वाळूच्या ढिगार्‍याखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

0

राहुरी तालुक्यातील घटना

राहुरी (प्रतिनिधी) – मुळा नदीपात्रात राहुरी हद्दीत दरक यांच्या विहिरीजवळ वाळू उपसा करणार्‍या दोन मजूर असलेल्या बारागाव नांदूर येथील सख्ख्या भावांचा वाळूची धडी कोसळल्याने ढिगार्‍याखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी दि. 17 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

काल (दि. 17 ) दुपारच्या सुमारास काही मजूर खोरे व टिकावच्या सहाय्याने वाळू उपसा करत असताना अचानक नदीतील वाळूची धडी कोसळल्याने त्यामध्ये ज्ञानेश्‍वर जालिंदर जाधव(वय 35) व मच्छिंद्र जालिंदर जाधव(वय 29) हे दोघेही ढिगार्‍याखाली अडकले.

वाळूच्या ढिगार्‍यात दबले असताना त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीही न आल्याने अखेर दोघांचाही ढिगार्‍याखाली गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पसरताच लगतच्या गावातील ग्रामस्थांनी मुळापात्रात धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. काही ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक उजे,

 पोलीस हवालदार मोकाटे, शेख यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. नदीपात्रात पोलिसांनी शववाहिकेतून दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात राहुरी ग्रामिण रूग्णालयाच्या वैद्यकीय आधिकार्‍यांच्या खबरी वरून अ.मृ.नं. 87 / 2017 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उजे व हे.कॉ. गोसावी करत आहेत.

 

LEAVE A REPLY

*