Type to search

Ground Report : एक उनाड दिवस

Special दिवाळी - अनुभव (गावाकडची दिवाळी)

Ground Report : एक उनाड दिवस

Share

आम्ही मित्र मंडळी टाईमपास करीत बसलो होतो. तेव्हा अचानक आम्ही ठरवले, जरा फेरफटका मारून येऊया, आणि बाजारात दिवाळीसाठी काय काय नवीन आल आहे हे बघुया. शालिमारला जाण्यासाठी रेड क्रॉस सिग्नलवरून पायी निघालो.

सिग्नल वरून जाताना वाहतूक शाखेच्या पोलिसांची बंदोबस्त आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धावपळ सुरू होतीे. अशातच एक मुलगा दुचाकीवरून सुस्साट सिग्नल तोडून पळाला त्याच्या मागे पोलिस लागले, पण तो क्षणार्धात पसार झाला.

दिवसभरात अनेकजन वाहतुक नियमांचे रस्ता नियमांचे पालन न करताच नजर चुकवून पोलिसांना गुंगारा देत होते.  काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त अधिक असल्याने पोलीस या दुचाकीस्वाराचा पाठलागही करत होते मात्र त्यानंतर दुचाकीस्वार काही क्षणातच गल्लीबोळातून पसार होताना दिसून आले.

आम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण करत होतो. सार्वजनिक वाचनालयासमोरून जात असताना एक व्यक्ती पुस्तकांचे दुकान मांडून बसली होती. पण एकही माणूस पुस्तके बघताना किंवा घेताना दिसला नाही. आम्ही सुध्दा न बघताच गेलो. पुढे भरपूर कपड्यांची दुकाने लागली होती.आम्ही सहज गरिबांचे दिवाळी खरेदीचे एकमेव ठिकाण असलेल्या ‘कुमार’मध्ये शिरलो. गर्दी मावत नव्हती. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रचंड गर्दी याठिकाणी होती. गर्दीला आवर घालण्यासाठी दोन सुरक्षारक्षक दुकानाच्या प्रवेशद्वारावरच पहारा देत होते. सोबत पार्किंगमधल्या गाड्या राखत दुकानांत कपडे घेण्यासाठी आग्रह करत होते.

त्याच्याच पुढे एका दुकानासमोर एक मुलगा उभा होता. तो लोकांना दुकानात कपडे घेण्यासाठी बोलवत होता. तो म्हणत होता, ‘आधी कपडे बघा’, आवडले तर घ्या. आम्ही सहज त्याची विचारपूस करण्यासाठी गेलो. त्या मुलाचं नाव जयेश होत, त्याला आम्ही काही प्रश्न विचारले. तू कधीपासून या ठिकाणी काम करतो? किती पगार मिळतो? आणि दिवाळीची तयारी कशी चालू आहे? त्यावर तो म्हणाला भाऊ कशाची दिवाळी अन कशाच काय? आमच्यासारख्याची आता दिवाळी नाही.

मला रस्त्यावर उभे राहून गर्दी बोलावण्याचे ४ हजार रुपये मिळतात. आई वडील नाहीत मला, दोन बहिणी आहेत. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. इथं महिण्याचंच कसतरी भागत. दिवाळी साजरी करण्यासाठी खिशात पैसाच नाही म्हणून मी यावर्षी दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्याने सांगितलं. बहिणींचा सांभाळ करणाऱ्या भावाचे हे ऐकून जरा वाईटच वाटलं.

अजून पुढे जाऊन मार्केटचा अंदाज घेतला. पुढे लहान मुलांच्या कपड्यांची दुकानं सजली होती. सीबीएस, नवीन बसस्थानक जवळ असल्यामुळे मुख्यत्वे दरवर्षीप्रमाणे इथे गर्दी होतीच.

