Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

12 उपजिल्हाधिकार्‍यांच्या खांद्यावर निवडणुकीची धुरा

Share

विधानसभा निवडणूक : प्रत्येक मतदारसंघात खर्च निरीक्षकाचा राहणार वॉच

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतर शनिवारपासून जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 12 मतदारसंघांसाठी 12 उपजिल्हाधिकार्‍यांवर निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) जबाबदारी राहणार आहे. त्यांना साहाय्य करण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांसह आणखी चार अधिकारी असणार आहेत. यामुळे पहिल्यांदा प्रत्येक मतदारसंघात पाच अधिकारी निवडणुकीच्या कामावर लक्ष ठेवणार आहेत.

राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 27 सप्टेंबरपासून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज मिळतील. त्यानंतर 4 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून संबंधित तहसील कार्यालयातच अर्ज स्वीकारले जातील. मतमोजणीचे कामकाज संबंधित मतदारसंघनिहाय व निश्चित केलेल्या ठिकाणी होईल. माध्यमात उमेदवारांच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती किंवा वृत्तांकनावर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असून सचिवासह इतर पाच सदस्य समितीत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू उपस्थित होते. निवडणुकीसाठी 28 लाख रुपयांची खर्चाची मर्यादा असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक खर्च निरीक्षक यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

हे आहेत समन्वय अधिकारी
जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्याकडे निवडणुकीसाठी लागणारे कर्मचारी नियुक्ती, तसेच साहित्य नियोजन व वाटपाची जबाबदारी आहे. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन 1) चंद्रशेखर देशमुख यांच्याकडे इव्हीएम व व्हीव्हीपॅटचे नियोजन आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील हे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख असतील, तसेच कायदा व सुव्यवस्था कामकाजही त्यांच्याकडेच आहे. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण हे प्रसारमाध्यम कक्षप्रमुख आहेत. संगणकीकरण व मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांच्यावर आहे. मतदार जागृतीसाठी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, तर निवडणूक नियोजन आराखडा, वाहतूक व संपर्क व्यवस्थापन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पवार यांच्याकडे असेल. याशिवाय मतमोजणी आराखडा, निवडणूक निरीक्षकांकरिता समन्वय, सैनिकी पोस्टल मतदान, मतपत्रिका छपाई, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, दिव्यांग मतदार जनजागृती, सुक्ष्म निरीक्षक समन्वय, मनुष्यबळ प्रशिक्षण नियोजन, खर्चाचे सनियंत्रण, निवडणूक मनुष्यबळाचे आरोग्य व्यवस्थापन, संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण यासाठी इतर विभागांच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारी वाहने जमा
निवडणुकीचा बिगुल वाजताच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत या ठिकाणी असणार्‍या पदाधिकार्‍यांकडील सरकारी वाहने जमा करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनुसार विधानसभा निवडणुकीत प्लॅस्टिक वापरावर बंदी राहणार असून कागदाची बचत करण्यासाठी ऑनलाईन माहिती देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी सादर केलेला खर्च यासह निवडणुक विभाग स्वतंत्रपणे उमदेवारांचा खर्चाचा तपशील जमा करणार असून यासाठी भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. लोकसभेप्रमाणे विविध माहिती ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा, सामाधान, सीव्हीजी आणि सगम हे ऑप सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पैशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी 72 पथके 12 मतदारसंघात राहणार आहेत.

 • मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी
 • अकोल उदय किसवे, उपजिल्हाधिकारी, रोहयो.
 • संगमनेर शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर.
 • शिर्डी गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी, शिर्डी
 • कोपरगाव राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
 • श्रीरामपूर अनिल पवार, उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर.
 • नेवासा शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
 • शेवगाव देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी, शेवगाव.
 • राहुरी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन.
 • पारनेर सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर.
 • नगर शहर श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी, नगर.
 • श्रीगोंदा अजय मोरे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन.
 • कर्जत- जामखेड अर्चना नष्टे, उपविभागीय अधिकारी, कर्जत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!