दत्ताशेठ सेनेवर रूसले

0

नगर टाइम्स,

आठवडाभरात निर्णय, भाजपनेही लावली फिल्डींग

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रवेशाचा सिक्सर ठोकत शिवसेनेने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली खरी, मात्र माजी सभापती मिस्टर दत्ताशेठ जाधवांचा रुसवा काढण्यात शिवसेनेला यश आलेलं नाही. त्यामुळंच त्यांचा शिवसेना प्रवेशाचा मुर्हूत हुकल्याची माहिती सूत्रांनी दिली. दत्ताशेठ यांच्याभोवती भाजपनेही फिल्डींग लावली आहे. महापालिकेच्या गत सार्वत्रिक निवडणुकीत सुवर्णाताई जाधव या मनसेकडून विजयी झाल्यानंतर त्यांनी ‘शिवसेनेशी संधान’ बांधले. सभापती पदाच्या खुर्चीची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या सुवर्णाताईनी ‘लाखमोला’च्या गोष्टी करत ती पूर्ण केली. त्या शिवसेनेत प्रवेश करणार हेही त्यावेळी जाहीरपणे सांगितलं गेलं. महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला.

वार्डरचना अन् आरक्षणही पडलं. मात्र अजूनही त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला नाही. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आजी-माजी कारभार्‍यांच्या शिवसेना प्रवेशाचा सिक्सरही ठोकला. पण दत्ताशेठ रुसल्याने त्यांचा प्रवेश मात्र लांबला. नव्या वार्ड रचनेत माजी सभापती मिस्टर दत्ताशेठ यांच्या वार्डाची तोडफोड झाली. दुसरीकडे भाजपने किशोर डागवाले यांची प्रभाग 13 मधून उमेदवारी घोषितही केली. त्यामुळं शिवसेनेने दत्ताशेठ यांना डागवाले विरोधात ‘तयारी’चा निरोप दिला. शेठने तयारीही केली. पण मधेच सुभाष लोंढेचा एन्ट्री झाली. त्यामुळं शिवसेनेने शेठला थांबण्याचा सांगत 15 नंबरचा पर्याय दिला, पण फायनल काही सांगितलं नाही. नेमकं याच कारणामुळं दत्ताशेठ शिवसेनेवर रुसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं दत्ताशेठनेही आता स्वबळाची चाचपणी सुरू केलीय. तसंही त्यांनी मनसे सोडलेली नाही. कदाचित मनसेचं शहरप्रमुख पद मिळवून ते नगरात मनसेचे नेतृत्व करण्याची तयारी करत असावेत, अशी चर्चा आहे. पण त्यांचा रूसवा हेरून भाजपने त्यांच्याभोवती फिल्डींग लावली आहे. दत्ताशेठनी मात्र कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही. आठवडाभरात ते निर्णय जाहीर करतील अशी माहिती त्यांचे समर्थक देताहेत.

मिसेस की मिस्टर
सुवर्णाताई जाधव यांची महापालिकेतील पहिलीच टर्म. सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी पात्रताही सिध्द केली. मात्र मिस्टर दत्ताशेठ यांना आता चान्स हवा. त्यामुळं ते स्वत:च्या तिकिटासाठी आग्रही आहेत. शिवसेनेकडून मात्र ‘मिसेस’साठी आग्रह सुरू आहे. शेठ भूमिका बदलायला तयार नाहीत. भले वार्ड बदलू, मनसेचाच पर्याय कायम ठेवू, पण मीच लढणार असा त्यांचा हेका कायम आहे. त्यामुळे महापालिकेच्या आखाड्यात मिसेस की मिस्टर हा पेच कायम आहे.

13 चा अट्टाहास
प्रभाग 13 मधून शेठला उमेदवारी हवी. सेनेने मात्र सुभाष लोंढे व गणेश कवडे यांना शब्द दिलाय. महिलेच्या जागेसाठीही विद्यमान नगरसेविका अनिता राठोड, सुनीता मुदगल यांनी दावा केलाय. त्यातच संतोष ग्यानाप्पा यांनीही आग्रह धरलाय. ही परिस्थिती पाहता शेठचा 13 साठी अट्टाहास असला तरी तो इंम्पॉसिबल असल्याचे बोलले जाते. कदाचित त्यांना 15 पर्याय दिला जाईल. पण त्यांनी नकार दिल्यास ते सेनेऐवजी तिसर्‍याच पक्षाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविली जातेय.

भाजपची गाडी रेडी
दत्ताशेठ जाधव यांचे कार्य, संपर्क पाहता भाजप त्यांना उमेदवारी देण्यासाठी तयारीत असल्याचे समजते. शिवसेनेने शेठला नकार देताच शेठ भाजपच्या गाडीत बसण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून त्यांना 13, 15 दोन्ही पर्याय देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता शेठ मनसेतून भाजपच्या गाडीत बसणार की शिवसेनेची गाडी चॉईस करणार याकडे नगकरांच्या नजरा लागून आहेत. मनसेच्या दुसर्‍या नगरसेविका वीणाताई बोज्जा यांनीही भाजपला पसंती दिल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*