Type to search

फिचर्स संपादकीय

चीनमध्ये घातक विषाणूंचे खेळ ?

Share

जगभरात दहशत निर्माण करणारा करोना विषाणू चीनच्या जैविक प्रयोगशाळेतून बाहेर पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील अनेक देश जैविक अस्त्रे तयार करण्यासाठी जिवाणू आणि विषाणूंच्या जनुकीय रचनेत परिवर्तन करण्याच्या खटपटीत आहेत. अशा प्रयत्नांमधील धोक्याची पूर्वकल्पना स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाने पूर्वीच देऊन ठेवली आहे. त्यामुळे अशा जनुकीय फेरबदलांच्या प्रयोगांना कुठपर्यंत परवानगी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होतो?

– प्रा. विजया पंडित

चीनसह संपूर्ण जगभरात सध्या ज्याची दहशत आहे तो करोना विषाणू चीनमधील वुहानमध्ये असलेल्या चीनच्या पी-4 या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. चीनमध्येच करोना विषाणू सर्वप्रथम आढळून आला, म्हणूनसुद्धा ही शंका व्यक्त करण्यात येत आहे. 1992 मध्ये बर्ड फ्लू चीनमधूनच जगभरात पसरला होता. 2003 मध्ये दक्षिण चीनमधून सार्स नावाच्या विषाणूचा फैलाव झाला होता आणि जगातील सव्वीस देशांना या विषाणूने विळखा घातला होता. 2012 मध्ये मर्स नावाच्या विषाणूचा प्रसार चीनमधूनच सुरू झाला होता आणि सत्तावीस देशांमध्ये खळबळ उडवून देणार्‍या या विषाणूने आठशेपेक्षा अधिक बळी घेतले होते.

या सर्व विषाणूंचा उद्भव वुहान शहरातूनच झाला असून तिथेच चीनची पी-4 ही जैविक प्रयोगशाळा आहे. त्यामुळेच एखाद्या अन्य विषाणूच्या जनुकीय रचनेत फेरफार करताना चुकून करोनाचा विषाणू प्रयोगशाळेच्या बाहेर पडला असावा आणि जगावर जीवघेण्या साथीच्या आजाराचे संकट आले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सुमारे दीड महिन्यापर्यंत हा एक किरकोळ आजार असल्याचे चीनकडून सांगितले जात होते. जेव्हा आजार नियंत्रणाच्या बाहेर गेला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) आणि जगातील अन्य देशांना चीनने ही माहिती दिली. परंतु तोपर्यंत जगातील पस्तीसपेक्षा अधिक देशांत हा आजार फैलावला होता.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी जगाला जे दोन इशारे दिले होते त्यात जनुकीय अभियांत्रिकी (जेनेटिक इंजिनिअरिंग) या विषयाशी खेळ न करण्याविषयीच्या इशार्‍याचाही समावेश होता. आजकाल विशेषतः चीन आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ जनुकीय प्रयोगशाळेत जिवाणू आणि विषाणूंच्या संरचनेत बदल करून एकतर नवे विषाणू तयार करीत आहेत किंवा त्यांच्या मूळ प्रवृत्तीत बदल करून ते अधिक घातक करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे बोलले जाऊ लागले आहे. मानवी आरोग्याच्या हिताच्या नावाखाली हे बदल केले जात आहेत. परंतु असे विषाणू बेकाबू झाल्यास मोठ्या संकटाचा मुकाबला करावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशाच जीवघेण्या खेळाचा करोना विषाणू हा एक भयावह परिणाम असू शकतो का? अशी शंका घेण्यास बराच वाव आहे.

जनुकीय संरचनेत बदल करून तयार केलेल्या जिवाणूंचा किंवा विषाणूंचा प्रकोप दाखवणारे अनेक चित्रपट हॉलिवूडमध्ये तयार करण्यात आले आहेत. चित्रपटातील या संकल्पना आता प्रयोगशाळेतील वास्तव बनू पाहत आहेत. 2014-2015 मध्ये इबोला विषाणूने हजारो लोकांचा बळी घेतला होता. इबोला हा नैसर्गिक विषाणू होता आणि त्याची सर्वात पहिल्यांदा 1976 मध्ये आफ्रिकेतील सुदानमध्ये लागण झाली होती. जैरे या आफ्रिकी देशातील एका ननच्या रक्ताचा नमुना तपासल्यानंतर इबोला विषाणूची माहिती मिळाली होती. सुमारे चाळीस वर्षे शांत राहिलेल्या या इबोला विषाणूचा प्रकोप सहारा आफ्रिकेत सुरू झाला होता. परंतु तो साथीचे स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. जर नैसर्गिक इबोला विषाणू भयंकर तांडव करू शकतो तर जनुकीय बदलातून तयार केलेले विषाणू खूपच घातक ठरू शकतात, कारण ते जनुकीयरीत्या संवर्धित केलेले असतात.

