गावाकडची दिवाळी : येउंद्यारे येऊंद्या वाघ्याची भोई वाघे…

0
प्रतीकात्मक छायाचित्र

येउंद्यारे येऊंद्या वाघ्याची भोई वाघे…सकाळपासून आवाज चालू होता. मी खटकन गोधडीतून बाहेर आलो. दोन चार मुलांच्या टोळक्या गल्लोगल्लीत फिरत व्हत्या. मग मी आईकडंन पिशवी घेतली. खालच्या आळीच्या पांड्याच्या टोळीत सामील झालो. तशी आम्ही ५ लोक होतो.

आम्ही सगळ्यांनी वरच्या आळीपासनं मागायला सुरवात करायचं ठरविलं. अन सांगितलं कि, गहू घ्यायचं नाहीत. तांदूळ अन भात चाललं. मग आम्ही परतेक घरी जाऊन वाघ्याची भोई मागायला सुरवात केली. बोळाबोळानी संधी घर पायाखाली घालीत व्हतो.

एखादया घरासमोर दुसरी असली कि, आम्ही तिथं जायचो.. अन मोठ्यानं ओरडायचो. त्या टोळीपेक्षा आमच्या टोळीचा आवाज मोठा असायचा. घरातून कुणी आवाज दिला तर ठीक नायतर पुन्यांदा आवाज देऊन त्यासनी बोलवायचो. मग पहिल्या टोळीने धान्य घेतल्यानंतर आम्हीबी पिशव्या पुढ्यात धरायचो. मग बायामाणसं इचारायची कार तुमची एकच टोळी हायना, मग आम्ही नाही म्हणून पिशवीत धान्य घेऊन पुढं चालायचो.

सकाळच्या ८ वाजेस्तोवर आमच्या वाघ्याची भोई मागणं आटपायचं. मग आमच्यातील कुणाच्या तरी घरी जाऊन धान्याची गोळा करायचो. भट जास्त जमलेलं असल्याचे मग ते दुकानात एकूण त्याची मीठ, मिरची. तेल घेऊन यायचो. दुकानात चहाबरोबर खायला मिळणारे बटार (ब्रेड) बी घायचो अन थोडासा बेसनही.

मग आम्ही प्रत्येकाच्या घऱीऊन भाकरी, एखाद पातेलं, कढई घेऊन नदीवर जायचो. तिथं बाकीचे पोर बी येऊन आपापली जागा टिपून जेवणाची तयारी करीत असायचे. मग आम्ही आम्ही नदीतल्या दगडांची चुल मांडून सुरवात करायचो बाकीचीं मंडळी कोणी काड्या आन, कुणी कागद, कुणी स्वयंपाकासाठी पाणी आणीत असे.

मग सुरु व्हायचं … आम्ही सारे खवय्ये सारखं कुणी चुलीच्या आडोशाला बसायचं हवा लागू नये म्हणून, कुणी आणलेल्या बेसनात पाव टाकून खमखमीत पाववाडा काढण्यात मश्गुल असायचं, तर कुणी नदीत मनसोक्त पोहत मुक्त संचार करताय दिसायचं, असं सगळं चालायचं.

मग सगळं स्वयंपाक झाला का, जवळच्या मोठ्या खडकावर, एका मोठ्या परातीत (मोठी ताट) सगळे जेवायला बसायचो. साधारण तीन चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा… मग सगळी मंडळी आपला दिवसभर आणलेला गरजेपुरता संसार उचलून पुन्हा गावाकड पाऊल चालत सुटायची. उचलायची…

पण आज ही पाऊल यांत्रिक झाली आहेत. पहिल्यासारखा उत्साह आता कोणत्याच सणात दिसून येत नाही. लहानपणी दिवाळी महिनाभर असायची …आज बोनसपुरती दिवाळी झाली असून तो उत्साह, ती लगबग, आता दिसून येत नाही.

-गोकुळ पवार

LEAVE A REPLY

*