दीडशे ते दोनशे रुपयांना एक लहान मुलांचा ड्रेस मिळत होता. त्यामुळे नाशिकच्या पंचक्रोशीतील गरिबांची दिवाळी या दुकानात पार पडताना दिसून आली. या दुकानात ‘एकच भाव’ असा भला मोठा बोर्ड लावला होता. मात्र, मालक आणि दुकानातील कर्मचारी कमी जास्त करून माल खपवत होते.

त्यांना मी याविषयी विचारले तर ते म्हणाले, एकही ग्राहक रिकाम्या हाती दुकानाबाहेर पडू द्यायचा नाही त्यामुळे दिवाळीच्या आधीच ग्राहकाला नाराज न करता आम्ही बार्गेनिंग करून विकतो. दुकानदाराने ग्राहकाभिमुख होत जरी आम्हाला सांगितले असेल.

तरी आम्हाला या बाजारातली स्पर्धा ठाऊक होती, बाजारात स्पर्धा खूप असल्याने हा व्यक्ती आलेले ग्राहक परत पाठवत नव्हता. तिथून थोड पुढे शालिमार मॉलमध्ये शिरलो. मोठमोठ्या मॉलमध्ये जसे सर्व प्रकारचे कपडे मिळतात तसेच इथेही मॉल संस्कृतीनुसार उपलब्ध करून देण्यात आले होते.

त्यानंतर आमचा मोर्चा रस्त्यावरच्या किरकोळ दुकानदारांकडे वळवला. रस्त्यावर दुकान लागलेली होती. त्यांच्याकडे दुकानात बघायला मिळणार नाही, एवढया प्रकारच्या वस्तू होत्या. लहान मुलांचे, मोठया माणसांचे अशा सगळ्या वयोगटातील व्यक्तींचे कपडे होते.

अजून इतरही दुकाने लागली होती, त्यात मुलींच्या शृंगाराच्या वस्तू होत्या. लाली, पावडर, डोक्याची क्लीप, मेहेंदीचे कोन, नेलपॉलिश अशा बऱ्याच वस्तू मांडलेल्या होत्या. माल खपवण्यासाठी विक्रेते ओरडत होते ‘काहीही घ्या, फक्त वीस रुपये’ याशिवाय चादरी, स्वेटर, घर सजावटीच्या वस्तू, रांगोळ्या, कानात-नाकात घालण्याचे नकली दागिने हे सर्व त्या दुकानात उपलब्ध होते. या दुकानांच्या सभोवती महिला आणि तरुणींची प्रचंड गर्दी दिसून आली.

हे बघत असताना आमच्या लक्षात आले की, रस्त्यावर मिळणाऱ्या वस्तुंसाठी खिशात जास्त पैसे असण्याची गरज नसते, फक्त पारखी नजर असावी लागते. त्याच ठिकाणी एका दुकानाजवळ एक वृद्ध जोडपं आपल्या नातवंडांना कपडे घेण्यासाठी गिरणारे वरून आले होते.

आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलो आणि त्यांना विचारले की, ‘बाबा तुम्ही किती पैसे आणले सोबत, ते रागाने बघायला लागले त्यांना वाटले असावे की आम्ही चोर वैगेरे आहोत. पण आम्ही त्यांना म्हणालो बाबा आम्ही सहज विचारतो आहे चोर नाहीये. तेव्हा ते म्हणाले पैसे तर जास्त नाहीये पण दिवाळी वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे. त्यासाठी नवीन वस्तू घेतल्या पाहिजे म्हणून घेतोय.

ते बोलता बोलता म्हणाले, घेऊ कोणाला हलके…कोणाला भारी कपडे असे ते त्यांच्या कोकणी भाषेत सांगत होते. त्यांच्या दृष्टीने सणाला किती महत्त्व आहे हे आम्हाला समजले. चालता-चालता मेन रोड आला. त्याठिकाणी खूप गर्दी होती विक्रते जोरजोरात ओरडत होते. ‘दोनशेचा माल दीडशेला’ असे सतत कानावर पडत होते. चप्पल, बुटांचे बरेच दुकान त्या परिसरात दिसले. रस्त्यावर एक माणूस कमरेचे पट्टे गळ्यात घालून विकण्यासाठी फिरत होता.

