काव्यरंग : अमेय जोशी यांच्या कविता भाग २

0

खोदकाम

मागे वळुन बघा मागे वळुन बघा

चुका दिसतील तुम्हाला तुमच्याच काही

ऐकलं होतं बोलताना

थोरामोठ्यांना असलंच काही

मागे वळुन बघितलं तर नवल

आम्हाला तर काही च दिसलं नाही

मग म्हटलं खोदुन बघु स्वतः ला

त्यात तरी सापडतं का काही

स्वतः ला च खोदायच होतं ना

कशाने खोदायचं हा प्रश्नच पडला नाही

अरे कोवळासा तर थर आहे हा

नखांना सुद्धा सहज ओरबाडता येईल

जरा थोडा जोर लावला आपण तर

एका फटक्यात बाजुला होईल

पण हे तर जरा कठिणच निघालं

घाम निघाला पण ते झाकण नाही निघालं

खुप खुप दिवस साठवलं ना की हे असं होतं

क्लेश साठत राहतात अन् झाकण घट्ट होतं

कसंबसं ओढुन ताणुन ते एकदाचं उघडलं

बाहेर काढुन जड झालेलं काळीज उलटं केलं

वाजत गाजत गोंगाट करत आले सगळे बाहेर

काही होते आपणच जन्माला घातलेले

अन् काही म्हणजे फुकटचा आहेर

एक काटा होता नाजुक पण

खुप आतवर रुतलेला

आई बाबांच्या यातनांच्या

आठवणी घेउन बसलेला

एक काचेचा तुकडा होता

अनेक तुकड्यांचा बनलेला

नाकर्तेपणानी चिरडलेल्या

अलवार स्वप्नांनी भिजलेला

बरीच मोठी जागा होती

छोट्या छोट्या कुसळांची

इकडुन तिकडुन सतत झालेल्या

चेष्टा अन् अपमानांची

एक बराच मोठा डाग होता

गहिरा गडद रंगाचा

साक्षी होता कदाचित तो

अनपेक्षित अपेक्षा भंगाचा

छोट्या मोठ्या शंभर जखमा

दिसता आहेत अजुन काही

खोदकाम इथच संपलं

असं तर काही वाटत नाही

पण इथच थांबायचं ठरवलं

शोधलं म्हणजे सापडतं

खोदलं म्हणजे गवसतं

हे सगळेच आपण करतोय

फार काही नाही पण तो

खड्डा नक्कीच खोल करतोय

म्हणुन म्हटलं आता इथच थांबलेलं बरं

काळीज आपलं जड तर जड

पण ते झाकणात बंद च बरं

कुणीतरी कधीतरी येईल शोधत मला

अन् त्याला हे काळीज सापडेल

प्रेमाने मग त्यावरची धुळ तो झटकेल

मायेची एक फुंकर बसल्यावर

काळजाला या ताल सापडेल

अन् नकळत ते काळजाचे झाकण

अलगद आतुन च उघडेल

 

 पावसाचं प्रेम

तो येतो असं ऐकलं होतं..

मोसमी वारे आणि जलचक्र

असं सगळं दिव्य पार करत करत,

तो येतो असं ऐकलं होतं..

त्याचं येणं त्याच्या येण्याच्या

आधी च कळुन चुकतं नेहमीच..

मातीवर सुगंधी गालिचा अंथरला गेला,

अन् काळ्यासावळ्या ढगांची नक्षी

आकाशात सजल्यावर,

तो येतो असं ऐकलं होतं..

त्याचं येणं च फक्त पुरेसं असतं

सगळी मरगळ झटकायला..

चटक्यांपासुन जीव वाचवत

लपुन बसलेल्या जाणिवा अन्

होरपळुन गेलेल्या मनास खुलवायला..

तो येतो असं ऐकलं होतं आणि

त्याला यायचं च असतं,

इथेच कुठेतरी जमिनीवरती

त्याचं प्रेम वाट बघत असतं,

आशेने आभाळाला डोळे खिळवुन..

त्याला घट्ट मिठीत बिलगुन

चिंब भिजवण्या साठी

त्याला यायचं च असतं..

तो आला, बरसला असा काही

जसा वियोग होता जन्मांचा,

इतकं पाणी धरुन सुद्धा

जसा तहानलेला होता तो ही..

त्याला ही आकंठ बुडुन जायचं होतं

त्या धरणी वरच्या प्रेमात..

पहिली पहिली वेळ होती म्हणुन

जोर त्याचा कमी वाटत होता,

जोर कमी असला तरी ओढ

ती मात्र तशीच होती कायम..

त्याच प्रेम बघुन मला ही

प्रेमासाठी जगावसं वाटतं,

पाऊस बनुन पावसा सारखं

मनमोकळं बरसावसं वाटतं..

तो येतो, आणि शिकवुन जातो

मला, तुम्हाला प्रेम करायला..

तो येतो, कोसळुन निघुन जातो

पाठीमागे आशेची ठेवण सोडुन,

प्रेमाची आशा, जगण्याची आशा..

तो आला होता बहुतेक

आग माझ्यातली विझवण्या साठी

थेंब थेंब का असेना पण

माझा कोरडेपणा भिजवण्या साठी

तो आला, बरसला, बरसुन निघुन गेला

श्वासात माझ्या पुढच्या भेटीची

वेळ सुद्धा देउन गेला

तो आला, बरसला, भिजवुन निघुन गेला

तो येतो असं ऐकलं होतं आणि

त्याचं येणं गरजेचं असतं, समजलं होतं

LEAVE A REPLY

*