Sunday, May 5, 2024
HomeनाशिकBlog : संकटकाळातील देवदूत : ‘स्वच्छता कर्मचारी’

Blog : संकटकाळातील देवदूत : ‘स्वच्छता कर्मचारी’

संपूर्ण जग सध्या विचित्र अशा संकटाचा सामना करतंय. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सर्वत्र आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी पडलेली दिसतेय. कुणा अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून सुद्धा सर्वसामान्य माणूस चार हात अंतर ठेवून राहतोय. पण अशाही परिस्थितीत काही लोक मात्र देवदूता प्रमाणे अहोरात्र झटत आहेत, केवळ त्यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय. अशा या सेवादूतांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

देवदूत अर्थात आपले स्वच्छतादूत  (भाग १)

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांना सुट्टी आहे. त्यामुळे कुठेही जायची घाई नाही. त्यामुळे सकाळचा अलार्म बंद करून पुन्हा एक छान डुलकी काढावी असे वाटते. रात्री टीव्ही पाहत जागरण केल्यावर सकाळच्या थंड हवेत छान डोळा देखील लागतो आणि जाग येते तीच मुळी घंटागाडीच्या आवाजाने.

आमच्याकडे सकाळीच घंटागाडी येते. अगदी दररोज न चुकता. सगळा देश लॉकडाऊन झाला तरी या नेमात खंड पडलेला नाही. सहज मनात विचार आला जर हे स्वच्छतादूत सुद्धा घरात राहिले असते तर? समजा, त्यांनी अशा कठीण परिस्थितीत हे सफाईचे काम करण्यास नकार दिला असता तर?

शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीगचे ढीग साचले असते. आधीच कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या आपल्यावर अस्वच्छतेच नवीनच संकट उभं राहिलं असतं. त्यांनाही वाटतंच असेल ना भीती आपल्या जीवाची? त्यांनाही काळजी असेल च ना आपल्या कुटुंबाची? भले सरकार या कामाचा त्यांना मोबदला देतंय परंतु कोणत्याही मोबदल्या पेक्षा जीवाची किंमत कधीही जास्तच ठरेल.

तरीही हे स्वच्छतादूत इमाने इतबारे आपली सेवा बजावत आहेत. शहर स्वछ ठेवत आहेत. सध्या तर आणखीनच नवीन समस्या निर्माण झालीय. कोरोनाग्रस्त भागातला कचरा जमा करण्याची. ज्या भागात प्रवेश करायला भले भले घाबरतील तेथे जाऊन स्वच्छता करणे हे मोठे आव्हानच आहे.

म्हणूनच या दूतांची सर्वात प्रथम आठवण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना शक्य होईल तेवढी मदत आपण अवश्य करावी. शक्य होईल तेवढी स्वच्छता आपणही ठेवावी. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच तो त्यांच्याकडे सुपूर्द करावा.

कधीतरी श्रमदान करून आपल्या घर, सोसायटीचा परिसर स्वछ ठेवावा. त्यांना उत्तम प्रकारचा मास्क, हँडग्लोव्हज, कॅप, पायात उत्तम प्रकारचे बूट मिळायला हवेत. सरकार, समाजसेवी संस्था आणि आपण नागरिकांनी याची नक्कीच काळजी घ्यायला हवी.

कारण सध्याच्या वातावरणातच काय पण कायमच स्वछतेच महत्त्व अबाधित आहे आणि हे स्वछतादूत कोणत्याही देवदूता पेक्षा कमी नाहीत या लेखमालेच्या पहिल्याच भागात या देवदूताना माझा मानाचा मुजरा.  “तुमच्या शिवाय या संकटाचा सामना करण्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही . तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत , तुमच्या कष्टाची आम्हाला सदैव जाणीव आहे .”
मनःपूर्वक धन्यवाद .

तनुजा मुळे/मानकर (लेखिका ब्लॉगर आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या