तो १००ला दोन असे विकत होता. दुकांनांबाहेर साड्या लावल्या होत्या त्या एकजात लाल रंगाच्या होत्या फक्त नक्षी काही प्रमाणात वेगळी होती. बायकांचे कपड्यांच्या मोलभावा वरून दुकानदारांसोबत सल्लामसलद चालू होती.

फिरून-फिरून आम्हाला जरा कंटाळा आला म्हणून ‘अलंकार ज्यूस सेंटर’ मध्ये ज्यूस प्यायला थांबलो. ज्यूस सेंटर समोर स्त्रियांच्या कपड्यांचे दुकान लागले होते, ज्यामध्ये कपडे मिळवण्यासाठी बायकांचे भांडण सुरू होते. भांडण सोडवता-सोडवता दुकानदाराच्याच नाकेनऊ आले होते. खूप मजेशीर दृश्य होते ते. तेथून पुढे जायचं की, नाही यावर आम्ही विचार करत होते.

पण नंतर वाटले की, एवढ्या लांब आलो तर अजून पुढे जाऊनच बघू. आम्ही ती गल्ली सोडून उजव्या हाताच्या गल्लीतून गेलो. जिथे मातीच्या पणत्या, दिवे, देवीच्या मुर्त्या, शिराई, बोळके अशा सर्व लक्ष्मी पूजनाच्या वस्तूंची दुकानं लागली होती. आम्हाला काही घ्यायचं नव्हत पण सहज विचारपूस.

पणत्या विकणाऱ्या आजीला पण कळले की, हे काही घेणार नाही सहज टाईमपास करत आहेत. आजी ओरडली ऐ पोरांनो काही घ्यायचं असेल तर घ्या. उगाच मला वेड्यात काढू नका. आम्ही आजीला म्हणालो आज पैसे नाहीये आमच्याकडे उद्या येतो. असे सांगत पुढे निघालो.

एक फराळवाला आणि एका बाईच पैसे देण्यावरून भांडण सुरू होत. आम्ही काय चाललं हे बघत उभे राहिलो शेवटी बाईने ३५० रुपयांचे फराळ ३४० ला घेतलेच.

एका नकली दागिन्यांच्या दुकानात आम्ही गेलो आणि तेथे विचारपूस केली. दुकानदार म्हणाला काय घ्यायच ते बघा आधी मालाची सहा महिन्याची गॅरेंटी आणि भाव कमी जास्त होईल असे बोलला. तेव्हा आमची पंचायत झाली. काही घ्यायचं तर नव्हत, आम्ही लगेच तेथून पळ काढला.

त्या दुकानाबाहेर ईश्वर नावाचा एक माणूस उभा होता. पोरं जाऊन त्यांच्याशी बोलायला लागले काय कस चाललंय काका? तो व्यक्ती पण जरा गोंधळला ओळख नाही, काही नाही तरी हे अस का विचारतात. मग आम्ही आमची ओळख करून दिली. त्यांनी सांगितले की, मी सोबत ४००० रुपये आणले आहे, त्यामध्ये माझे चार पोर आणि पाहुणे सगळ्यांना कपडे व पूजेचं साहित्य सुद्धा घ्यायचं आहे, बघू कस जमतंय ते.

तेथून सुरती फरसाणच्या गल्लीत गेलो तिथे एक मुलगी आकाश कंदील विकण्यासाठी घेऊन बसली होती. बघत होती की, कोणी येतंय का कंदील घ्यायला. तिचा दिवस भरात एकही कंदील विकला गेला नव्हता. एका दुकानात अफाट गर्दी आणि एका दुकानात औषधाला पण माणूस नाही. त्या मुलीला भाव वैगेरे विचारून तिथून निघालो.

