उपजिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीला प्राचार्यांची दांडी

0

युवक मतदार नोंदणी मोहीम

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा निवडणूक विभागाने युवक मतदार नोंदणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दांडी मारली.
महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान 18 ते 21 वर्षे वयोगटातील युवक-युवतींची मतदारयादीत नावनोंदणी करण्याबाबत निवडणूक विभागाचे निर्देश आहेत.

त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने संबंधित महाविद्यालय व प्राचार्यांना नोडल अधिकारी नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र न्यू आर्ट्स कॉलेज वगळता इतर महाविद्यालयांनी याकडे कानाडोळा करणे पसंत केले. मतदारनोंदणी कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या महाविद्यालयांकडून अद्ययावत माहिती उपलब्ध न झाल्याने निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी बुधवारी सकाळी नगर शहरातील प्राचार्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी प्राचार्यांनी स्वत: उपस्थित न राहता आपल्या प्रतिनिधींना पाठवून बैठकीचा फार्स करणेच पसंत केले.

या बैठकीला अहमदनगर महाविद्यालयांचे प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी, न्यू आर्ट्स कॉलेजचे प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्रा. एस. एन. आव्हाड, न्यू लॉ कॉलेजचे प्रा. अतुल मोटे, काकासाहेब म्हस्के महाविद्यालयाचे आकाश बनसोडे, बाणेश्‍वर महाविद्यालयाचे डॉ. बांगरे, आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
18 वर्षे पूर्ण असणार्‍या आणि महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी अर्जासोबत मतदार नोंदणी करण्यास टाळाटाळ करणार्‍या महाविद्यालयांसह प्राचार्यावर कठोर कारवाई करण्याचा बडगा राज्य निवडणूक विभागाने उगारलेला आहे.

अशा परिस्थितीत कारवाईचा धसका न घेता कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या महाविद्यालयांना पुन्हा प्रत्यक्ष बोलावून सूचना देण्याचा प्रयत्न जिल्हा निवहणूक विभागाने केला. मात्र, त्याकडेही अनेकांनी दुर्लक्षच केले. त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणूक आयोग 1 ते 31 जुलै या कालावधीत 18 ते 21 वर्षे वयोगटातील युवकांची मतदारयादीत नावनोंदणीसाठी विशेष मोहीम राबवीत आहे. वय पूर्ण असतांना मतदारयादीत नाव नसणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे सूचित केले आहे. संबंधित सर्वाचा नमुना नंबर 6 भरुन घेण्यात येणार आहे.

त्या सोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, तहसीलदारांचे अधिवास प्रमाणपत्र, रहिवासाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. ज्या विद्यार्थ्याचे सर्वसाधारण रहिवास 128 शिर्डी विधानसभा मतदारसंघात असल्यास त्यांचा केवळ नमुना नंबर 6 भरुन घेण्यात यावा. इतर विद्यार्थ्यांना त्यांचा रहिवास ज्या मतदारसंघात असेल त्या त्या मतदार संघाचे अधिकार्‍यांकडे संबंधित फॉर्म सादर करण्याच्या सूचना देत आहेत.

आयटीआय संस्थेची पाठ – 
जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणी संदर्भात बोलाविलेल्या बैठकीला जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था व प्रेमराज सारडा महाविद्यालयाचा प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित नव्हाता.

रविवारपासून मोहीम – 
1 ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार्‍या मतदार नोंदणीमध्ये 9 ते 23 दरम्यान विशेष मतदारनोंदणी आयोजित करण्यात आली असून मतदान केंद्रीयस्तरीय अधिकार्‍यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर हजर राहून पात्र नागरिकांकडून नमुना नंबर 6 भरून घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

…अन्यथा दोन वर्षांची शिक्षा
राज्य निवडणूक विभागाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित महाविद्यालयांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होऊन युवकांची नोंदणी करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अनेक वेळा सचूना देऊनही बहुतेक महाविद्यालयांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने शेवटची संधी म्हणून बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यापुढे दुर्लक्ष झाल्यास लोकप्रतिनिधी कायदा कलम 32 नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.
– अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

LEAVE A REPLY

*