त्या दिवशी सकाळी बोट पाण्यात टाकली. मनोमन देवाला नमस्कार केला. अंग कणकण करत होतं, पण काही नाही एवढं.. असा विचार करत ओर्सचा जैक लावला आणि लेन मध्ये बोट उभी केली…’

‘रेड़ी अटेंशन गो असा आवाज होताच’, रेस सुरु झाली.

सुरुवात तर चांगली झाली पण शेवटचे 500मी बाकी असताना एक आवाज झाला आणि काही कळायच्या आत ओर्स जैक पासून बाजूला झाला. जैक तुटला होता. आठ महीने ज्यासाठी मेहनत केली ती सगळी वाया जाताना बघत होतो.

प्रतिस्पर्धी खेळाडू डोळ्यासमोर मला मागे टाकत पुढे जात होते. काही सुचत नव्हतं. उद्विग्न मनाने रेस पूर्ण केली 6वा क्रमांक घेतला. तशीच बोट बाहेर घेतली. भरभरून ताप आला. अंगात आधीपासून कणकण होती पण आता मात्र अशक्तपणा देखील जाणवायला लागला.

चार दिवसांनी फोर स्कलचा सांघिक सामना होता आणि बाकी तीनही खेळाडू अगदीच व्यवस्थित होते मीच फक्त तापाने फणफणत होतो. रूम मध्ये आल्यावर कोच ने ताप बघितला आणि थोडं जोरातच म्हणाला, “कल अगर मैच हारा तो उस हार की वजह तुम होंगे और जीता तो उस जीत की वजह बी तुम ही होंगे.”

थोड़ शांत झालो. चहा घेताना विचार करत होतो. आता बस्स फक्त जिंकायचंच आणि घ्यायच तर गोल्डच.. एवढं नक्की केलं.

या आशियाई स्पर्धेसाठी जानेवारी पासून तयारी सुरू केली होती. या पूर्वी कोरिया मधील इंचीऑन येथील आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी तर फक्त एक वर्षाच्या सरावावर तिथे पोहचलो होतो. अशा स्पर्धेसाठी नवखा असल्याने शेवटचे 250 मी साठी थोडं सटकलो आणि तेव्हा द्वितीय क्रमांक म्हणजेच रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी तर सराव होता अनुभव होता भीती निघून गेली होती. चौघांमध्ये को-ऑर्डिनेशन चांगलं झालेलं होतं. सारं काही व्यवस्थित होतं, फक्त नव्हती ती तब्येतीची साथ. पण अस्तित्वाचा प्रश्न असल्यावर तब्येतीवर मात करून जिंकाव तर लागणारच होतं.

आमच्या चौघांमधील राजस्थानचा 27 वर्षीय ओमप्रकाश, पंजाबचे 28 वर्षीय सुखमीत सिंह व 24 वर्षीय स्वरण सिंह आणि मी दत्तू. पैकी मी वैयक्तिक प्रकारात पदक गमावलं होतं आणि ओमप्रकाश आणि स्वरण यांनी दुहेरी प्रकारात पदक गमावलेलं होतं. सगळेच जखमी शेर एकाच बोटीत जमा झाले होते.

व्यवस्थित नियोजन करून सराव केलेला होताच, पण आता निर्णायक सामना जवळ येत होता. वैयक्तिक प्रकारात एकच खेळाडू त्याच्या बोटचा मालक असतो, जिंकला तरी तोच आणि हरला तरी तोच.

यात निर्णय घ्यायला सोपं असतं. तुलनात्मक बघितल्यास सांघिक प्रकारात सामना हा चारही डोक्यांनी खेळावा लागतो. सांघिक प्रकारात फक्त को-ऑर्डिनेशन आणि म्युच्युअल अंडरस्टॅंडिंग यावरच सामना अवलंबून असतो. यात नियोजन आधीच करून ठेवावे लागते. अचानक कोणीच निर्णय बदलू शकत नाही. म्हणून सांघिक प्रकार थोडा अवघड समजला जातो.

आमच्याकरिता या स्पर्धेत सकारात्मक गोष्ट अशी होती की आम्ही चौघे ही पुण्याच्या इंटरनॅशनल आर्मी रोइंग नोड मध्ये सराव करत होतो. प्रत्येकाची मनःस्थिति प्रत्येकाला माहीत होती. त्यामुळे एखादा कमी पडला तर त्याला पुन्हा कशा प्रकारे परत आणायचं याची माहिती प्रत्येकाला झालेली होती. याचाच फायदा आम्हाला त्या सामन्यात झाला.

