गायकवाड मृत्यू प्रकरण : मध्यरात्रीनंतर ‘सागर’समोर डोकावणारी ‘ती’ व्यक्ती कोण?

0

व्हिसेरा ठेवला राखीव

अहमदनगर (प्रतिनिधी) –  पाईपलाईन रस्त्याकडेला असलेल्या हॉटेल सागरसमोर आढळेला मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असले तरी व्हिसेरा मात्र राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मृत्युचे नेमके कारण समोर आले नाही. पण ज्या रात्री मृतदेह आढळा त्या रात्री हॉटेलच्या बाजुच्या भिंतीकडेने साडेतीन वाजेच्या सुमारास एक व्यक्ती डोकावून गेल्याचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे ही व्यक्ती कोण? कशासाठी डोकावली याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. कदाचित हीच व्यक्ती गायकवाड यांच्या मृत्युचे कारण सांगू शकेल अशी चर्चा सुरू आहे.

गुरूवारी पहाटे सागर हॉटेलबाहेर अरूण गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सोपस्कर पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात आणला. मात्र येथील डॉक्टरांनी पुणे येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पोलीस मृतदेह घेऊन पुण्याला पोहचले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र त्याचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नाही.

ज्या रात्री गायकवाड यांचा मृत्यू झाला, त्या रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास एक व्यक्ती गेटसमोर डोकावून गेल्याचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले आहे. गायकवाड यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्याच ठिकाणी ही व्यक्ती पाहून गेल्याचे दिसते. त्यामुळे ही व्यक्ती इतक्या रात्री येथे कशासाठी आली? नेमके मृतदेह पाहूनच मागे का गेली या प्रश्‍नांच्या उत्तरातच कदाचित गायकवाड यांच्या मृत्युचे कारण दडले असावे अशी चर्चा आहे.

गायकवाड हे हॉटेलात टेबलवर बसले आहेत. तेथून त्यांना कामगारांनी उचलून गेटच्या दिशेने आणताहेत हे दृश्यही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. मात्र मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता तोच भाग नेमके फुटेजमध्ये नाही. त्यामुळे गायकवाड यांच्या मृत्युच्या नानाविध चर्चा सावेडीत सुरू आहेत.

यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शेतकरी आंदोलनात असल्याचे सांगत यावर बोलणे टाळले. कुत्र्यांनी लोचके तोडल्याने मृत्यू झाला तर काहींच्या मते वेगळेच कारण यामागे आहे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

LEAVE A REPLY

*