आम्ही आतापर्यंत जेवढं फिरलो, त्यामध्ये आम्हाला ठिकठिकाणी म्हातारी माणसं भीक मागताना दिसलेे ही खूप वाईट वाटणारी गोष्ट होती आमच्यासाठी. एकीकडे एवढ्या पैशांची उलाढाल आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती हे क्लेशदायक होते.

पुढे रस्त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने लागली होती. नवनवीन प्रकारच्या मिठाई त्यांमध्ये होत्या. आम्ही त्याठिकाणी उगाच गंमत म्हणून रस्त्यावरील गाडेवाल्यांसोबत सेल्फी काढत होतोे. दुसरे गाडेवाले म्हणत होते, भाऊ माझा फोटो काढ आणि ते ग्राहक सोडून वेगवेगळ्या पोझ देत होते.

त्या गाडेवाल्यांपैकी कोणीही नाशकातील नव्हतं ते सगळे दिवाळी सणासाठी आले होते. ‘ ते त्यांच्या बिहारी हेलाने म्हणत होते ‘भाई क्या करे, अपना भी परिवार है, लेकीन जिंदगी जिने के लिये पैसा भी जरुरी हैं!’ त्या पोरांनी हे बोलून आम्हाला लाजवलं, आणि आम्हाला आमच्या उच्चशिक्षित बेरोजगारीची जाणीव करून दिली.

तेथून पुढे आम्ही रविवार कारंजावरून घरी जायला निघालो त्या रस्त्यावर खूप किराणा मालाची दुकाने होती. दुकानांच्या बाहेर पाटीवर बेसन पीठ, पोहे, रवा, साजूक तूप अशा दिवाळी साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचे भाव लिहिले होते. या वस्तू घेण्यासाठी खूप गर्दी होती. काही वेळा पूर्वीच आम्ही बघितले होते की, कपडे आणि इतर वस्तूंच्या भावांवरून किती सल्लामसलती सुरू होत्या.

पण याठिकाणी सगळं काम बऱ्यापैकी शांततेत सुरू होत. कारण त्याठिकाणी मोलभाव होत नव्हता जेवढे पैसे झाले तेेवढे ग्राहक देत होते. गरीब असो किंवा श्रीमंत एकच भाव. आणि त्यांच्या समोर देवीचे फोटो, पूजेसाठी लागणारे लाकडी पाट घेऊन काही लोक बसले होते. अजून काही ठिकाणी चायना मालाच्या सजावट साहित्याची दुकान लागली होती. त्यांच्या कडे बघून मला एक वाक्य आठवल, ‘चले तो चांद तक, नही तो रात तक भी नहीं!’ ते विक्रेते ओरडत होते चलो रस्ते का माल सस्ते मे आणि लोक त्या वस्तू घेत होते. आम्ही ज्या ठिकाणाहून फेरफटका मारायला सुरुवात केली होती पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोचलो होतो.

आम्ही फिरता-फिरता जेवढं बघितलं आणि अनुभवलं. ते खूप चांगलं होत यातून वाटलं की, सण साजरे करायला कारण नसताना खूप खर्च करतो. कमी पैशात जास्त चांगले सण कसे साजरे होतात, हे रस्त्यात भेटलेले लोक शिकून गेले. श्रीमंताच्या घरी रोजच दिवाळी असते, ही दिवाळी येते ती फक्त गरिबाच्या आनंदासाठी कारण ती प्रत्येकाला रोज साजरी करता येत नाही. कोणत्याही गोष्टीची सुरुवात जरी चांगली नसली तरी शेवट गोडच होतो. आणि नाही झाला तर समजायचं की, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे फिल्मी वाक्य बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

संकलन : अनिरुद्ध जोशी, पूजा ठुबे, मोहन कानकाटे (केटीएचएम, महाविद्यालय नाशिक)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!