दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धा ठार

0

पेडगावातील घटना

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील पेडगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या दरोडेखोरांनी पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला.  घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तपासासाठी पथके तैनात केली आहेत.

पडेगाव येथील दरोड्यात मृत झालेल्या महिलेचे नाव सुशीलाबाई जगन्नाथ धगाटे (वय-68) असे आहे. मृत सुशीलाबाई धगाटे या माहेेेरी भावाशेजीरच राहत होत्या. काल पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान धगाटे यांच्या शेजारीच राहणार्‍या त्यांच्या भाचेसून शुभांगी युवराज खेडकर या नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला जात असताना त्यांना सुशीलाबाई धगाटे यांच्या खोलीच्या मागील दरवाजाबाहेर कपडे, पुस्तके व सुटकेस अस्ताव्यस्त फेकलेल्या अवस्थेत दिसले.

त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी हा प्रकार सासरे कांतिलाल खेडकर यांना सांगितला. त्यावर कांतिलाल खेडकर यांनी खोलीत जाऊन पाहिले असता सुशीलाबाई निपचित पडलेल्या होत्या. त्यांनी त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आणखी जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांच्या कानामागे धारधार शस्त्राने वार केल्याचे व रक्त आल्याचे दिसले.

त्यानंतर घरातील सामनाची उचकापाचक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना देण्यात आली. दरोडा पडल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सपोनि नीलेश कांबळे, सपोनि. सीद, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस निरीक्षक पोवार यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगर येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि. पवार यांच्यासह त्यांचे पथक, तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वानपथक, ठसे तज्ज्ञ आदी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने घरापासून शेडगावच्या दिशेने एक किलोमीटर पर्यंत माग काढला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

घटनेबाबत मृत धगाटे यांचे भाऊ कांतिलाल खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दरोडा टाकून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दरोड्यात मृत धगाटे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे डोरले व कानातील चार ग्रॅम वजनाचे सुवर्णफुले असे एकूण 63 हजार रुपयाचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, या दरोड्याच्या घटनेनंतर दरोडेखोरांनी पेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कार्यालयातही दरोड्याचा प्रयत्न केला. तेथे कागदपत्रांची उचकापाचक केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*