श्रीगोंद्यातील तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाहन चोरीच्या गुन्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील भरत मारुती लबडे यास आष्टी (बीड) पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. भरत हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या विषयी 13 दिवस कोणतीही माहिती न देणार्‍या आष्टी पालिसांनी अचानक भरतच्या कुटुंबीयांना फोन करून मृत्यूची माहिती दिली. यामुळे लबडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी (दि. 18) आष्टी पोलिसांनी भरत लबडे याला  संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोन दिवस झाले तरी पोलिसांनी भरतच्या कुटुंबीयांना कोणताही निरोप दिला नाही. भरत घरी का आला नाही याची चौकशी करण्यासाठी त्याचा भाऊ संतोष लबडे यांनी चौकशी सुरू केली. मात्र, पोलिसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या दरम्यान 13 दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी (दि. 30) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संतोष लबडे यांना फोन केला.

भरतची प्रकृती बिघडली आहे. त्याला भेटण्यासाठी येऊन जावे. भरतची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे आईवडील त्यास भेटण्यासाठी जाऊ शकले नाहीत. मुलाला भेटण्यासाठी दुसर्‍या दिवशी जाण्याचे नियोजन करत असताना त्याच रात्री 12 वाजता पोलिसांनी फोन केला. भरत याचा मृत्यू झाला आहे, त्याचा मृतदेह घेऊन जा. या फोनमुळे लबडे परिवारानेे टाहो फोडला. 13 दिवस पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याचा थेट मृतदेह ताब्यात देत आहेत. ही बाब ऐकल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

भरत यास पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ज्या पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होतेे. त्यांची चौकशी करून दोषी आढळणार्‍या आरोपींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कडनोर यांना पुढील तपास देण्यात आला आहे.

  नगर पोलिसांचा काही संबंध नाही –
पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात आले होते. भरतचा मृत्यू बीडच्या कोठडीत झाला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले आहे. या घटनेशी नगर पोलिसांचा काही संबंध नाही.
– साहेबराव कडनोर (श्रीगोंदा पोलीस निरीक्षक)

सीआयडीमार्फत चौकशीची मागणी –
भरत याच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी लबडे कुटुंबीय व नातेवाईकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*