अमेरिकेतील व्हिस्कोसिन मेडिकल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ येशोहिरो कावाओका यांनी स्वाइन फ्लूच्या विषाणूच्या जनुकीय रचनेत परिवर्तन करून त्याला इतके शक्तिशाली बनवले की, मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्याचा मुकाबला करू शकली नाही. अशा स्थितीत असा प्रश्न उपस्थित होतो की, अखेर विषाणूंच्या संरचनेत बदल करून असे घातक विषाणू मुळात तयारच का केले जातात? कावाओका यांनी केलेला दावा असा की, त्यांचा प्रयोग 2009 मध्ये एच 1-एन 1 विषाणूत होत असलेल्या बदलांवर नजर ठेवण्यासाठी नव्या आकारात करण्यात आला होता. कावाओका यांनी असाही दावा केला होता की, त्यांनी 2014 मध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा प्रयोग करून 1918 मध्ये फैलावलेल्या स्पॅनिश फ्लूसारखा जिवाणू बनवला असून याच जिवाणूमुळे पहिल्या महायुद्धानंतर पाच कोटी लोक दगावले होते. पोलिओ, रेबिज अशा रोगांच्या लसी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ स्टेनली प्लॉटकिन यांनीही कावाओका यांच्या कामाच्या औचित्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

ज्या आजारांवर लस उपलब्ध नाही अशा लस बनवण्याचे काम एखादे सरकार किंवा औषध कंपनी करणार आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. कावाओका यांच्याकडून प्रयोगशाळेत निर्माण करण्यात येत असलेल्या धोकादायक विषाणूंच्या संदर्भाने रॉयल सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि ब्रिटीश सरकारचे माजी विज्ञान सल्लागार लॉर्ड मे यांनीही चिंता प्रकट केली होती. त्वचेच्या कर्करोगावर उपचारांसाठी टी-वॅक थेरपीचे संशोधन नुकतेच करण्यात आले आहे. या थेरपीनुसार, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवूनच कर्करोगाशी लढण्याचे बळ दिले जाईल.

अशा प्रकारचे संशोधन घातक ठरू शकते याची पूर्वकल्पना स्टीफन हॉकिंग यांनी देऊन ठेवली आहे. कारण जनूक संवर्धित करण्याच्या दुष्परिणामांसंबंधी त्यांच्या निष्कर्षांचे योग्य परीक्षण करण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, आनुवंशिक स्वरुपात संवर्धित असे जिवाणू तयार करण्यात आले आहेत जे तीस पटींनी अधिक रसायनांचे उत्पादन करू शकतात. जनुकांमध्ये परिवर्तन करून या जिवाणूंच्या अस्तित्वाला आकार दिला गेला आहे. हे एक असे संशोधन आहे ज्यायोगे जगातील रसायन उत्पादन कारखान्यांत पूर्णपणे आनुवंशिक स्वरुपात संवर्धित केलेल्या जिवाणूंचाच वापर केला जाईल, असे मानले जात आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी इ-कॉली नावाच्या जिवाणूचा वापर केला आहे. वस्तूतः जिवाणू एकपेशीय असतात. परंतु हे स्वतःचे सातत्याने विभाजन करीत राहतात आणि आपला समूह तयार करतात.

शास्त्रज्ञ या जिवाणूंवर प्रतिजैविकांचा वापर करतात आणि त्यामुळे उत्पादनक्षम असणार्‍या पेशीच जीवित राहतात. या पेशींच्या जनुकात बदल करून त्यांना अशा प्रकारे रसायन उत्पादनासाठी वापरावे लागते. रसायनांच्या उत्पादनांचा वेग एक हजार पट अधिक बनतो. हे संशोधन ‘सर्वाइव्हल ऑफ दि फिटेस्ट’ या तत्त्वावर आधारित आहे. या संशोधनामुळे फार्मास्युटिकल बायोफ्युएल आणि अक्षय रसायनेही तयार केली जातील. परंतु मानवी शरीरासाठी भविष्यात यामुळे काय धोके असू शकतात, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरीतच आहे.

शास्त्रज्ञांनी निसर्गाच्या विरुद्ध विषाणूंच्या मूळ प्रकृतीत हस्तक्षेप करावा का, हा मूलभूत प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की, तयार करण्यात आलेले जिवाणू आणि विषाणू कितपत सुरक्षित ठेवले जाणार? जर जाणूनबुजून किंवा अपघाताने हे जिवाणू किंवा विषाणू बाहेर पडले तर त्यांच्यामुळे जे नुकसान होईल त्याला कोण जबाबदार असणार? जनुकीय फेरबदल करून विषाणू अधिक शक्तिशाली बनवण्याचा खटाटोप खरोखर जैविक अस्त्रे तयार करण्यासाठी केला जात असेल तर ते जगाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणार आहे. कारण जैविक अस्त्राच्या सहाय्याने एखाद्या देशावर हल्ला चढवला गेला तर त्यापासून बचाव करणे अत्यंत कठीण होऊन बसेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!