Type to search

ओके गुगल!

Special दिवाळी - निमित्त

ओके गुगल!

Share

आपल्या दैनंदिन व्यावसायिक कामात अनेक नावे आपल्या परिचयाची होतात आणि आपलीच वाटायला लागतात. गेली २० वर्षे टेक्नॉलॉजीत काम करताना मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, अ‍ॅपल, आयबीएम, एचपी, फेसबूक… ह्या नावांशी रोजच संबंध येतो. इतका की ते आपल्या जीवनाचा रोजचा भागच आहे असे वाटते. (ह्यातच त्यांच्या यशाचे गमक आहे!) मात्र प्रत्यक्षात जेव्हा ह्यातल्या काही कंपन्या पाहता आल्या, तेव्हा शहारून आले.

कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलित दोन महिने राहिलो. तेव्हा तंत्रज्ञानाचा पावलागणिक उपयोग कसा केला जातो ह्याचा प्रत्यय मिळाला. येथून फिरताना सहजच आम्ही जेव्हा सिसको (CISCO), अ‍ॅपल (Apple), नासा (NASA), इंटेल (INtel) ह्यांच्या समोरुन जातांना लहान मुलाच्या कुतुहलाने प्रत्येकाचा भव्य आणि सुरेख परिसर न्याहाळत होतो.

फेसबुकवरुन जाताना मात्र न राहवून प्रसिध्द लाईक (Like) चिन्हाबरोबर फोटो काढायला थांबलोच. फेसबुकमध्ये आत जायची परवानगी नाही. एखाद्या कंपनीचा परिसर आतून बघायला मिळाल्यास किती मज्जा येईल? हा विचार मनात डोकावेपर्यंत भावाने आमची ’गुगल’भेट ठरवून टाकली.

दिलेल्या वेळेच्या ठिक पंधरा मिनिटे आधी आम्ही Mountain view   या Silicon Valley मधल्या मुख्य कार्यालयाच्या समोर हजर झालो. गुगलचा परिसर १२ एकरात पसररेला आहे आणि तेथे असंख्य अत्याधुनिक इमारती आहेत.

या सगळ्या परिसराला Googleplex नावाने संबोधले जाते. गुगलप्लेक्समध्ये पर्यटकांसाठी परवानगी नाही. मात्र तुमच्या ओळखीचा कुणी गुगलचा कर्मचारी (गुगलर) असल्यास तुम्ही त्याच्याबरोबर गुगलचा संपूर्ण परिसर फिरु शकता.

त्यानुसार आम्हीही गुगलवारीला प्रारंभ केला. प्रवेशद्वाराजवळ प्रसिध्द गुगलचा लोगो होताच. त्यामुळे अर्थातच फोटोसाठी थांबा झाला. आमच्या मित्राने आधीच परवानगी काढली होती. त्यानुसार प्रत्येकाला व्हिजिटर्स कार्ड देण्यात आले.

आत शिरल्यावर मनाला प्रथम भावले ते तिथले अनौपचारिक वातावरण. एक क्षण वाटले की हे ऑफिस आहे की पर्यटनस्थळ. आजूबाजूला अनेक मिश्र संस्कृतीची तरुण मुले-मुली वावरत होती.

कुणाचेही कपडे अजिबात फॉर्मल नव्हते. बहुतेकजण टीशर्ट्स-शॉर्ट्स आणि स्लिपर्स अशा मोकळ्याढाकळ्या पेहरावात होते. संपूर्ण परिसरात जागोजागी सायकल स्टॅंण्ड आहेत. येथे कामासाठी, जेवणासाठी प्रत्येकजण सायकल घेऊन जातो. काम झाले की जवळच्या स्टॅंण्डवर सोडून देतो.

या सायकली हिरव्या-पिवळ्या रंगात रंगवलेल्या अत्यंत आकर्षक आहेत. आलेले पाहुणेही चालवू शकतात. जवळच हिरवळीवर एक शानदार व्हॅन उभी होती. कुतुहलाने बघितले तर केस कापण्यासाठी आली होती.

ज्या मुलामुलींना केस कापायचे होते, ते आधीच तेथे हजर झाले होते. थोडे पुढे गेल्यावर ’लॉन्ड्री’चा फलक लावलेला होता. ज्यांना आपले कपडे धुवायचे असतील त्यांच्या सोयीसाठी. मित्राने माहिती दिली की शुक्रवार असल्याने अशी कामे प्रत्येकालाच उरकायची असतात.

इमारतीत आत प्रवेश केल्यावर अंतर्गत सजावट साधी पण सुंदर होती. मोठ्या स्क्रीन्सवर नुकतेच नवीन चालू असलेले प्रोजेक्ट गुगल मॅप लावलेले होते. सध्या चालू असलेल्या कामाचा तपशील लिहिलेला होता.

कर्मचारी किंवा पाहुण्यांनी ते अ‍ॅप वापरुन बघायचे आणि काही सुचना असल्यास तेथे नोंद करुन ठेवायच्या. व्यावसायिक म्हणून आम्हाला ही कल्पना खूपच आवडली. कारण यामुळे तुमचे काम सुधारायला अधिकाधिक वाव मिळतो. वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या जातात. तुमचे प्रॉडक्ट लोकप्रिय व वापरायला सोपे (User friendly) व्हायला मदत होते. याचे प्रत्यंतर आज आपण बघतोच आहोत. जगभरात बहुतांश लोकांच्या फोनमध्ये गुगलमॅप वापरले जातात.

अजून पुढे गेल्यावर काचेच्या पलिकडे तरणतलाव होता. अनेकजण पाण्याचा आनंद घेत होते तर बाकीचे आजूबाजूला लॅपटॉप घेऊन कामात गुंतले होते. तिघेजण पाण्यात आपल्या कामाची चर्चा करत होते. हे पाहून हसूच आले.