सामन्याचा दिवस उजाड़ला. दरम्यानच्या काळात 3 दिवस मला झोपच लागली नाही. नक्कीच आपण चुकतोय कुठेतरी, पण कुठे ते समजत नव्हतं. त्यात कोच ने बोललेलं वाक्य आठवत होतं.. ‘हारने की और जितने की वजह सिर्फ तुम रहोगे…’ झोपच उडाली होती. मी नेहमीच स्वतःला आता चुकायचं नाही लढायचं.. सैनिक माघारी जात नसतात ते फक्त लढतात आणि भारतीय सैनिक तर लढतात पण आणि जिंकतात पण हे वाक्य आठवायचो आणि पुन्हा सराव सुरू व्हायचा.

24 तारखेला सकाळी उठलो. ताप कमी झालेला नव्हता. डोक्यात फक्त एक विचार होता गोल्ड घ्यायचंच बाकी नाही. पण तब्येत साथ देत नव्हती. ऊर्जा यावी म्हणून जरा नाश्ता केला. आठ वाजता ग्राउंडवर बॉडी वार्मअप करून बोट घेऊन पाण्यात उतरलो.

चार किमी सराव करून पुन्हा बाहेर आलो. रेस्ट रूममध्ये एक सफ़रचंद खाऊन पाणी घेतले. थोड़ा मसल रिलैक्स घेतला आणि त्यातच झोप लागली. तत्पूर्वी ओमप्रकाशला सांगितल की झोपतो..एक तास आधी उठव. साधारण 50 मिनिट बाकी असताना ओमप्रकाशने झोपेतून उठवलं.

अंगात ताप खूप होता. डॉक्टर ने ताप तपासला आणि सांगितले, “दत्तू, ताप 102 वर आहे. तू खेळू नको असा सल्ला मी देतो कारण खेळला तर तापामुळे मसल फुटतील आणि आता परिस्थिति अशी आहे की मी औषधेही देऊ शकत नाही. बाकी बघ तुझं मन काय सांगतंय..”

माझं मन मला बाकी काही सांगतच नव्हतं, ते फक्त गोल्ड पाहिजे एवढंच म्हणत होत. कारण ज्यासाठी एवढी मेहनत घेतली ती मेहनतच नको होती राहायला आणि कोचनं बोललेलं ते वाक्य.. हारने की वजह…मनात विचार केला होऊन होऊन काय होईल..जे व्हायचं ते होईल..मी भारतमातेचा पूत्र आहे, तिची रक्षा करणारा तिचा सैनिक आहे.

बस्स मग आता ठरलं होतं फक्त निकराने लढायचं.. स्वतःच्या तब्येतीवर मात करत गोल्ड घ्यायचं.

डॉक्टर पासून बाजूला होत बाहेर आलो. बाहेर आम्ही चौघे चहा घेत असताना स्ट्रॅटेजी ठरवली. पहिले पाचशे मीटर कसे..पुढचे 1500 मीटर कसे आणि शेवटचे निर्णायक 500 मीटर कसे.. पुशअप करण्यासाठी स्वरण सिंह आवाज देणार होता आणि शेवटचे पाच दणके(स्ट्रोक) असे काही द्यायचे की सुवर्णच हातात येईल. सगळेच जखमी शेर आता निर्णायक सामन्यासाठी सज्ज झाले होते.

स्ट्रेटेजी नुसार आम्ही निघालो. 45 मिनिटे आधी पाण्यात बोट टाकली.. पाण्यात उतरताना समोरच्या बाजूला आपला तिरंगा कोणीतरी वरती चढ़वत होतं. एका हातात बोट..समोर पाणी..आणि आम्हा चौघांच्या नजरा तिरंग्याकड़े.. आता हां तिरंगा खाली उतरवायचाच नाही. एवढं तर प्रत्येकाच्या मनात आलं असेल. त्या घटनेमुळे खूप ऊर्जा आली. पाण्यात बोट घेऊन वॉर्मअप केला.

