देवळाली प्रवरा येथील चोरी प्रकरण : मास्टरमाइंड पसार; धनदांडग्यांना ‘क्लिनचीट’

0

दुचाकी आणि वीज मोटारी चोरल्याची कबुली

मास्टरमाईंड व भंगारवाला मोकाटच! अठरापैकी केवळ पाचजणांवरच गुन्हे

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) – देवळाली प्रवरा पोलिसांनी पाच आरोपीना जेरबंद केले असले तरी या गुन्ह्यातील ‘मास्टरमाइंड’ अजून पसारच आहे. तर पोलिसांनी एकूण 18 तरूणांची धरपकड केली होती. मात्र, त्यातील केवळ पाच जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित तरूण धनदांडग्या कुटुंबातील असल्याने त्यांना ‘क्लिनचीट’ दिल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी पकडलेल्या सात दुचाकीपैकी अद्यापपर्यंत दोनच दुचाकीचे मालक येऊन गेले आहेत. पाच दुचाकीचे मालक अजून आलेले नाहीत.
परिसरात वाढलेल्या चोर्‍यां संदर्भात देवळाली प्रवरा पोलीस आरोपींच्या मागावर होते. त्याप्रमाणे त्यांनी येथील बाजारतळावरील एका हॉटेलवर सापळा लावून अठराजणांची टोळी पकडली. परंतु यातील शौकत पठाण, संदीप गाडेकर व दीपक बर्डे यांना ताब्यात घेतले. या नंतर दुसर्‍या दिवशी बिट्टया तथा प्रसन्न पंडीत व निखिल येवले यांना ताब्यात घेतले. असे एकूण पाच आरोपी या गुन्ह्यात आतापर्यंत जेरबंद केले आहेत.
यातील एका आरोपीकडे बोगस आधारकार्ड बनविणे, दुचाकीचे बोगस कागदपत्रे बनविण्याचे काम होते. गाडेकर याच्याकडे चोरीची दुचाकी सापडली आहे. दिलीप बर्डे व निखिल येवले यांनी वीजपंपाची चोरी करून ते स्थानिक भंगारवाल्यास विकल्याची कबुली दिली असली तरी अद्यापही ‘तो’ भंगारवाला मोकाटच असल्याने स्थानिक पोलिसांच्या तपासावर नागरिकांच्या संशयाची सुई स्थिरावली आहे.
तर प्रसन्न पंडीतने दुचाकी चोरी संदर्भात कबुली दिली आहे. वरील पाच पैकी एक बनावट कागदपत्र तयार करत असे. दोघे दुचाकी चोरत होते व दोघे वीज मोटारी चोरत होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. या पाच जणांनीच त्याची विल्हेवाट लावली का? आणखी कोणी व कशी विल्हेवाट लावली? हा माल कोणकोणत्या भंगारवाल्यांनी घेतला? यात मध्यस्थी कोणी केली? तसेच दुचाकी चोरी प्रकरणात गिर्‍हाईक कोण? आणून देत होते. दुचाकीवर पाळत कोण ठेवत होते? या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे काम नक्कीच या पाच जणांपेक्षा जास्त जणांचे असल्याच्या चर्चेला आता उकळी फुटू लागली आहे.
यातील मुख्य आरोपी व भंगारवाला अजून मोकाटच असून ही फार मोठी टोळी असल्याची गावात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या टोळीतील प्रत्येक आरोपीला पोलिसांनी गाव पुढार्‍यांचा हस्तक्षेप झुगारून जेरबंद करून ही टोळी कायमची नेस्तनाबूत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एका नगरसेवकाने सांगितले आमच्यातील एका आरोपीने गुन्हे केले असले तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही त्याला पाठीशी अजिबात घालत नाही. परंतु त्यादिवशी पोलिसांनी अठरा जणांना पकडून आणले. त्यातील काहींनी आपले म्हणून सोडवून नेल्याचा आरोप केला आहे.


देवळाली प्रवरा सोसायटीचे अध्यक्ष शहाजी कदम यांनी सांगितले, ही गावाला लागलेली मोठी कीड आहे. यातील सर्व दोषींना पकडलेच पाहिजे, मग तो कोणीही असो. या संदर्भात सोमवारी पोलीस स्टेशनला सर्व पक्षीय बैठक घेणार आहे.


रिपाइं राहुरी तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सांगीतले, आरोपी कोणत्याही जातीधर्माचा असो, त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. गावचं गावपण राखण्यासाठी आरोपींना कुणीही पाठीशी घालू नये. तसेच यात पोलिसांनी भेदभाव केल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू.

 

LEAVE A REPLY

*