गुहा येथे आढळला मुलाचा अर्धवट जळालेला मृतदेह

0

श्‍वानपथक येऊनही धागेदोरे मिळाले नाहीत 

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- नगर- मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या परिसरातील रामदेव राजपुरोहित ढाब्याजवळ सुमारे 12 वर्षांच्या बालकाचा मृतदेह काल शनिवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह दुसरीकडून आणून तो घटनास्थळी जाळण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अज्ञात व्यक्तीने गोणीत मृतदेह आणून गुहा गावाच्या परिसरात ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकून जाळला आहे. नाजूक प्रकरणातून किंवा संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय उपअधीक्षक अरुण जगताप यांनी व्यक्त केला आहे.

मृतदेहाची घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मुलाचा खून गळा दाबून करण्यात आला असून साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज राहुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतदेह नगर-मनमाड महामार्गाच्या पश्‍चिम दिशेला आढळून आल्याने नगरच्या दिशेने हा मृतदेह आणून जाळण्यात आला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

हा मृतदेह दुसरीकडून प्लॅस्टिकच्या गोणीत घालून आणला. त्यावर पेट्रोल टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. मृतदेहाचे तळपाय सोडता सर्व शरीर जळालेले आहे. घटनास्थळी मुलाच्या अंगावरील जीन्स पँट व प्लॅस्टिक गोणीचे तुकडे वगळता कुठलाही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांना आव्हानच ठरणार आहे.

हा मृतदेह कोणाचा? कुठून व कसा आणला? या महामार्गावरून हजारो वाहने रोज धावत असतात. मग हा प्रकार कोणाच्याच लक्षात कसा आला नाही? तसेच ढाबा जवळच आहे व या ढाब्यावरही मोठी वर्दळ असते. तरी हे कृत्य कुणाच्याच पाहण्यात कसे आले नाही? हा यामध्ये महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह आसपासच्या परिसरातीलच असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, परिसरात नगर मनमाड राज्य मार्गालगत मोठ्या प्रमाणात अनेक हॉटेल व ढाबे झालेले आहेत. अनेक ठिकाणी अवैध धंदे चालतात. अशाच एखाद्या हॉटेलमध्ये हा मुलगा वेटर म्हणून काम करीत असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरातील कोणाचा मुलगा गायब असल्यास त्यांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मृताचा एक पाय अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून उर्वरीत शरीर पूर्ण जळाले आहे. घटनास्थळी काहीच धागेदोरे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांसमोर घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना मिळाल्यानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप यांच्यासह श्‍वानपथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेंसिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांची दिशाभूल  –
गुहा-देवळाली शीव रस्त्यावर गुहा गावाच्या परिसरात मृतदेह असूनही गुहाचे ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मृतदेह देवळाली हद्दीत असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. पोलिसांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. त्यानंतर घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले.

जबाबदारी झटकली – 
हा मृतदेह शनिवारी सकाळीच अनेकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांना निरोप गेला. मात्र, देवळाली प्रवरा, गुहा व राहुरी येथे आरोग्य केंद्र असूनही दुपारी 2 वाजेपर्यंत कोणताही वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करण्यासाठी पुढे आला नाही. तर हाकेच्या अंतरावर असलेल्या गुहा येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपल्याला शवविच्छेदनाचा अनुभव नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली. तर अन्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी हद्दीचा वाद उकरून वेळ मारून नेली. या घटनेचा नागरिकांनी निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

*