Type to search

लक्ष्मीच्या पाऊलखुणा

Diwali Articles Special

लक्ष्मीच्या पाऊलखुणा

Share

पुरातन काळापासून चालत आलेला आणि सर्वांना एकाच धाग्यात गुंफून ठेवणारा सण म्हणजे दिपोत्सव. असे म्हणतात जेथे ज्योती तेथे लक्ष्मीच्या पाऊलखुणा. अध्यात्मिक दृष्टीकोनातून आणि डोळस बुध्दीने लक्ष्मीच्या स्वरूपांवर जर प्रकाश टाकला तर आपणास लक्षात येते लक्ष्मी आकाशात किंवा कुठे वैकुंठात नाही तर मानवी मनातील संकल्पात वास्तव्य करीत आहे.

कसे ते आपण पुढे पाहू हिंदू धर्मशास्त्रात लक्ष्मीची अनेक नावं आणि रूपांचे वर्णन आपल्याला आढळते. जसे धनलक्ष्मी , गृहलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी, विद्या लक्ष्मी, किर्ती लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी  अशा कितीतरी नावांचा उल्लेख आपल्याला धर्मग्रंथात आढळतो.

असे म्हणतात दया क्षमा शांती तेथे देवतांची वस्ती. आपले पूर्वज म्हणतात उद्योगाचे घरी देवतांचे वास्तव्य असते. काही लोकांची समजूत आहे धनदौलत पैसाअडका म्हणजेच लक्ष्मी! ही एक चुकीची समजूत लोकांमध्ये झालेली आहे. त्यामुळे आजच्या काळात सुखसमृद्धी ची व्याख्या बदलली आहे. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसाअडका धनदौलत नाही तर लक्ष्मी म्हणजे समाधान.

जेथे संतुष्टता असते तेथे सुख आणि शांतीच्या रूपाने लक्ष्मीचे वास्तव्य असते.  कधी आपल्याला आनंद आपल्या संतती मुळे प्राप्त होतो कधी एखाद्या कार्यात यश संपन्न केल्याने होतो कधी एखाद्या संकटावर धैर्याने मात केल्यावर आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. एखाद्याला नावलौकिक प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो. शेतकरयांना धनधान्य समृद्धी ने आनंद मिळतो.

याचाच अर्थ लक्ष्मी ही समाधानाच्या स्वरूपात नेहमीच आपल्या बरोबर असते . सर्वच समाधान आपल्याला पैशाने विकत मिळत नाही. आपण सर्वांनीच अनुभवलं असेलच घरात लाखो रुपये असतील आणि घरातील नळाला आठ दिवस पाणी आले नाही. तर तुमचे मन प्रसन्न राहिल का? नाही ना! त्यावेळी मनात सहज विचार येतो एकवेळ पैशाविना दिवस जाऊ शकतो पण पाण्या विणा नाही. पाणी आहे तर स्वच्छता आहे. स्वच्छता असेल तर मन प्रसन्न राहिल. म्हणूनच नद्यांना आपण माता म्हणतो.

म्हणूनच नवीन विहीर खणून झाली की पाणी पूजनाची प्रथा आजही शेतकरी पाळतो. पाण्यालाही  आपण लक्ष्मी म्हणतो. पाणी आहे तर सुख आहे समाधान आहे. आणखी घरातील एक उपयोगी वस्तु म्हणजे झाडू. घरात झाडू नसेल तर घरात अस्वच्छता राहिल आणि मन प्रसन्न राहणार नाही.  म्हणूनच म्हणतात जिथे हात फिरे स्वच्छतेचा तिथे फेरा असतो लक्ष्मीचा.

आपलं मन हे चंचल आहे आणि आपण म्हणतो लक्ष्मी ही चंचल आहे . खरं तर आपलं मन  नेहमी बाह्य जगातील साधन संपत्तीत सुख शोधत असते पण खरंच सुख साधन संपत्तीत मिळते का?

आपण पाहू दिवाळी आली की, आपण सर्वच जण गरीब असो श्रीमंत जो तो आपापल्या परीने नवनवीन वस्तूंची खरेदी करतो. एक नवविवाहित जोडपे  साडी खरेदीसाठी दुकानात जाते. आता पती त्याच्या ऐपतीप्रमाणे साडी दाखवायला दुकानदाराला सांगतो. पत्नीला महागडी साडी पसंत पडते तो तिला समजावतो आता आपण नाही घेऊ शकत साडी जास्त महाग आहे.

पण पत्नी ऐकत नाही तीचा हट्ट सोडत नाही, पतीचे आणि तिचे भांडण होते शेवटी नाईलाजाने पती तीच साडी पत्नीला घेऊन देतो. आता आपण पाहिले पत्नीला आवडती साडी मिळाली. तीला त्यावेळी आनंद झाला. पण ती साडी तिला खरंच आनंद देईल का? ती साडी घालतांना तिला आधी साडी खरेदी करताना झालेले भांडण आठवेल आणि कळत न कळत आवडती साडी पाहून तिला दुःख होत राहिल.

