गावाकडची दिवाळी : घरची लक्ष्मी आमची सून, मग मुलगी

0

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या..
लक्ष्मण कुणाचा..आईबापाचा..
दे माई खोब-याची वाटी..
वाघाच्या पाठीत घाली काठी..!

हे बालगीत आठवलं की जाणीव होते दिवाळीची. याची आतुरता अगदी महिनाभर अगोदर असते. खरी दिवाळी आमच्या गावाकडची. तेव्हा दिवाळीत पाऊस नसायचा. दोन दिवसापूर्वी नाशकात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पावसाच्या आगमनाने कही ख़ुशी कही गम असे चित्र आहे. पहिल्या आंघोळीला घरातली ज्येष्ठ मंडळी लवकर उठून आंघोळ करतात मग मुलांना उठवायची. आमची दिवाळी थोडीशी वेगळी आहे. ती कशी बघुयात.

देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सटाणा नगरीत कुठल्याही सण उत्सवाची, लग्नकार्याची सुरुवात मामलेदारांच्या मंदिरातूनच होते. दुसरं तिसरं काही नाही, आमच्या गावानं देव दगडात पाहिला नाही, तो पाहिला माणसांत. मामलेदारांच्या रुपानं. त्यामुळे आमची गावाकडची दिवाळीही वर्षानुवर्षे मामलेदारांच्या मंदिरातून सुरु होते.

अनेकजन नोकरी आणि व्यवसायामूळे गावाबाहेर आहेत. दिवाळी, आखाजी आणि डिसेंबर महिन्यात येणारी मामलेदारांची पंचक्रोशितील सर्वात मोठी जत्रा. न चुकता अनेकजण वेळ काढून येतात. याकाळात सर्वजण गावांतच भेटतात. शहराचे ठिकाण असल्यामूळे फारसं कुणी मामाच्या गावाला वगैरे जात नाही.

मामा गावातच राहायचा त्यामूळे नियमित त्याच्याकडे जाणं होत असे. म्हणून मामाच्या गावी दिवाळीच्या सुट्टीत जाणं कधी झालं नाही. तसेच आम्ही लहान असताना दिवाळी सुट्टीत अभ्यासक्रम दिलेला असे आणि शेतीत कामं असायची त्यामूळंही मामाचे गाव माहिती झाले नाही.

घरची दिवाळी तशी खासच असते. आईच्या हाताची करंजी, लाडू, वेगळ्या पद्धतीचे अनारसे यासह फराळाचे अनेक पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. जसं गावाचे ग्रामदैवत देव मामलेदार तसचं आमचं शिवाराचंदेखील शिवारदैवत आहे. लक्ष्मण महाराज म्हणून या दैवताची ओळख आहे. याठिकाणी अंदाजे पाच दशकं जुनं भले मोठे वडाचे झाड आहे.

आमचे आजी आजोबा त्यांनी त्यावेळी ऐकलेल्या अनेक गोष्टी सांगत असत. अगदी, शिवाजी महारांच्या काळात बागलाण प्रांतात काय झाले होत, बागलाणमधील घनदाट जंगलांच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकण्यास मिळत. आता मात्र हे सगळं इतिहासात जमा झालंय. आज गावात दहा दिवसांनी पाणी येतं. शहराचं पार वाळवंट झालंय. असो.

आमच्या शिवारात तशी वेगळी परंपरा अनेक दिवसांपासून रुढ झाली आहे. आम्ही लहान-लहान होतो तेव्हा आम्हाला मोठ्या आजोबांच्या घरी आमचे वडील घेवून जायचे. याठिकाणी मळ्यात सर्व महिला एका ठिकाणी आजही जमतात. आत्या, बहिणी माहेरी येतात. भावांच्या बायका माहेरी जाण्याआधी घरची दिवाळी करुनच जातात.
घरातील सून घरची दिवाळी करुनच माहेरी जाईल, दिवाळीसाठी पुढाकार घेवून सुनेने सर्व गोष्टींमध्ये हातभार लावलेला असतो.

त्यामुळे घरच्या दिवाळीनंतरच सुनेला आदराने माहेरी पाठविण्याचा जणू पायंडाच आमच्याकडे पडलेला आहे.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी धान्याची रास, शेतमाल, घरातील सोनं नाणं, पैसा अडका यांचे पूजन करून पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन संपन्न होते. यादिवशी सकाळी फुलांच्या माळांनी घर, देव्हार्‍याला माळा घातल्या जातात. घरातली वाहणं धुवून वाहनांची पुजा केली जाते. दूसर्‍या दिवशी भाऊबीजेला लहान्यापासून मोठ्यापर्यंत पुरुष मंडळी एकत्र जमतात. भाऊबीजेच्या जम्बो कार्यक्रम आमच्या शिवारात पार पडतो. भली मोठी पंगतच औंक्षणासाठी बसलेली असते. मामाच्या गावी आलेली मंडळी फराळ वाटण्यासाठी व्यग्र असते. स्मार्टफोनच्या क्रांतीमूळे आता सेल्फी घेण्याचा एक उपक्रम या औक्षणादरम्यान समाविष्ट झाला आहे.

औक्षणाचा कार्यक्रम पार पडला की, सर्व भाऊबंधांच्या इथे फराळाचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर खर्‍या अर्थाने दिवाळी आमची संपन्न होते. आम्ही नऊ चुलत भावंडे. एककुलती एक बहिण आम्हाला. न चुकता ती घरी येते. तीचे किमान दोन दिवस फराळ करण्यात खर्च होत असतील इतके घरं तिला फिरावे लागतात कारण प्रत्येकाच्याच घरुन लाडक्या बहिणीला निमंत्रण दिलेले असते. बहिणीला माहेरी यावंच लागतं. परंतु नातलग पहिल्यासारखे आता आत्मियतेने येताना दिसत नाहीत.

हळूहळू प्रथा, परंपरा लोप पावत चालल्या आहेत असे वाटते. या कारणीभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो येईल. त्यांच्याच क्रांतीमूळं संपर्काची प्रभावी माध्यमं उपलब्ध झाली. परदेशात असाल तरी तुम्हाला काही क्षणांत समोरचा व्यक्ती स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगने थेट संपर्क साधू शकतो. आधी तसे नव्हते. लोकांकडे वेळ होता. आता तसं राहिलेलं नाही.

एकुणच दिवाळीची खरी मज्जा लहानपणीच असायची. आता कौटुंबिक जबाबदार्‍या, मान-पान तसेच कौटुंबिक प्रोटोकॉल यामूळे दिवाळी जबाबदारीची झाली आहे. हे मात्र विसरून चालणारं नाहीये.

दिवाळीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

  • दिनेश सोनवणे

LEAVE A REPLY

*