Type to search

Featured नाशिक

‘भोसला’त अश्वस्वारांची चित्तवेधक प्रात्यक्षिके; वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अश्वस्वारांनी चित्तवेधक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी माऊंट, डिसमाऊंट, टेंट पिकिंग व संथ संचलनाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी केन ड्रिल डेमो या कार्यक्रमाने शोभा वाढवली.
स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोेठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आर्टिलरी सेंटरचे डेप्युटी कमांडंट कौशल किशोरे, कर्नल जे. एल. शर्मा हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रांगणातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यादरम्यान, अश्व पथकाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी सन्मानचिन्ह देऊन केले. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध तेलंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वर्षभरात होणार्‍या उपक्रमांची बक्षिसे अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावर्षीचा आदर्श रामदंडी पुरस्कार श्रेष्ठ कोकणे याने पटकावला. त्यास 4200 रुपयांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला.

तसेच अरुणाचलचे माजी राज्यपाल गेगांग अपांग यांची मानाची तलवार, स्मृतिचिन्ह व स्कॉड्रन लीडर शहीद निनाद मांडवगणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांकडून ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र वाणी व कर्नल सिंघा, प्राचार्य मधुकर लोहकरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!