संगमनेर : कनोलीत डेंग्यूचे थैमान, सासू-सुनेचा बळी

0
13 जणांवर उपचार सुरू, आरोग्य पथक ठाण मांडून
आश्‍वी खुर्द (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील चुलत सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर याच परिसरातील सुमारे 13 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या सर्व रुग्णांवर संगमनेर येथील विविध खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदारसंघातील कनोली या गावातील 1200 लोकवस्ती असलेल्या वाबळे वस्तीवर राहणार्‍या चहाबाई शिवाजी वर्पे (वय-60) यांचे 8 नोव्हेंबर तर सुमन जगन्नाथ वर्पे (वय-65) यांचे 12 नोव्हेंबर रोजी या चुलत सासू-सुनेचा डेंग्यूसदृश आजाराने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संगमनेर येथील विविध खाजगी रुग्णालयांत योगेश वाबळे, जगन्नाथ वर्पे, विठ्ठल वर्पे, निसार शेख, सुलतान शेख, चाँद खाला शेख, शीला वर्पे, जयराम वर्पे, अतुल जगताप, नीलम रहाणे हे कनोली येथील ग्रामस्थ उपचार घेत असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. तर शिवाजी थोरात यांच्या कुटुंबातील चौंघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
या घटनांमुळे कनोली परिसरातील ग्रामस्थ भीतीखाली वावरत असल्याची माहिती ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्‍वी येथील जनसेवा कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी भारत गिते यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती घेत ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ना. विखे पाटील व शालिनीताई विखे यांनी तात्काळ आरोग्य विभागाला उपाय योजना करण्याचे आदेश दिले असून लवकरच ते घटनास्थळी भेट देणार असल्याचे श्री. गिते यांनी सांगितले.
दरम्यान मागील तीन दिवसांपासून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आश्‍वी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. सुनील काळेबाग व त्यांच्या 15 जणांचे पथक परिसरात जंतुनाशक फवारणी करीत, रुग्णांची माहिती घेत ठाण मांडून बसले आहे. या पथकाने बाबळे वस्तीवरील अनेक घरांना भेटी दिल्या. नंतर अनेक ठिकाणी बंद पडलेल्या गोबर गँसच्या टाक्यांमध्ये डेंग्यूचे डास आढळून आल्याने तात्काळ परिसरात प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत व परिस्थितीवर हे पथक लक्ष ठेवून आहे.
संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना चहाबाई शिवाजी वर्पे व सुमन जगन्नाथ वर्पे यांच्यावर येथील डॉक्टरने उपचारादरम्यान हालगर्जीपणा केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून या डॉक्टरची प्रशासनाने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सीताराम वर्पे, हरिभाऊ चौधरी, सागर वर्पे, इंद्रभान चौधरी, शिवाजी वर्पे, पाराजी वर्पे, रमेश वर्पे, किसन हारदे व स्वप्निल वाबळे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

9 नोव्हेबर रोजी कनोली ग्रामस्थांनी घटनेची महिती दिल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वत: आश्‍वी खुर्द केंद्राचे प्रमुख डॉ. सुनील काळेबाग व आरोग्य विभागाचे 15 कर्मचारी या परिसरात ठाण मांडून असून घरोघरी जात आम्ही माहिती घेत प्रतिबंधक औषधाचे वाटप केले आहे. या परिसरात बंद पडलेल्या गोबरगॅसच्या टाक्यांमध्ये डेंग्यूचे डास आढळले असून त्यावर फवारणी करण्यात आली आहे. तर एका महिलेचा मृत्यू डेंग्यूने झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून दुसर्‍या महिलेचा अहवाल येणे बाकी आहे. तरी या घटनेची सविस्तर चौकशी करीत प्रशासनाला अहवाल सादर करण्यात येईल.
-डॉ. सुरेश घोलप
आरोग्य अधिकारी, संगमनेर

 

LEAVE A REPLY

*