Wednesday, April 24, 2024
Homeनगरबांधकाम विभागाने अखेर ’तो’ दिशादर्शक फलक बदलला

बांधकाम विभागाने अखेर ’तो’ दिशादर्शक फलक बदलला

चास (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील लहित फाट्याजवळ चुकीच्या दिशा दर्शविणारा फलक शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाकडून बदलण्यात आला आहे. अनेक महिने हा फलक प्रवाशांना परिसरातील गावांच्या चुकीच्या दिशा दर्शवीत होता. मात्र ‘दैनिक सार्वमत’ ने काही दिवसांपूर्वी दिशादर्शक फलकामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

याचाच परिणाम म्हणून लहित गावचे रहिवासी माजी प्राचार्य सहदेव चौधरी यांनीही संबंधित खात्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. नुकताच लहित फाट्याजवळील चौफुलीचा हा चुकीचा दिशादर्शक फलक बदलण्यात आल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisement -

आपण सर्वजण महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्येही फिरत असतो. यावेळी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेच दिशादर्शक फलक विविध गावांकडे जाण्याचे मार्ग सांगत असतात. हेच दिशादर्शक फलक चुकीचे असतील तर प्रवाशांना किती मनस्ताप सहन करावा लागेल? याचं गांभीर्य लक्षात घेऊन ‘दैनिक सार्वमत’ने यासंदर्भात सर्वात पहिल्यांदा आवाज उठविला व तो चुकीचा फलक प्रशासनाने बदलून योग्य फलक त्या ठिकाणी लावल्याने परिसरातील नागरिकांनी सार्वमत वृत्तपत्राचे आभार मानले आहे.

हा फलक बदलल्याने परिसरातील जनता थोडी समाधानी असली तरी प्रचंड खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे जनतेत खूप नाराजी असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. कोतूळ ते पिंपळदरी, लहित ते वाघापूर या रस्त्याने प्रवास करताना तर गाड्यांबरोबरच माणसेही खिळखिळी झाली आहेत.

मुळा परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांची परिस्थिती चिंताजनकच आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन या फलकासारखाच परिसरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लोकांच्या चर्चेतून पुढे आली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून मुळा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याची कोणाही लोकप्रतिनिधिंनी आजपर्यंत साधी दखलही घेतली नव्हती. यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वैभव पिचड यांना त्यांची हक्काची मते गमवावी लागल्याने परिसरामध्ये कमी मताधिक्य मिळल्यानेच त्यांचा पराभव झाल्याची जोरदार चर्चा आहे. आता नवनिर्वाचित आमदारांनी तरी प्रामुख्याने रस्त्यांची कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या