श्रीरामपूर व देवळाली पालिकांतील रिक्त पदे भरावीत

0
आमदार कांबळे यांनी अधिवेशनात मांडल्या समस्या
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – विरोधी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये जो प्रस्ताव आणला त्याला अनुसरून श्रीरामपूर व देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विविध समस्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडल्या.
याबाबत आ. कांबळे म्हणाले, श्रीरामपूर व देवळाली प्रवरा या दोन नगरपालिका माझ्या मतदारसंघात आहेत. त्यापैकी श्रीरामपूर नगरपरिषदेमध्ये अनेक दिवसांपासून अपुरे कर्मचारी असल्यामुळे त्याचा ताण इतर कर्मचार्‍यांवर पडत आहे. त्यामुळे नागरिकांचे कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर अपुर्‍या अनुदानामुळे कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर करता येत नाही.
नगरपालिकेकडे प्रशिक्षित कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने फायटर, लेखा विभाग, लेखापरीक्षण विभाग, नगररचना विभाग, अभियंता, संगणक तज्ज्ञ या सर्व विभागांमध्ये कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, तसेच कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, नगरपरिषदेचा दवाखाना डॉक्टर व कर्मचार्‍यांअभावी बंद पडला आहे. तसेच मध्यंतरी पाणी पुरवठ्याच्या तलावात एक 18 वर्षाचा मुलगा पडून तो मरण पावला आहे. तेथेही कर्मचार्‍यांची संख्या अपुरीच आहे. तेव्हा या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी अधिवेशनात केली आहे.

LEAVE A REPLY

*