Type to search

दिवाळी - निमित्त

प्रकाश पेरा आपुल्या भोवती!

Share

‘दीपज्योती नमोस्तुते’ म्हणत अंधार सरून प्रत्येकाच्या घरात आणि मनात दीप तेवावा यासाठी दीपावली सणाचा वैशिष्ट्यपूर्ण संस्कार हिंदू संस्कृतीत साजरा केला जातो. पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याला प्रकाशाचे आकर्षण असते. अंधारातून प्रकाशाकडे धाव घेण्याची सजीवाची ओढ चिरंतन आहे. म्हणूनच ‘तिमिरातुनी तेजाकडे’ नेणारी आपली हिंदू संस्कृती जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंगाच्या हरेक व्यक्तीला तेजाचा वारसा देते. याच तेजाचे प्रतीक असणारा दीपावलीचा सण आपल्या घरातील, परिसरातील आणि मनातील अंधःकाराचे निर्मूलन करतो आणि माणसाला जगण्याचा नवा प्रकाशमान मार्ग देतो.

मात्र हल्ली दिवाळी साजरा करण्याचा आपला एक पॅटर्न ठरलेला असतो. दिवाळीच्या महिनाभर आधीपासून घरात साफसफाईची लगबग सुरु होते, दिवाळीला  पंधरा दिवस राहिले की, घराघरातून फराळाचा खमंग सुवास येऊ लागतो. आणि दिवाळी आली की मग कुटुंब फारतर नातेवाईक, शेजारी यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला जातो. बाकी मग फटाके, कपडे, इतर वस्तूंची खरेदी यांच्याच जोडीला दिवाळीच्या शुभेच्छांचे व्हाट्सअप संदेश फॉरवर्ड करत दिवाळीचे चार दिवस प्रत्येक वर्षी एका साचेबद्ध स्वरूपात साजरे केले जातात.

आजच्या रोषणाईच्या झगमगाटात आपल्याला दिवाळीतील दिव्यांचे तेज तेवढे जाणवतही नाही. व्यस्त जीवनशैली, भौतिक सुखाचा अट्टहास यांमुळे वरवरचे जीवन जगणाऱ्या तुम्हां-आम्हांला ‘अत्तदीपो भवः’ची शिकवण देणाऱ्या दीपावलीचा विसर पडत चालला आहे, याची खंत वाटल्याशिवाय राहत नाही.

खरं तर, अमावस्येच्या दिवशी येणारी दीपावली काळोखापलीकडील प्रकाशाचे द्योतक आहे. तसेच दुःखानंतर सुखाचे अस्तित्व असते, याचे सजग भान दिवाळी देते. दुःख, वेदना सोसल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. म्हणूनच अमावस्येचा अंधार असल्याशिवाय दिवाळीच्या दिव्याला अर्थ उरत नाही. दीपावलीचे दिवे मानवी जीवनातील अंधःकाराला आशेचे तेज देतात आणि माणसाला जगण्याचा नवा प्रकाशमार्ग दाखवितात.

दीपावलीचा खरा अर्थ जाणून घेत, आपल्यासाठी अहर्निश राबणाऱ्या, झिजणाऱ्या शेतकऱ्याच्या हातांसाठी तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी अस्मानी-सुलतानी संकट निधडया छातीने झेलणाऱ्या जवानांसाठी कृतज्ञतेचा, आदराचा दिवा लावायला हवा. आपल्याच भोवताली जिथे-जिथे अंधार पसरला आहे तिथे -तिथे आनंदाचा दिवा लावायला हवा. त्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. आजूबाजूला पाहिले, तर दिवाळीच्या रोषणाईतही आयुष्याच्या काळोखाला सामोरे जातांना पाठीला पिशवी बांधून कचरा गोळा करणारे अनेक कोवळे हात आशेच्या दिव्यासाठी आसुसलेले दिसतील.

रस्त्याच्या काढला मूक-बधिर, अंध-अपंग अनेकजण उजेडाची वाट बघतांना दिसतील. उष्टी-खरकटी भांडी, मळके कपडे स्वच्छ करणारे, सकाळी पेपर टाकणारे, दगडी हातांनी पत्थर फोडणारे, बारा-बारा तास इतरांच्या घरांचे रक्षण करणारे अनेक कष्टकरी दिवाळीच्या दिवशीही आयुष्यावर चढलेली काजळी साफ करण्याचा प्रयत्न करीत असतात. ‘उपाशी लोकहो आली दिवाळी राजपुत्रांची, दिवे जाळून रक्ताचे करा अंधार आनंदी’ म्हणत पोटाची खळगी भरतांना गोरगरिबांना आपले आयुष्य पणाला लावावे लागते. अशांना दिवाळीच्या लखलखत्या तेजाची गरज असते. आपल्या दिव्याने त्यांच्या घरातील दिवा पेटवता आला तर खऱ्या अर्थाने त्यांची आणि आपलीही दिवाळी सार्थकी लागेल.

चला तर मग, ही दिवाळी केवळ स्वतःपुरती साजरा न करता आपल्याकडील दिव्याने अंधारातील गरजूंसाठी प्रकाशवाटा तयार करू या, आणि ‘दुरितांचे तिमिर जावो’ म्हणत आपापल्या परीने दीनांची दीपावली आनंदाची करू या!

  • प्राजक्ता नागपुरे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!