गावाकडची दिवाळी : तेव्हा बोचऱ्या थंडीने लागायची दिवाळीची चाहूल

0
File photo

एकदा सहज गावाकडे  गेलो असताना त्यावेळी गावात असलेली जनावरे नुकतीच चरण्यासाठी निघाली होती. तेवढ्यात माझ्या मुलीने मला आवाज दिला. ‘पप्पा त्याला शेण म्हणतात ना? त्याचा किती वास येतोय?

त्याचवेळी मनात विचार आला, आजही गावाकडच्या मातीला जो सुगंध आहे, तो शहरामध्ये  पाहावयास मिळत नाही. गावाकडचे सण आणि सणांमधील गोडवा आजही तितकाच हवाहवासा वाटतो.

दिवाळीच्या अगोदर खेड्यामध्ये शेतीची कामे सुरु असायची. अशातच थंडीची चाहूल लागायला सुरवात होत असायची. मग दिवाळीचे वेध लागायचे. आठ दिवस आधीच तयारीला सुरवात व्हायची.

गोठ्यात असणाऱ्या शेणाने अंगणात पांडव काढले जायचे. नव्या नवऱ्या माहेरच्या ओढीनं गावी यायच्या. शेजारीपाजारी विचारपूस केली जात असे. गालावरून बोट मोडली जायची. नव्या केरसुणीने घर अगदी लख्ख व्हायचे. जुन्या लायटिंगच्या माळा काढून त्या दुरुस्त केल्या जायच्या. नाहीतर रंगबेरंगी कागद एकत्र चिकटवून कंदील लावला जात असायचा.

गावातल्या एखाद्या घरात चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील लावला जायचा,  आम्ही मित्रमंडळी तो कंदील पाहायला जात असू. घरात दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु असायची .  आजी पांढरी माती आणून चूल सारवायची.. अंगणात शेणाचा सडा शिंपडला जायचा. रांगोळी काढली जायची.

मातीच्या पणत्या तयार करून अंगणातल्या तुळशी भोवती  सजवले जायचे. कुडकुडत्या थंडीत आईने घातलेल्या आंघोळीची सर आजही येणार नाही.

दिवाळी म्हटली कि नवे कपडे घालायला मिळायचे. घरोघरी पणत्या तेवत राहायच्या तोपर्यंत फटाके वाजत असायचे. कुठलंही बंधन नसायचं, पण गाव आपल्या वेळेतच अंथरुणात पहुडलेला असायचा.

दिवाळी साजरा करण्यासाठी एक उत्साह असायचा. प्रत्येकाच्या भेटीत मन हरवून जायचं. गावातील देवळात असणाऱ्या दिव्यांची आरास मनाला चटका लावून जायची.

आज पूर्वीसारखा दिवाळीचा उत्साह गाव खेड्यातही उरलेला दिसत नाही. शहर आणि खेडे एकच होत चाललेले आहेत. बालपणाच्या त्या कोवळ्या खांद्यावर दिवाळीचा अभ्यासाची जबाबदारी पडलेली दिसते.

आंघोळीसाठी दगडांची न्हाणीही गायब झालेली दिसून येतात. कुडकुडत्या थंडीत चुलीवर पाण्याला जल लावून आंदण ठेवणारी आजीही उरली नाही. खेड्यातल्या आईची जागा आता मम्माने घेतली आहे. तसेच खेड्यातल्या सणांना देखील शहराचं रूप आलं आहे.

आताची मम्मा मुलांना शेणाचिखलात हात घालू देत नाही.  लहान मुलांनाही शेणाचा गंध आता उग्र वाटायला लागला आहे.

पूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा भेटून दिल्या जात असत आज समाजमाध्यमांमुळे इंटरनेटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक मात्र नक्की खेड्यात दिवाळी साजरा करण्याचा जो आनंद होता, तो आज कितीही पैसे दिले तरी मिळणार नाही.

स्वप्निल लोटन पाटील, उच्च. माध्य. शिक्षक, आश्रमशाळा पिंपळे ब्रु., ता. अमळनेर जि जळगाव

LEAVE A REPLY

*