Friday, April 26, 2024
Homeनगरविटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा?

विटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा?

महापालिकेसह सर्वच यंत्रणा संभ्रमात ः नियमही कठोर करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अमरधाममध्ये विटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा, याबाबत अद्यापही महापालिका अंधारात आहे. अंत्यविधी झालेल्याची नोंद नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संबंधिताचे नातेवाईकही याबाबत शांत असल्याने गोंधळ वाढत आहे.

- Advertisement -

अमरधाममध्ये सोमवारी अंत्यविधी झाल्यानंतर एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढल्याचे समोर आले होते. त्यानंतर नवग्रह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विधीपूर्वक अंत्यविधी केला होता. मात्र या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत होता. महापालिकेची यंत्रणा अमरधाम सक्षम नसल्यानेच हा प्रकार ओढवल्याचा आरोप होत होता. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही या प्रकारानंतर लगेच बैठक घेऊन अमरधाम येथील सुविधांचा आढावा घेत वेगवेगळ्या सूचना केल्या. असे असले तरी अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा, त्यांचे नातेवाईक कोण, अमरधाममधील कर्मचार्‍यांना याची कोणतीच माहिती कशी नाही, मृतदेह अर्धवट अवस्थेत बाहेर काढणारे कुत्रेच होते की अन्य काही कारणामुळे तो बाहेर निघाला असे अनेक प्रश्‍न विचारले जात आहेत.

मात्र हा प्रकार घडल्यानंतर आता गार्डन, आरोग्य आणि बांधकाम विभागाचे प्रत्येकी तीन कर्मचारी अतिरिक्त तेथे नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच अमरधामच्या संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीचेही आदेश दिले असून, त्यानुसार इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या प्रत्येकाची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे करणार?
यापुढे अंत्यविधीसाठी पार्थिव तेथे आल्यानंतर संबंधित नातेवाईकांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्याचा विचार महापालिकेचा आहे. प्रमाणपत्र आणि नगरसेवकाचे पत्र यापैकी एक किंवा दोन्हीही बंधनकारक करावे का, असा विचार सुरू आहे. तसेच तेथील कामकाज खासगी संस्थेकडे सोपविण्याचाही विचार आहे. नोंदीसह सर्व जबाबदारी त्या संस्थेवर सोपविण्याचाही एक विचार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या