दत्त जयंतीनिमित्त शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी

0
शिर्डी(शहर प्रतिनिधी)– दत्तजयंती उत्सवानिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली. दरम्यान तीन दिवस सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अचानकपणे साईंच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढल्यामुळे संस्थान प्रशासनासह शहर वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
दत्त जयंती उत्सवाला राज्याच्या काना कोपर्‍यातून मोठ्या प्रमाणावर शिर्डीत पालख्या दाखल होतात. त्यातच जोडून सुट्ट्या आल्याने भक्तांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले. गुरूवारी रात्रीपासूनच शिर्डीत वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी सुमारे 50 पेक्षा जास्त पालख्या दाखल झाल्याचे संस्थान प्रशासनाने सांगितले. या तीन दिवसांत साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
रविवारी दत्तजयंतीच्या दिवशी मंदिर आकर्षक फुलांच्या माळांनी सुशोभीत केले होते. दुपारी सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. गर्दीचा आढावा घेऊन वाहतुकीच्या नियोजना संदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने पुन्हा वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. साईभक्तांचा वेळ खर्ची गेल्याने मनस्ताप करायची वेळ ओढावली. सकाळपासूनच साईमंदिरापासून दोन्ही बाजूंनी जवळपास दोन किमी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
मंदिरपरिसरात दर्शनरांगा दिसत होत्या. रविवारी भल्या सकाळपासूनच वाहतुकीची तपासणी वाहतूक पोलीस करत असल्याचे दिसत होते. शिर्डी नगरपंचायतीच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेकांनी रोडलगत लावलेली दुकाने, पादचारी मार्गावर काहींनी उभ्या केलेल्या तीन आसनी रिक्षा तसेच हातगाडे यामुळे पायी चालणार्‍या भक्तांना याचा अडथळा होत होता. साईभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.यावेळी दिशादर्शक फलकाचा अभाव दिसून आला.

LEAVE A REPLY

*