सरकारच्या हुकुमशाहीमुळे लोकशाही दुबळी!

0

टाकळीभान व्यापारी संकुल उदघाटन; डॉ. विखे यांची सरकारवर टिका

टाकळीभान (वार्ताहर)-राज्यातील विद्यमान सरकारने तयार केलेला कर्जमाफिचा फार्मुलाच चुकिचा आहे. सत्ता त्यांची आसल्याने कितीही आदळआपट केली तरी त्याचा फारसा परीणाम होत नाही. सरकार हुकुमशाही पध्दतीने राजकिय निर्णय घेउन लोकशाहीला दुबळे करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारवर टिका केली तर धाडी टाकल्या जातात. त्यामुळे टिका कोणावर करावी हेच कळत नाही असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी टाकळीभान येथे आयोजित श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजाराच्या आवारात बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना केले.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी संकूल तसेच पद्मभूषण खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील व्यापारी संकुलाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थानचे महंत उध्दव महाराज यांच्या हस्ते गाळ्यांचे उद्घाटन संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंतराव ससाणे, मुळा-प्रवरा वीज संस्थेचे उपाध्यक्ष जी. के. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार, उपसभापती सचिन गुजर, सचिव किशोर काळे आदी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब दाभाडे यांनी प्रास्ताविक केले.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी मदतकक्ष उभारुन शेतकर्‍यांना फॉर्म भरुन द्यावा, अशी चर्चा मी व जयंतराव ससाणे यांच्यात झाली. त्यामुळे अचूक फॉर्म भरुन देता येईन. शासनाच्या विरोधात बोलले तर लगेच कारवाई होते. आमच्यावर इन्कमटॅक्स खात्याने धाडू टाकल्या तर अधिकार्‍यांना काहीही सापडणार नाही. उलट अधिकारीच आम्हाला काहीतरी ठेवून जातील असे विखे म्हणताच एकच हशा पिकला. आमदारांना आपल्या मतदार संघात कामे करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मिळतो हा निधी तालुक्यातील कामासाठी पुरत नाही. आपले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीबाबत काही बोलून उपयोग नाही, कारण मी त्यांना कधी बघितले नाही.
माझ्या आई जरी जि. प. च्या अध्यक्षा असल्या तरी त्यांना गावासाठी काहीही निधी पुरेसा मिळत नसल्याने जिल्ह्यात कुठेही देवू शकत नाही. सौ. विखे यापूर्वी अध्यक्षा असतांना निधी नियमितपणे मिळत होता. मी जरी सहकारी संस्थेचा अध्यक्ष असलो तरी गणेश सहकारी साखर कारखान्यास 28 कोटी, प्रवरेस 25 कोटी तोटा आहे. राहुरीचे बॅलेंसिंग अजून पाहिले तर कोमात जावे लागेल.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव ससाणे म्हणाले, कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाने कर्जाचे पुनर्गठण करु, असे जाहीर केले. तरी मला यावर खात्री नसून शेतकर्‍यांना कर्जाचे अर्ज जिल्हा बँकेने छापून दिले असून जिल्हा बँकांनी शेतकर्‍यांना सहकार्य करावे अशा सूचना दिल्याने शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
श्रीरामपूर येथील जनावरांचा बाजार बंद होण्याचे कारण स्थानिक कारण आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा करण्यासाठी मार्केट कमिटी प्रयत्नशील असून मात्र या शासनाच्या धोरणामुळे मार्केट कमिटीचे उत्पन्न कमी झाले आहे.
उपसभापती सचिन गुजर म्हणाले की, येथील गाळयांच्या बांधकामास 46 लाख रुपये खर्च आला असून 2 लाख 60 हजार रुपये दरवर्षाला गाळ्याचे भाडे मिळणार आहे. बाजारा समितीला दरवर्षी 14 लाख रुपये सेस मिळणे शासनाने बंद केले आहे. गाळ्यासमोर शेड बांधायचे असल्यास अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी, परस्पर उभारु नये. नगर जिल्ह्याच्या दक्षिणेत आपला खासदार होण्यासाठी आम्ही तिकडे आम्ही जोरदार प्रयत्न करु, असे म्हणताच लोकसभेचे संभाव्य उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासह व्यासपिठावरील सर्वांनी दाद दिली.
या कार्यक्रमास अ‍ॅड. रंगराव गुजर, सरपंच सौ. रुपाली धुमाळ, बापूसाहेब पटारे, अरुण पा. नाईक, पोपटराव गुजर, राहुल पटारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. नितीन आसने, सोन्याबापू शिंदे, सुधीर नवले, विश्‍वनाथ मुठे, नितीन भागडे, राधाकृष्ण आहेर, भाऊसाहेब दाभाडे, कैलास बोर्डे, मुक्ताजी फटांगरे, राजेंद्र तोरणे, दिपक हिवराळे, भाऊसाहेब कांदळकर, डॉ. रामलाल काळे, संदीप शेलार, तालुका विकास अधिकारी किशोर मगर, रमेशराव धुमाळ, चित्रसेन रणनवरे, भाऊसाहेब मगर, शिवाजी धुमाळ, एकनाथ लोखंडे, रावसाहेब मगर, अविनाश लोखंडे, संतोष शहाणे, बशीर बेग, भैय्या पठाण, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, आप्पासाहेब कापसे, नवाज शेख, गणेश छल्लारे, एकनाथ पटारे, पंचायत समिती सदस्य अरुण पा. नाईक, चेतन भुतडा आदी उपस्थित होते.

पवार यांनी दिले राजीनाम्याचे संकेत –
सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, जयंतराव ससाणे यांनी सुचविल्याप्रमाणे तरुण संचालकांना काम करण्यास संधी देण्यात येणार असून श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती लवकरच बदलले जातील. तालुका पंचायत समितीचा मी सभापती असताना मला माजी आमदार बी. के. मुरकुटे यांनी सभापतीपदावरुन काढण्यासाठी खूपच प्रयत्न केले. पण कै. बाळासाहेब विखे पा. यांनी मी सभापतीपदाचा राजीनामा देवू नये असे सागून ते माझ्या पाठिशी उभे होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होण्यासाठी सुध्दा विखे पाटील व व ससाणे यांनी मदत केली. त्यामुळे मला अनेकदा सभापती होता आले. मी निष्ठेने काम करत असून जनता माझ्या मागे आहे. यापुढेही सभापतीपद नसले तरी माझे काम सुरु ठेवून टाकळीभान येथे कांदा विक्री सुरु करणार आहे असेही श्री. पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

*