दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो…; दत्तजयंती उत्सव साजरा; एकमुखी दत्तमंदिरात भाविकांची रीघ

दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो…; दत्तजयंती उत्सव साजरा; एकमुखी दत्तमंदिरात भाविकांची रीघ

नाशिक । प्रतिनिधी

श्री दत्तजयंतीनिमित्त बुधवारी शहरातील वेगवेगळ्या दत्तमंदिरांत ‘दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दिगंबरा…दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात दत्तजयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

गोदाघाटावरील प्रसिद्ध एकमुखी दत्तमंदिर, ढगे महाराज समाधी मंदिर, शिंगाडा तलाव येथील दत्तमंदिर, राष्ट्र संत जनार्दन स्वामी आश्रमासह सर्वच दत्तमंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. लघुरुद्राभिषेक, श्री दत्त जन्म सोहळा, महाआरतीसह विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.

घरोघरी सप्ताह, मंदिरांमधील पारायणाची सांगतादेखील झाली. दत्तजयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध भागातील दत्तमंदिरांवर आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जयंती उत्सव, आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले. तसेच शहरातील व जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दत्तमंदिरातदेखील उत्सव साजरा करण्यात आला.

अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला असल्याचा उल्लेख विविध ग्रंथांत आहे. दत्ताच्या मंदिरांत गुरुचरित्राचे पायायण, भजन, लघुरुद्राभिषेक, दत्त जन्म सोहळा महाआरती, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. यानिमित्त ठिकठिकाणी श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहदेखील घेण्यात आला.

दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती. आठ दिवसांपासून मंदिर 24 तास खुले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा दत्तजयंतीला समारोप झाला.

– मयूर बर्वे, मुख्य पुजारी, एकमुखी दत्तमंदिर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com