Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदाऊदी बोहरा ट्रस्ट घरपोच देणार औषध सेवा; ६५ पॅरामेडिकल्स; तीन रुग्णवाहिका मदतीला

दाऊदी बोहरा ट्रस्ट घरपोच देणार औषध सेवा; ६५ पॅरामेडिकल्स; तीन रुग्णवाहिका मदतीला

नाशिक | प्रतिनिधी 

संचारबंदी काळात रुग्णांना अौषधे उपलब्ध व्हावी यासाठी दाऊदी बोहरा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट गरजू रुग्णांना घरपोच औषधे उपलब्ध करुन देण्याची सेवा पुरवत आहे. या माध्यमातून ते अनेकांच्या वेदनेवर फुंकर घालत माणुसकीचा धर्म पाळत आहे.

- Advertisement -

करोना संसर्गपासून नाशिक व नाशिककर सुरक्षित रहावे यासाठी प्रत्येक जण खारीचा वाटा उचलण्यासाठी धडपडत आहे. काही जण घरपोच भाजीपाला, किराणा आदी जीवनावश्यक पुरवित आहेत. या संस्थांच्या प्रयत्नांमुळेच कोरोनाचे संकट आजही नाशिकपासून दूर आहे.

सेवा देण्याच्या हेतूनेच जिल्हाधिकारी कार्यालयात अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट, नाशिकचे पदाधिका‌ऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्यावतीने शासनाला मदतीची तयारी दर्शविली. जिल्हाधिकारी मांढरे यांनी गरजू रुग्णांना आवश्यक औषधे घरपोच पुरविण्याची सेवा आपल्या ट्रस्टच्यावतीने देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या सदस्यांनी तत्काळ या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला आहे.

‘स्टे होम स्टे सेफ’ असा संदेश देत ट्रस्टकडून या सेवेसाठी सैफी अॅब्युलन्स मेडिकल गट तयार करण्यात आला असून, या गटांतर्गत ६५ पॅरामेडिकल्स आणि तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संचारबंदी असली तरी जीवनावश्यक बाबी जसे किराणा आणि औषधी, भाजीपाल्यासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. त्यामुळे साहजिकच गर्दी होते.

हीच बाब ओळखून आता दाऊदी बोहरा ट्रस्टने रुग्णांना घरपोच औषधी देण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तसेच व्हॉट्स अॅप नंबरही दिला आहे. नाशिक शहरातील रुग्ण त्याद्वारे ट्रस्टच्या सेवा कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकतात. मात्र यासाठी रुग्णाकडे संबंधित औषधाबाबतचे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे यासाठी ट्रस्ट कोणताही मोबदला घेत नाही.

जर तुम्हाला घरपोच औषधांची सुविध हवी असेल तर ट्रस्टच्या ९७००००९७५३ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या उपक्रमाचे कामकाज अम्मार मियाजी बोहरा पाहणार असून यावेळी अलीसागर सुबा,मुफद्दल कांचवाला,हकीमुद्दीन सलेह उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या