कामाच्या ठिकाणी अजून चक्कर मारल्यावर अनेक नवलाईच्या गोष्टी समोर आल्या. ऑफिसमध्ये तुम्ही तुमचे पाळिवप्राणी आणू शकता. त्यांच्या सोयीसाठी तेथे वेगळी ’पेट’ खोली होती. तेथे त्यांच्यासाठी खाणं, पाणी आणि खेळणी अशी छानशी बडदास्त होती.

काही अंतराने जिम आणि न्हाणीघरे (showers) होती. प्रत्येक मजल्यावर ऑक्सिजन बार्स होते. ह्या खोलीत प्राणवायूचा अतिरिक्त पुरवठा केलेला असतो त्यामुळे दिवसातला काही काळ येथे बसल्यास तुम्ही एकदम ताजेतवाने होता.

झोपण्यासाठी आरामदायी गाद्या होत्याच. काही ठिकाणी आरामशीर खुर्च्या (Pod) होत्या. ह्या खुर्चीत बसले की वरुन एक हेल्मेटसारखी टोपी घालायची. त्यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो आणि मंद संगीत ऐकू येते. हे ऐकताना तुम्ही निवांतपणे विसावता आणि काही वेळाने जोमाने कामाला लागू शकता.

एका दालनातून दुसरीकडे जातांना विसाव्यासाठी बसण्याची रंगबिरंगी बाकांची व्यवस्था आहे. मधेच खेळण्यासाठी पत्ते, कॅरम, बैठे खेळ (बोर्ड गेम्स), शिवाय बास्केट्बॉलचे नेट, नेमबाजी (DART) असे खेळ ठेवलेले आहेत. काहीजण खेळताना येथे चर्चा करत होते.

वरच्या मजल्यावरुन खाली येण्यासाठी घसरगुंडया लावलेल्या आहेत. थोडे मोठ्या वयाचे मॅनेजर खाली घसरत कसे येत असतील? हे चित्र माझ्या डोळ्यासमोर येऊन हसूच आले. थोडया थोडया अंतराने कर्मचा-यांसाठी चहा, कॉफी, दूध, ज्यूस, केक्स, चॉकलेट्स, स्नॅक्स चोवीस तास हव्या तितके उपलब्ध होते.

प्रत्येक इमारतीवर स्वत:चा कॅफेटरिया होता. रोज सकाळी तिथला मुख्य शेफ त्यादिवशीसाठी मेन्यूमध्ये तयार होणारे विविध देशांच्या पदार्थांची (cuisines) यादी पाठवतो. यामध्ये अगदी इडली-डोश्यांपासून ते फलाफल, सुशी, स्पगेटी असे नानादेशीच्या लोकप्रिय पदार्थांचा सामावेश असतो.

या व्यतिरीक्त कर्मचा-यांना जेवणात वेगळे काही हवे असल्यास त्यांने सकाळीच शेफला कळवायचे, त्याप्रमाणे त्याला जेवणात तो पदार्थ दिला जातो.

कर्मचा-यांच्या काम करण्याच्या जागापण अतिशय आरामदायी, काचेच्या आड होत्या. तेथे मात्र पाहुण्यांना किंवा अगदी त्या प्रोजेक्ट व्यतिरीक्त इतर कर्मचा-यांनी प्रवेश बंद होता. प्रोजेक्टच्या गोपनियतेसाठी ते आवश्यकच वाटले मला.

इमारतीतून बाहेर पडल्यावर हिरवळीवर वेगवेगळे अ‍ॅन्ड्रॉईड (Andriod) फोनच्या आवृत्तीचें (version) मॉडेल्स पाहून तर मज्जाच वाटली. अगदी पहिल्यापासूनचे मॉडेल्स त्यांनी उभारले होते. येथेही फोटो काढायला पर्यटकांना मजा वाटत होती.

जवळच कर्मचा-यांच्या मुलांना खेळायला खेळणी (play area) होती. जवळच गुगल दुकान (Google Store) होते. तेथे गुगलचा लोगो, अ‍ॅन्ड्रॉईडचे लोगो, गुगलच्या इतर सव्हिर्सेसची चित्रं आणि लोगो असलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये टीशर्टस, पाण्याच्या बाटल्या, पेन घेण्याकडे पर्यटकांचा कल होता.

सरते शेवटी आम्हाला वॉशरुमला जायचे होते. त्यासाठी परवानगी काढावी लागते व आपल्याला पासेस मिळतात. तिथले कमोडही अत्यंत आधुनिक आणि तांत्रिक होते. गरम व गार पाण्याची सोय होतीच तसेच आपल्या शरीराच्या तापमानानुसार कमोडचे तापमानही ठरवता येत होते. स्वच्छतेविषयी तर वेगळे काही सांगायलाच नको.

इतक्या सोयी आणि मोकळीक जर गुगल आपल्या कर्मचा-यांना देत असेल तर ह्या सगळ्या आयटी इंजिनीअर्सचे तांत्रिक ज्ञान आणि कामाचा आवाका तितकाच मोठा असणार.

अभिमानाची गोष्ट अशी की ह्या परक्या देशात आपले भारतीय तंत्रज्ञही तितक्याच आत्मविश्वासाने आणि सहजपणे गुगलमध्ये वावरत होते. आमची ही गुगलवारी अमेरिकेतल्या इतर पर्यटनस्थळाइतकीच अविस्मरणीय ठरली.

– भाग्यश्री केंगे (bhagyashree@cyberedge.co.in)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!