प्रत्येक पंखात भरारी घेण्याचं बळ!

0

घरातल्याच एका दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत प्रयोग म्हणून सुरू झालेला व्यवसाय विस्तारतो आणि परदेशात नावलौकिक मिळवतो. इतकंच नव्हे, तर सॉफ्टवेअर उद्योगासाठी परिचित नसलेल्या शहरात हा व्यवसाय फुलतो, बहरतो. प्रत्येक व्यवसायासाठी त्या व्यवसायातल्या कौशल्याबरोबरच स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासही लागतो, हे नाशिकमधील टेक्नोक्राफ्ट सोल्युशन्स या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक अमित काजळे यांच्याकडं पाहून पडतं.

-शिल्पा दातार जोशी

अमित काजळे हे मूळचे नाशिकचे. नाशिकमध्ये रसायनशास्त्रात बी.एस्सी. झाल्यानंतर अमित यांनी पोस्ट डिप्लोमा इन आयटी हा सामनगावमधून कोर्स केला. त्यावेळी भारतात आयटी उद्योग पसरत होता आणि इथल्या आयटी कुशल लोकांसाठी जागतिकीकरणाची द्वारं खुली होत होती. काळाची पावलं ओळखून हा कोर्स निवडल्याचं काजळे सांगतात.

त्यानंतर त्यांनी पुण्याला जाऊन सीडॅकची परीक्षा दिली आणि तिथं त्यांना प्रवेश मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नाशिकला परतले, पण नोकरी मिळत नव्हती. नाशिकमधील एका कंपनीत २ हजार रुपये पगारावर नोकरी मिळाली. काहीच नाही यापेक्षा ही संधी बरी होती. दोन वर्षांच्या अनुभवानंतर मुंबईमध्ये तीन ते चार महिने काम केलं.

 

तिथून पुण्याला मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असं काजळे सांगतात. त्यांचा अनुभव असा आहे, हे काम करत असताना एकीकडे भारतातील सॉफ्टवेअर व्यावसायिकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याच्या उलटसुलट बातम्या येत असतानाच माझी कंपनी मात्र मला दीर्घकाळासाठी अमेरिकेला पाठवणार होती, तोच मी नोकरी सोडण्याचा आणि नाशिकला येण्याचा निर्णय घेतला!

स्वत:पासून सुरूवात केलेल्या कंपनीचा असा विस्तार झाला.

कंपनीतील कर्मचारीः एक कुटुंब
माझं गाव, कुटुंबीय यांच्याबरोबर राहून फ्रीलान्स पद्धतीनं काम करण्याचा निर्णय घेतल्यावर अमित यांना थोडा विरोध झाला खरा; पण तो त्यांच्यावरील काळजीपोटीच होता. पुण्यात घेतलेल्या घराचा हप्ता, घरात छोटं बाळ या पार्श्वभूमीवर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय जोखमीचा होता.

पुण्यातील घर भाड्यानं दिलं. २००८ साली फ्रीलान्स पद्धतीनं काम करत असताना जुन्या ओळखींचा फायदा झालाच; शिवाय स्वतःला हव्या त्या वेळेत हवं तसं काम करण्याचं स्वातंत्र्य होतं. कामं मिळायला लागली तसा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यातून २००९ साली प्रोप्रायटरी फर्म प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. हाताशी भांडवल काहीच नव्हतं. कंपनीत काम करण्याचा अनुभव होता पण कंपनी चालवण्याचा अनुभव नव्हता.

माझ्याकडं एक छोटी खोली, स्वतःचा लॅपटॉप, एक पीसी आणि बीएसएनएलचं इंटरनेट एवढीच सामग्री होती. कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर अमित यांचा मित्र संतोष जाधव मोठ्या पगाराची नोकरी सोडून अमित यांच्याकडे पार्टनर म्हणून काम करू लागला. त्यावेळी त्यांच्या छोटेखानी ऑफिसमध्ये जुनी टेबलं, दोन लॅपटॉप आणि पीसी होता. उन्हाळ्याच्या काळात लॅपटॉप तापत असत आणि अचानक बंद पडत म्हणून कूलरची, काही संगणकांची सोय केली. अशा सोयी पैसे हातात पडतील तशा होत गेल्या.

नेदरलँड्‌समधील क्लाएंटसमवेत

कंपनीची कामं वाढत गेली तशी मनुष्यबळाची गरज लागली. डिग्री घेतलेले अनेक जण आले आणि गेले; पण त्यांना काम करता येईना, हा अनुभव आला. आम्ही एका खोलीत सात जण काम करायचो. त्यामुळे अडचण होऊ लागली. मग आम्ही भाड्यानं मोठं ऑफिस घेण्याचा निर्णय घेतला, असं काजळे सांगतात.

चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये ऑफिस ८ हजार रुपये भाडं देऊन शिफ्ट झालं; पण वर्षभरानं घरालकानं दुप्पट भाडं मागितल्यामुळे ते सोडण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मालकीच्या जागेचं महत्त्व समजलं. साठवलेले काही पैसे, पत्नी निशाचे दागिने मोडून अशोका मार्गवर एक फ्लॅट बुक केला.

गेल्या साताठ वर्षांपासून कंपनीचं काम तिथंच चालतं. दहा जण तिथं काम करतात. वेबसाईट, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची सॉफ्टवेअर तयार केली जातात. कोणत्याही व्यवसाय, ऑफिसकरता डिजिटली सेट अप तयार केला जातो. तसंच ऑनलाइन शॉपिंग, ईकॉमर्सची संकेतस्थळं तयार केली जातात व ती सीआरएमशी कनेक्ट केली जातात.

अमित यांच्या घरी वास्तव्यास आलेले फ्रान्समधील क्लाएंट

अमित सांगतात, ‘‘आमचे सर्व क्लाएंट परदेशातील असून त्यामध्ये अमेरिका, युरोपमधील नेदरलँड्‌स, बेल्जियम, फ्रान्स तसंच ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. आम्ही अनेक देश फिरलो. त्यांचे प्रकल्प पाहिले. नुकतेच तीन आठवड्यांसाठी आम्ही दोघं बेल्जियमला जाऊन आलो. तिथल्या कंपनीनं मीटिंगसाठी आम्हाला आमंत्रण दिलं होतं. त्यांचं काम आणि भविष्यातली आखणी आम्ही जवळून पाहिली. असं म्हटलं जातं, की ट्रम्प आल्यानंतर अमेरिका भारताकडून होणारं आऊटसोर्सिंग कमी किंवा बंद करेल; पण वस्तुस्थिती तशी नाहीय. कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारं कुशल आणि स्वस्त मनुष्यबळ त्यांच्याकडं नाही.’’

ब्रुसेल्समधील टीम

ब्रुसेल्समधील टीम
मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू करणं यासाठी धाडस आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी लागतात. त्या अमित यांच्याकडं आहेतच. ते म्हणतात, चांगलं काम करत राहिलं तर उद्योगाचा विस्तार आपोआप होतो; त्यामुळे आपण चांगलं काम करण्यावर भर दिला पाहिजे.’’

 

LEAVE A REPLY

*