Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लोकशाही मजबूत असण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला : छगन भुजबळ

Share

नाशिक :

भारत देशात अनेक जाती धर्म प्रांत असतांना आजही या देशात लोकशाही मजबूत पायावर उभी आहे. त्याचे श्रेय हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्याला आहे असे गौरवोद्गार राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काढले. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नकुमार मिश्रा, वकील परिषदेचे निमंत्रक अँँड. जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अँँड. सतीश देशमुख, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अँँड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अँँड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अँँड. अमोल सावंत, अँँड. आसिफ कुरेशी, ज्येष्ठ विधीज्ञ हर्षद निंबाळकर, आशिष देशमुख, यांच्यासह बार कौन्सिलचे सर्व पदाधिकारी सदस्य, गोवा व महाराष्ट्रातून आलेले सर्व ज्येष्ठ विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, १३५ वर्षानंतर देशाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे नाशिकमध्ये आले याचा आनंद आहे. समाजाला आणि न्यायव्यवस्थेला असणारी गरज लक्षात घेता न्यायालयीन कामे तातडीने व्हायला हवी यासाठी मंत्रिमंडळात फास्ट ट्रक पद्धतीने १७१ कोटी रुपयांच्या नव्या इमारतीला मंजुरी दिली. या इमारतीचे सौंदर्य कुठेही कमी होणार याची काळजी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाशिकला निर्माण केलेल्या न्यायालयात सर्व न्याय प्रक्रिया पूर्ण होईल त्यात शंका नाही. त्यामुळे भविष्यात गरजेनुसार नाशिकला खंडपीठ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, राज्यघटनेत तयार केलेला हा कायदा कुठल्या व्यक्तीच्या हातात जाईल त्यानुसार त्याचा तो वापर करत असतो त्यामुळे कायदा योग्य व्यक्तीच्या हातात जाऊन न्याय देण्याची जबाबदारी न्यायालय आणि वकिलांची आहे. सद्याच्या काळात मिडिया ट्रायलमुळे न्याय व्यवस्थेवर दबाव निर्माण होतो तो दबाव झुगारून प्रत्येकाला न्याय मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मीडिया काय म्हणते यावर जामिनावर विचार व्हायला नको तर कागदपत्रे आणि सद्यस्थितीची विचार करून जामीन मिळायला हवा कारण तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता व्यवस्थेने काम करायला हवे. कायदा जिवंत ठेवण्याची आणि जपण्याची जबाबदारी सर्व वकिलांची जबाबदारी आहे. नाशिक जिल्हयात नव्हे तर राज्यभरात जे जे शक्य आहे ती सर्व कामे केली जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, न्याय मिळण्याचा विश्वास म्हणून न्यायपालिकडे बघितले जाते, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांची जनतेचा विश्वास जपण्याचे जबाबदारी आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्व स्तंभाना आपली जबाबदारी चोख पणे पार पाडण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था टिकू शकणार आहे. शासन स्तरावर वकिलांचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्रातील ४० वर्षांहून अधिक काळ वकिली केलेल्या २६ ज्येष्ठ वकिलांचा यावेळी ना. छगन भुजबळ व ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!