गणोरे येथील दातीर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण : नऊ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

0

 उपोषणाचा पाचवा दिवस

अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील गणोरे येथील कै.साथी सावळेराम दातीर पतसंस्थेच्या सभासद व ठेवीदारांनी अकोले तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण काल पाचव्या दिवशी सुरूच होते. नऊ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर बुधवार पासून ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अकोले दौर्‍यात आंदोलकांशी सवांद साधत त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. याप्रश्नी सहकार मंत्री व सहकार आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
संस्थेच्या 14 कोटी रुपयांच्या ताळे बंदापैकी सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे लेखा परीक्षणात समोर आले आहे. संस्थेचे सभासद व ठेवीदार असलेल्या 51 कुटुंब प्रमुखांनी दिनांक 1 ऑक्टोंबर पासून अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मुदत ठेव पावती वरील रकमा त्वरित मिळाव्यात,संस्थेचे लेखा परीक्षण सरकारी लेखा परिक्षका मार्फत करण्यात यावे,संस्थेच्या सर्व कारभाराची सी आय डी मार्फत चौकशी व्हावी, संचालक मंडळ व कर्मचारी यांची नार्को टेस्ट करावी आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
लहानु दातीर, शिवाजी दळवी, दत्तात्रय गुंजाळ, राजेंद्र आहेर, सुखदेव भालेराव, रावसाहेब आंबरे, संजय आंबरे, गणपत आंबरे व दादा आहेर या नऊ जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान तृप्ती देसाई यांनी काल आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्या महिला व पुरुषांशी चर्चा केली.तेथूनच त्यांनी सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांच्याशी चर्चा केली.
उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात आपण सहकार मंत्री व सहकार आयुक्त यांची भेट घेऊ असे त्यांनी सांगितले. खरे तर येथे उपोषण करून काही उपयोग होणार नाही त्यामुळे संचालकांच्या घरावर मोर्चे काढून त्यांच्या घरासमोर बसल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही असा सल्लाही देसाई यांनी उपोषणकर्त्यांना दिला. जिप चे सदस्य डॉ किरण लहामटे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालु दळवी ,युवा नेते सतीश भांगरे आदींनी काल उपोषण कर्त्यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविला.
उपोषणकर्त्यांत विद्यमान संचालिका सीताबाई रामनाथ दातीर यांचाही समावेश आहे. त्यांचा मुलगा किरण हा आईचे संस्थेत असणारे पैसेे मागण्यासाठी गेला असता त्यास संचालक मंडळाने मारहाण केल्याचा उपोषणकर्त्यार्ंंचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

*