या उलट जर तिने पतीने सांगितलेल्या किंमतीत साडी आवडीने घेतली असती तर तीच साडी घालतांना तिला आनंद झाला असता कारण ती साडी तीला पतीने आनंदाने घेऊन दिली असती. तसेच आपण पाहतो शेजारच्या घरी जर चारचाकी गाडी आणली तर लगेच काही जणांना आपल्यात कमीपणा वाटायला लागतो. मग लगेच कर्ज काढून गाडी घेतली जाते . हे फक्त  हेवा द्वेष या साठी होते.

पण जेव्हा गाडीचे हफ्ते भरतांना जेव्हा आर्थिक ओढाताण होते तेव्हा कळते गाडी आपल्याला सुख नाही तर दुःख देत आहे. तेव्हा  आपल्या लक्षात येते की आपण आर्थिक परिस्थिती नसताना आपण गाडी घेऊन चुक केली. हेवा आणि द्वेष या साठी केलेली कोणतीही बाब आपल्याला क्षणिक सुख देते पण त्यामुळे आपल्याला कायमचे समाधान मिळू शकत नाही.

उलट हेवा आणि द्वेष याने दुख वाढतच जाते.  म्हणजेच केवळ धनसंपत्ती म्हणजे लक्ष्मी नाही तर लक्ष्मी म्हणजे जे आहे त्यात समाधान मानून जो आनंद मिळतो त्यालाच आपण सुख म्हणू शकतो. म्हणजेच समाधान रूपात लक्ष्मी प्रत्येकाजवळ राहत असते. फक्त ती सर्वांनाच दिसत नाही.

घरातील स्री ला आपण गृहलक्ष्मी म्हणतो कारण प्रत्येक स्री मध्ये सहनशीलता, दया क्षमा शांती हे गुण असतात. आणि हे गुण ज्या स्त्रीच्या अंगी असतात ती सर्व कुटुंबास सुखी बनवू शकते. म्हणूनच घरातील स्री ला आपण गृहलक्ष्मी म्हणतो.

या सर्वच बाबींचा सखोल विचार केला तर असा निष्कर्ष निघतो लक्ष्मी ही कोणी फक्त आकाशात किंवा वैकुंठात राहणारी चार हार किंवा आठ हात असलेली स्री रूपी देवता नसून ती मानवी मनाला सुख समृद्धी करणारी एक संकल्पना आहे. किंवा प्रत्येक मानवा जवळ असणाऱ्या आत्मिक शक्ती चे एक काल्पनिक प्रतिक आहे.

आपण पाहतो ज्या वस्तू आपल्या मानवी मनाला समृध्द करतात त्याच वस्तू आपण लक्ष्मी पुजेसाठी  लक्ष्मीचे प्रतिक म्हणून पाटावर ठेवतो.

जसे मीठ, पंच धान्य, झाडू, वही, पेन, रूपये,  दागिने,   या सर्वच बाबींचे आपल्या घरातील समृध्दी चे प्रतिक म्हणून आपण त्याची लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजा करतो.

दिपोत्सव काळात धन्वतरी देवतेचे पूजनाची प्रथा आहे. धन्वतरी देवतेचे आपण उत्तम आरोग्यासाठी पूजन करतो. उत्तम आरोग्य ही प्रत्येक मानवासाठी धनसंपदा आहे.  जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या गीतातील काही ओळींची सहज आठवण येते.

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी

दिशादिशा तून या लक्ष्मीच्या दिसती पाऊलखुणा।।

या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा

शत्रु बुध्दीचा विनाश होता सौख्य मिळे जीवना ।।

डोळस बुध्दीने ज्ञान ज्योत मनांत जागविली तर लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या भोवताली नक्कीच कायम राहते . आपण ज्या प्रमाणे दिवाळीच्या पुर्वी घरातील साफसफाई करतो नको असलेली अडगळ काढून टाकतो कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे हे आपणास सर्वांना ठाऊक आहे.

पण त्याच प्रमाणे आपल्या मनात एकमेकांबद्दल पकडून ठेवलेले द्वेष भाव वैर भाव रूपी  अडगळ सुध्दा काढून टाकली पाहिजे . मनामनात प्रेमज्योती जागविली तर खर्या अर्थाने मनाच्या मंदीरात लक्ष्मीचे आगमन होईल . दिवा पाहुनी लक्ष्मी येते जेथे ज्ञान आणि प्रेम रूपी पणती सदैव तेवत असते तेथे लक्ष्मीच्या पाऊल खुणा कायम असतात.

दिवाळीत दिप प्रज्वलीत करण्याची प्रथा आहे आपण आपल्या घरात तर पणत्या लावतोच  पण बाहेर अंगणात चौकात आणि ज्या घरी अंधार आहे तिथे सुध्दा आपण दिप प्रज्वलीत करतो कारण त्या मागे एकमेकांविषयी प्रेम आणि सद्भावना असल्या कारणानं आपण तसे करतो.

ज्ञानाच्या तिसर्या नेत्राने लक्ष्मी कडे पाहिले असता लक्ष्मी म्हणजे समाधान रुपी धनसंपदा आणि अलक्ष्मी म्हणजे असमाधान रुपी दरिद्रता.

चला तर मग समाधानी आणि प्रसन्न चित्ताने लक्ष्मीचे स्वागत करु आणि अस्वच्छता आणि वैरभाव रुपी अलक्ष्मीला मनातून आणि घरातून बाहेर घालवू.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुवर्णा सोनवणे चाळीसगाव (७७४४८८००८७)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!