मोठ्या आवाजात घोषणा झाली..”INDIA LANE NO.4″ चलो म्हणत स्वरण सिंह ने कॉल दिला.. बरोबर 10:15 वा. बोट स्टार्ट पॉइंट वर लावली. प्रत्येकाने हात जोडून मनोमन त्या विधात्याला अभिवादन केलं, ‘‘ज्यासाठी आजपर्यंत कष्ट घेतले आहे,  त्याची परीक्षा आहे आणि आमच्या कष्टाला फळ मिळू दे..’’

अंपायर ने फर्स्ट कॉल दिला.. रेड़ी रेड लाईट आणि हॉर्न…अटेंशन रेड लाईट आणि हॉर्न…गो म्हणत ग्रीन लाईट आणि हॉर्न वाजला क्षणाचाही विलंब न करता पहिला जोरदार पुश झाला.. डोकं थोडं गरगरत होतं..

500मी ला स्वरण सिंह ने चलो शेरो म्हणत जोरात पूश घेतला..स्वतःला समजावलं अजून 1500 मी फक्त..1000 मी ला ही तेच… अजून अजून थोडं राहिलं.. फक्त स्वरणसिंहचा आवाज..आणि चप्पू पाण्यात मारल्याने पाण्याचा खळखळ आवाज येत होता..

1500 मीटर  4:40 सेकंदात आम्ही इंडोनेशियाला क्रॉस केलं…आणि मग शेवटचे निर्णायक 500 मी.

ठरल्या प्रमाणे शेवटचे पाच स्ट्रोक जोरात द्यायचे होते…झालेही तसेच…आणि शेवटचा तो दणका दिला. वेळ होती 6:17 मिनिटे आणि प्रतिस्पर्ध्याला मागे सारत आम्ही सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली…

घ्यायचं होतं तर गोल्डच आणि घेतलंही…भारतमातेच्या सैनिकांनी लढून विजयश्री मिळविली होती.

आम्हा सैनिकांची स्पर्धा कोणा बाहेरच्या शत्रूंसोबत मुळीच नव्हती. ही स्पर्धा होती स्वतःशी..स्वतःच्या अस्तित्वाची आणि ही स्पर्धा होती मनोबल विरुद्ध शारीरिक क्षमतेची. ज्यात मनोबलाने विजय मिळवला होता.

सगळ्या जखमी शेरांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तिथून जेट्टी वर आलो..डॉक्टर ने पहिले माझे अंग तपासले आणि ताप बघितला..तेव्हा ताप खूपच होता डॉक्टरच्याच् डोळ्यात पाणी आले. पण मनाने मी फार आनंदी होतो.. डॉक्टरने मानेवर गार पाणी टाकले. बर्फ़ाने मान थंड केली.

मग मेडल देण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आले. डॉक्टर ने मला मध्ये नेऊन ऑक्सिजन लावलेला होता. जेव्हा फायनल कॉल आला तेव्हा डॉक्टर बोलले, ‘‘ दत्तू, मेडल घेण्यासाठी बोलवताय..काय करायचं?” ज्या क्षणासाठी एवढी मेहनत केली तो क्षण का जाऊ द्यायचा परत सगळी ताकद लावून उठलो..डॉक्टरच मला हात धरून घेऊन गेले.

तिथे पोहचल्यावर सर्वप्रथम थाइलंडला ब्रॉन्झ, इंडोनेशियाला सिल्व्हर… आणि मग अनाउन्स्मेंट झाली GOLD MEDAL…INDIA सगळा ताप थकवा कुठल्याकुठे पळून गेला. त्यावेळी मनात कोण कोणत्या भावना आल्या? आज विचाराल तर मला शब्दात सांगता येणार नाही. बस्स फक्त छातीवर हात ठेवून त्या जगत्नियंत्याचे आभार मानले. आमच्या सर्वांच्या कष्टाला त्याने फळ दिले होते. मला प्रकर्षाने आठवण झाली ती आई आणि वडिलांची..त्यांना मनोमन नमस्कार केला.

समोर आमचा तिरंगा सर्वात वरती डौलानं फड़कत होता. त्यात राष्ट्रगीत सुरू झाले.. कानात आणि ओठावर राष्ट्रगीत नजर तिरंग्याकड़े आणि हाताला स्पर्श सुवर्णपदकाचा…

शब्दांकन : वैभव सुरेश कातकाडे, नाशिक (MOB : 9595698759)

katkade.vaibhav04@gmail.com

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!