श्रीक्षेत्र देवगडला भाविकांची मांदियाळी

0
देवगड येथे दत्त जन्म सोहळा प्रसंगी पाळणा ओढताना महंत भास्करगिरी महाराज.
धर्माची जोपासना करून देशाला बलशाली करा : भास्करगिरी

अंतर्मन स्वच्छतेसाठी संतांचे विचार कामी येतात : ना. हरिभाऊ बागडे

देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे काल रविवारी श्री दत्त जयंती निमित्त लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. यावेळी ‘दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती. दिवसभरात सुमारे सात लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
श्री दत्तजयंती निमित्त श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. तालुक्यातील अनेक गावांच्या दिंड्या देवगड येथे दाखल झाल्या होत्या.
श्री दत्तजन्माच्या वेळी सायंकाळी ‘दिगंबरा…दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिंगबरा’ या दत्तनामाचा गजर व पुष्पवृष्टी करीत दत्तजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी देवगडनगरी दत्तमय बनली होती. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने झालेल्या श्री दत्त जयंती निमित्त पहाटेच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान दत्तात्रेयांना भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.
पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगेचे रूपांतर नंतर मोठ्या दर्शनबारीत झाले. भाविकांना रांगेत व शिस्तीत दर्शन घेता यावे म्हणून नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या नेतृत्वाखाली सेवा देण्यासाठी सज्ज होते. तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी मंडळ व गुरुदत्त माध्यमिक विद्यालय व गुरुदास भास्करगिरी महाराज विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली.
श्री दत्तजन्मसोहळ्याप्रसंगी भास्करगिरी महाराज म्हणाले, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आशीर्वादाने हा सोहळा साजरा होत आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. देशात सर्व जात पंथ एकोप्याने राहावेत अशी प्रार्थना भगवान दत्तात्रेयांकडे करू. धर्माची जोपासना करून देशाला बलशाही करण्याचे काम सर्वानी करावे.
विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, देवगड येथे आल्यावर मनाला आत्मिक शांती मिळते. अध्यात्माची आवड वाढते. बाह्यरूप उजळण्यासाठी जसा साबण कामी येतो त्याचप्रमाणे अंतर्मन स्वच्छ होण्यासाठी संतांचे विचार कामी येतात.
यावेळी मंदिर प्रांगणाबाहेरील कीर्तन मंडपामध्ये सायंकाळी 6 वाजता जन्मसोहळा साजरा करण्यात आला. पुष्पांनी सजविलेल्या व्यासपीठावरील पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रेयांची मूर्ती ठेवण्यात आली होती. भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढ़ण्यात आली. नेवासा येथील सौ. माधुरी कुलकर्णी यांनी दत्तजन्माचा पाळणा म्हटला. त्यांना सौ. अरुणा जगताप, सौ. शुभांगी लोंढे, सौ.रुपाली रासने यांनी साथ दिली.
श्री दत्तजन्म सोहळयाच्या प्रसंगी सुनीलगिरी महाराज, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, आ. शिवाजीराव कर्डिले, माजी आ. अनिल राठोड, माजी आ. शंकरराव गडाख, भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, अ‍ॅड. सुनील चावरे, पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, निरीक्षक प्रवीण लोखंडे, औरंगाबाद युवा सेना प्रमुख संतोष माने, बाळासाहेब पाटील, बजरंग विधाते, कैलास झगरे आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य मंदिरासह समर्थ सदगुरु श्री किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिध्देश्‍वर मंदिर, मुख्य प्रवेशद्वारावर केलेली विद्युत रोषणाई उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरली.
देवगड येथे जणू मोठी यात्राच भरली होती. यात्रेत विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. दुकानदारांना व्यवसायासाठी संस्थानच्यावतीने जागेची व्यवस्था करण्यात आली होती.
नेवासा, नगर, श्रीरामपूर गंगापूर या आगरातून भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती. पहाटेपासून रात्रीपर्यंत दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीने मोठा उच्चांक केला होता.
नेवासा एसटी आगाराच्या वतीने गंगापूर, नगर, शेवगाव, तारकपूर, श्रीरामपूर, औरंगाबाद येथे जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती.

 

LEAVE A REPLY

*