Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प : बेरोजगारीचे भयाण वास्तव; पुरी भाजी केंद्रावर गर्दी मावेना, ६३ जागांसाठी आले ३० हजार तरुण

Share

देवळाली कॅम्प | वार्ताहर

नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटर इथल्या मैदानावर आज ६३ जागांसाठी लष्कर भरती पार पडत आहे. अवघ्या ६३ जागांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातील ३० हजार पेक्षा अधिक तरुण दाखल झाल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या तरुणांना राहण्याची सोय नाही, जेवणाची व पाण्याचीदेखील सोय नाही.

वेगवेगळ्या भागातून आलेल्या या तरुणांनी परिसरातील मंदिर, समाजमंदिर, दुकानांचे चौथरे भरून गेले आहेत. मिळेल त्या ठिकाणी या तरुणांनी रात्र काढली. सकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या तरुणांच्या पाण्याची व्यवस्था केली, दुपारी पुरी भाजी केंद्रावर लागलेली भली मोठी रांग येथील भरती प्रक्रियेला आलेल्या बेरोजगार तरुणांची वाढलेली संख्या दाखवत असल्याचे दिसून आले.

या भरतीसाठी राज्यातूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह देशभरातून हजारो बेरोजगार तरुण नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.  सोल्जर जनरल ड्युटी, हेअर ड्रेसर, हाऊस कीपिंग अशा वेगवेगळ्या ट्रेडमनच्या ६३ जागांवर भरती आज याठिकाणी पार पडत आहे. आजपासून सहा दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे.

लष्कर भरती आज पहाटेपासून सुरु आहे. याठिकाणी प्रचंड गर्दी असून राज्यातील सुमारे 30 हजार युवकांची हजेरी लागली असल्याची माहिती प्रतिनिधीकडून समजते आहे. कागदपत्रे तपासणी, उंचीची आनंद रोड मैदानावर तपासणी इतर प्रक्रिया टी ए मैदानावर सुरू आहे.

आज पहाटे चार वाजता या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र येथील गर्दी बघून मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची माहित समजली. लष्करी अधिकारी, पोलिसांच्या उपस्थितीत ही भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे.

अनेकांनी भरतीच्या आदल्यादिवशीच हजेरी लावल्याने बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर आणि रस्त्याच्या कडेलाच अनेक तरुणांनी उघड्यावरच आपला मुक्काम केलेला दिसून आला.  गेल्या वर्षी याच ठिकाणी भरती प्रक्रियेला आलेल्या तरुणांची चेंगराचेंगरी झाली होती, त्यात तीन तरुण जखमी झाले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!