देवळालीत 21 दुकाने फोडली; अवघे 11 हजार रुपये चोरट्यांच्या हाती

0
देवळाली प्रवरा (वार्ताहर) – येथील बाजारतळ व सोसायटी नाक्यावरील तब्बल 21 दुकाने अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री फोडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
देवळाली प्रवराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने दुकाने फोडण्याची पहिलीच वेळ असून स्थानिक पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. एवढी दुकाने फोडून चोरट्यांच्या हाती अवघे 11 हजार रुपये लागले आहेत.
दरम्यान, या घटनेचा तातडीने तपास लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. देवळाली प्रवरा बरोबरच राहुरी फॅक्टरी परिसरातील अनेक चोर्‍यांचा तपास गुलदस्त्यात असताना एकाचवेळी 21 दुकाने फुटल्याने स्थानिक पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक पोलिसांचे रात्रीच्या गस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने अज्ञात चोरट्यांनी त्याचा फायदा उचलीत भर बाजारतळावरील 18 दुकाने व सोसायटी नाक्यावरील 3 दुकाने फोडली.
देवळाली प्रवरा बाजारतळ व सोसायटी नाक्यावर गुरूवारी (दि.05) पहाटे अज्ञात चोरट्यांनी बाजारतळावरील 18 दुकाने एकामागोमाग एक फोडली. त्यामध्ये हॉटेल जयमल्हार, गायत्री कृषी सेवा केंद्र, डॉ.नेहे, केशव गोविंद इलेक्ट्रीक, हॉटेल दत्तभुवन, शाकीर पान सेंटर, मिरावली पान सेंटर, आदर्श हेअर स्टाईल, सतीश केश कर्तनालय, शांती मेन्स पार्लर, सहारा पान, कालीका भांडी भांडार,
नटराज हेअरस्टाईल, आशा टी हाऊस, गुरूदत्त रसवंतीगृह, स्वामी मेडीकल, स्वामी समर्थ किराणा, दीपक गायकवाड यांची पानटपरी, स्वागत हेअर सलून, सुविधा कॉर्नर, टाईमपास पान स्टॉल, गुरूमाऊली दूध संकलन केंद्र, श्रीराम कुशन, फरीन चिकन सेंटर, सानिया चिकन सेंटर, अशी तब्बल 21 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून प्रत्येक दुकानातून रोख रक्कमे व्यतिरिक्त कोणत्याही मालाला चोरट्याने हात लावला नाही.
देवळाली प्रवरा परिसरात राहुरी पोलीस ठाण्यातून गस्त घालणारे स्वतंत्र वाहन देण्यात आले आहे. परंतु हे वाहन गस्त घालण्याऐवजी गणेश हौसिंग सोसायटीच्या बोळीत रात्रभर उभे करून चालक गाडीतच झोपा काढत असल्याचे नागरिकांनी सांगीतले.
यापूर्वी अनेक वेळा नागरिकांनी गस्ती संदर्भात तक्रारी केल्या असतानाही पोलीस मात्र, गस्तीकडे डोळेझाक करीत आहेत. याबाबत येथील व्यापारी रमेश टिक्कल, सावळेराम कदम, डॉ.नितीन नेहे, विजय जेजुरकर, प्रविण चव्हाण, शाकीर शेख, सुखदेव हुडे, बाबा शेख, भीमराज सोनवणे, अरूण हुडे, शकील तांबोळी, संजय सोनवणे, मन्सूर बागवान, गोविंद चव्हाण, प्रविण देशमुख, अशोक पठारे, दीपक गायकवाड, शौकत शेख,
दादा ताकवाले, रंगनाथ ढूस यांच्यासह नागरिकांनी पोलीस ठाण्याकडे तक्रार केली आहे. परंतु पोलिसांनी 21 ठिकाणी चोर्‍या होऊनही कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
पोलीस कागदोपत्री गुन्हे दाखल करण्याचे टाळाटाळ करून देवळाली प्रवरात गुन्हेगारी कशी कमी आहे? हे कागदोपत्री वरिष्ठ अधिकार्‍यांना दाखवितात. त्यामुळे येथील पोलीस ठाणे मंजूर असूनही केवळ गुन्हेगारी कमी असल्याने पोलीस ठाणे उभारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे नागरिकांनी सांगीतले.

  गेल्या शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल धनलक्ष्मीसमोर बिघाड झालेल्या ट्रकचालकास अज्ञात दोन व्यक्तींनी सुरा व गावठी कट्टयाचा धाक दाखवून ट्रकचालकाजवळील 38 हजार रुपयाची रोख रक्कम लुटून नेली. घटनास्थळी धार्मिक कार्यक्रमाची एक पत्रिका सापडली असून त्या पत्रिकेवरील नाव नेवासा येथील आहे. परंतु पोलिसांनी हे नाव बाहेर येऊ दिले नाही. यामागे पोलिसांचे गौडबंगाल काय? हे मात्र, समजू शकले नाही. मागील आठवड्यात साईशान मोटार्स हे दुकान फोडून इंडिका कार चोरी झाली. त्याचा तपास पोलिसांना लावता आला नाही. देवळाली प्रवरासह राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला असून पोलिसांची भीती कमी होत असल्याने गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे.

LEAVE A REPLY

*