नेवाशात बनावट दारूचा पर्दाफाश

0

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आरोपी पळून जाण्यात यशस्वी

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तरवडी येथील बनावट दारूमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडलेली असतानाच अजूनही तालुक्यात बनावट दारू आढळून येत आहे. पाचेगाव शिवार तसेच नेवासा शहर परिसरात सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवार व गुरुवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे साडेपाच लाखांची बनावट दारू जप्त केली. या कारवाईत आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजीत माने यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणूक, नाताळ व जवळ आलेल्या 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर परराज्यातील मद्य, बनावट वाहतूक विक्री होण्याची शक्यता असल्याने विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, नगर जिल्हा अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा भागात खबर्‍यामार्फत गुप्त माहिती काढून दोन दिवसांपासून पाचेगाव शिवारात परराज्यातील दारू येणार असल्याची खबर लागल्याने या पथकाने पाळत ठेवून सय्यद वस्तीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास

छापा टाकला असता 192 बॉक्स 750 मिली लीटरच्या एकूण 2304 बाटल्या असा एकूण चार लाख 70 हजार 16 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. या गुन्ह्यातील आरोपी अकील रफिक वहाब सय्यद व मनोज रायपल्ली पसार आहेत. याप्रकरणी पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. आर. कुसळे (श्रीरामपूर) हे करीत आहेत.
अवैध मद्य वाहतुकीवर पाळत ठेवून गस्त घालत असताना संशयित शेवाळी रंगाची मारुती हे वाहन नेवासाफाटा येथून नेवाशाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना तिचा पाठलाग केला असता वाहन चालक आपले वाहन विवेकानंदनगर येथील लाकडी सॉ मिलजवळ लावून पसार झाला.

या गुन्ह्यात मारुती 800 तसेच मॅकडॉल-1 व्हिस्की 180 मिलीच्या 240 बनावट व ऑफिसर चॉईस व्हिस्की 180 मिलीच्या 48 बनावट बाटल्या आढळून आल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी 85,640 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक बी. टी. घोरतळे, भरारी पथक क्रमांक-2 श्रीरामपूर विभाग हे करीत आहेत. दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे जवान श्री. एस. वाघ, आर. बी. कदम, बी. एम. चत्तर, वाहन चालक विजय पाटोळे हे सहभागी झाले होते.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*