दातीर पाटील पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण : पैसे न मिळाल्याने ठेवीदारांचे उपोषण सुरू

0
गणोरे (वार्ताहर) – येथील साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील पतसंस्थेच्या कथीत सव्वापाच कोटींच्या गैरव्यवहारानंतर ठेवीदार उपोषणाला बसल्याने स्थानिक पातळीवर प्रकरण मिटविण्याच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे. त्यात ठेवीची रक्कम आठ कोटी रुपये तर कर्जवितरण वसुली सुमारे साडेतीन कोटी रुपये असून सव्वापाच कोटी रुपये परत करण्याचे आव्हान संचालक मंडळापुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दातीर पाटील पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालावरून सुमारे सव्वापाच कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवलेल्या नागरीकांची रक्कम सुमारे आठ कोटी रूपये आहे. ठेवीदारांनी रक्कम परत मिळविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तगादा लावूनही संचालक मंडळ रक्कम देण्यात असमर्थ ठरल्याने अखेर अकोले तहसील समोर ठेवीदार उपोषणाला बसले आहेत.
अपहाराला जबाबदार कोण? हे निश्चित करून अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे ठेवीदारांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
उपोषणकर्त्यांनी ठेवीची रक्कम परत मिळावी, संस्थेच्या कारभाराची सीबीआय चौकशी करावी, संचालक मंडळ व कर्मचारी यांची नार्को चाचणी करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या केल्या आहेत.
त्या करिता रावसाहेब आंबरे, बाळासाहेब दातीर, सुखदेव भालेराव, बाजीराव आहेर, अशोक वाकचौरे, विठ्ठल उगले, जयराम शेळके, बाळासाहेब हिंगे, संजय आंबरे, अंबादास रेवगडे, केशव दातीर,
नामदेव आंबरे, विठ्ठल गोर्डे, नंदकुमार देशमुख, सोमनाथ सातपुते, परीघाबाई हिंगे, धोंडीबा दातीर, किरण आहेर, ऱखमाजी उघडे, विमल आहेर, नंदा आहेर आदी सामूहिक उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे या संदर्भाने प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठेवीदारांची रक्कम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत : दातीर – दातीर  संस्थेकडे असलेल्या ठेवी देण्यासाठी संस्था संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत. संस्थेचे संचालक मंडळ आणि नातेवाईक यांची रक्कम सुमारे अडीच कोटी रुपये ठेवी म्हणून संस्थेकडे आहेत. तर सुमारे साडेतीन कोटी कर्ज वितरण आहे. कर्ज वसूलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.ती रक्कम वसूल करून ठेवीदाराची रक्कम देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे. सध्या काही कर्जदार वसुली करण्यास सहकार्य करीत नसल्याचे चेअरमन भाऊसाहेब दातीर यांनी सांगितले. तर कर्जदारांवर कारवाई करण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रक्रीया गतिमान व्हावी या करिता प्रयत्न सुरू आहेत. ठेवीदारांनी सहकार्य केले तर निश्चितपणे रक्कम देण्याचा प्रयत्न यशस्वी होतील असेही दातीर यांनी सांगितले.

अपहारास जबाबदार कोण? – संस्थेत झालेल्या अपहारास कोण जबाबदार असा प्रश्न सध्या चर्चेला येत असून..त्याची जबाबदारी कोणावर निश्चित केली जाणार याकडे लक्ष लागले आहे. संस्थेच्या प्रत्येक कारभारास संचालक मंडळ कायदेशीरदृष्ट्या जबाबदार असले तरी अभिलेखे आणि प्रशासकीय कामकाज दैनंदिन स्वरूपात मंडळ पाहत नाही. वस्तुस्थिती जर संचालक मंडळास माहीत असती तर त्यांनी त्यांची गुंतवणूक तरी कशाला केली असती? अशी माहिती संचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे सहकारचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*