गावाकडची दिवाळी : बागलाणमधील निरपूरची ‘अविस्मरणीय दिवाळी’

0

दहा ते बारा दिवस अगोदरच दिवाळीची तयारी गावाकडे चालू होते. घरातील ज्येष्ठ मंडळी दिवाळीच्या  खरेदीत व्यस्त असतात. दिवाळीत सर्वाना नवीन कपडे घेण्याचे प्रमाण गावाकडे जास्त आहे. दिवाळीचा सण जोमात साजरा केला जातो. लहान मुले ही किल्ला, सैनिक, फटाके अशा गोष्टीत मश्गुल असतात. एव्हाना सहामाही परिक्षा पार पाडतात आणि ही लहान मुले दिवाळीच्या तयारीला लागतात. सुरवात होते ती किल्ला बांधण्यापासूनच.

त्यासाठी लागणारे दगड, माती, लाल काव, मातीचे सैनिक या सर्वाची जुळणा करायच काम ही बच्चे कंपनी अगदी आवडीने करते. आठवडी बाजारात आई किंवा बाबासोबत जायचे आणि तीन ते चार मातीचे सैनिक किंवा शिवाजी महाराज अशी नवीन खरेदी किल्ल्यासाठी करायची. बाकी जुने सैनिक वापरायचे. चिखलाचा किल्ला आपल्याला हवा तसा तयार करायचा. त्याचा साचा ढाचा काहिच नसत.

तयार करतानाच त्यावर मोहरी टाकायची. दहा ते बारा दिवसात अगदी छान अशी हिरवळ पसरते किल्ल्यावर मग. एकदा किल्ला झाला की मग आपल्याला जे हवे ते नाव द्यायचे. रोज त्या किल्ल्याची देखभाल करायची ही एकच ड्युटी असते मग बच्चे कंपनीची.

दिवाळीत सर्वात मोठ काम म्हणजे फराळाचे पदार्थ. करंजी, रव्याचे लाडू, बुंदी लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी असे कितीतरी नवनवीन पदार्थ बनवले जातात. या सर्वात करंजी करताना खरी मज्जा येते. तसे पाहिले तर गावी एकत्र कुटुंब पद्धती असते पण दिवाळीच्या वेळी करंजी करणेसाठी आसपासच्या घरातील स्त्रिया, मुली, मुले असे सर्वच लोक एकत्र जमतात. दररोज एका घरी एकत्र जमायचे आणि करंज्या तयार करायच्या हा बेत दिवाळीच्या आधी चार ते पाच दिवस चालतो.

या करंज्या करण्यात एक मज्जा अशीही आहे की, तूम्हाला गरमा गरम आणि ताजी करंजी खायला मिळते आणि त्यावेळची चव परत भेटत नाही. सर्व पदार्थ तयार करत असताना फक्त घरातील व्यक्तींचा विचार केला जात नाही. पाहूणे, मित्र मंडळी, नोकरीसाठी बाहेरगावी राहणारे घरातले सदस्य अशा सर्वांचा विचार करुनच प्रत्येक पदार्थ हा भरघोस प्रमाणांत बनवीला जातो.

दिवाळीच्यावेळी मुंबई, पुणे तसेच इतर शहरात कामानिमीत्त स्थायिक झालेले घरातील सदस्य आपल्या पुर्ण कुटुंबासहित सुट्टीला गावी येतात. दिवाळीच्या या पाच ते सहा दिवसांत घर अगदी भरुन राहते. एकमेकापासून दुर असणारे हे सर्व सदस्य या दिवाळीच्या निमीत्ताने एकत्र येतात आणि नात्यांचा एक अनोखा संगम सर्वच पिढीला पहायला मिळतो.

पुर्वी दिवाळीसाठी घरीच आकाशकंदील बनवले जायचे. आता अलीकडे विकत घेतले जातात. आकाशकंदील, मातीचे दिवे या सर्वाची जय्यत तयारी केलेली असते. दिवाळीच्या आदल्या दिवशीच अंगण शेणाने सारवून घेतलेले असते. पहिल्याच दिवशी अगदी पहाटे चार वाजताच घरातील सर्व मंडळी जागे होतात.

अभ्यंगस्नानाचे वेड सर्वांनाच लागलेल असते. बच्चे कंपनी तर खुपच उत्साहात असते. घरातील तरुण मुली तसेच सुना सकाळीच दारात सडा टाकतात आणि सुरेख रांगोळी काढतात. त्यांचा तो बेतच असतो. आपली रांगोळी कशी मस्त येईल इकडे त्यांच जास्त लक्ष असत. आजच्या दिवशी आपले घर दिमाखदार आणि सुरेख कसे दिसेल इकडे स्त्रीवर्गाचे जास्त लक्ष असते.

पहिल्या दिवशी पुर्ण कुटुंबासोबत मनसोक्त फराळ करणे हा दिवसाचा सर्वात पहिला भाग असतो. मग हळूहळू शेजारी तसेच मित्रमंडळ याना फराळाचे आमंत्रण देणे हा उपक्रम सुरु होतो. दिवाळी फराळासाठी लोकाना आपल्या घरी बोलवायचे आणि आपण त्यांच्याकडे जायचे हा रिवाजच आहे गावाकडे. मग नंतर पाहूणे येतातच दिवाळी घेऊन किवा मग स्वता तिकडे दिवाळी घेउन जाणे हा प्रकारही अजुनही गावाकडे पहायला मिळतो. दिवाळीसाठी बनवलेले पदार्थ एकमेकासोबत शेअर करण्याचा हा रिवाज खरेच खुप छान आहे.

यातूनच नात्यामधील स्नेह आणि प्रेम वाढत जाते. दिवाळी पाडव्याला घरासमोर अंगणात शेणापासून तयार केलेले पांडव आणि त्यांची पुजा हे पहायला ही मज्जा येते. भाऊबीजला बहीण भाऊ हे नात किती उत्कंटावर्धक आहे हे पहायला मिळते. भाऊ आपल्या बहिणीसाठी काही ना काही घेत असतोच आणि बहीण आपल्या बंधुरायाचे आयुष्य सुखात जावो याची प्रार्थना करित असते. या चार ते पाच दिवसात नात्यान एक वेगळीच चमक मिळत असते जी अनुभताना मनाला एक विलक्षण आनंद प्राप्त होतो. सर्वात शेवटी उरते ते म्हणजे तुळसी विवाह. हा तुळसी विवाह ही सर्व लोक एकत्र येऊनच घरोघरी जाऊन साजरा करतात. एक वेगळीच मजा, एक वेगळाच आनंद दरवेळी गावाकडची दिवाळी मधे पहायला मिळतो.

आजकाल हे सर्व काही हरवत चालले आहे, पण अजुनही गावाकडची दिवाळी मात्र तशीच साजरी केली जाते जशी ती साजरी करायचे. यावर्षीही अशीच दिवाळी साजरी करणार आहे तुम्हीही करा. आजच्या धावपळीत माणुसकी आणि कुटुंब हरवत चालले आहे, या दिवाळीत ते जपायचा प्रयत्न करा. तुमच्या मुलाना..या भावी पिढीला गावाकडची दिवाळी काय असते हे आवर्जून सांगा. शेवटी तुम्ही-आम्ही सर्व एकाच गावचे… जायचे तर तिथेच आहे….!

  • रोहिणी सुर्यवंशी, विद्यार्थिनी, निरपूर (ता. बागलाण, जिल्हा. नाशिक)

LEAVE A REPLY

*