निवृत्त कार्यकारी संचालकाच्या बंगल्यावर भरदिवसा दरोडा

0
सोने, रोकड लांबविली, राहुरी शहरातील घटना
राहुरी (तालुका प्रतिनिधी)– शहरातील राहुरी महाविद्यालयाजवळील एकनाथनगर येथे दरोडेखोरांनी अशोक सरमाने यांचा बंगला फोडून अडीच तोळे सोन्याचे दागिने व 35 हजाराची रोकड चोरून नेली. ही घटना काल सोमवारी (दि. 20) भरदुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याने शहरात दहशत पसरली आहे. दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात दरोडा पडल्याने राहुरी पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.
नांदेड व सिल्लोड कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक अशोक जगन्नाथ सरमाने यांचा राहुरी महाविद्यालयाजवळ एकनाथनगर या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बंगला आहे. अशोक सरमाने हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी नांदेड येथे गेलेले होेते. तर त्यांचा मुलगा सचिन व सून वर्षा या आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेले होते.
तर त्यांची दोन्हीही मुले सकाळीच शाळेत गेलेली होती. त्यामुळे घरात कोणीही नसल्याने बंगल्याला कुलूप लावण्यात आलेले होेते. नेमकी हिच संधी साधून दरोडेखोरांनी बंगल्याच्या दरवाजाचे कोयंडे हातोडीने तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील सामानाची व कपाटाची उचकापाचक करून त्यांंनी वर्षा यांच्या कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व 35 हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा अशोक सरमाने यांच्या खोलीकडे वळविला. तेथील सामानाची उचकापाचक करून आतील रोकड चोरून नेली. दरम्यान, तेथे किती रकमेची चोरी झाली? हे अशोक सरमाने बाहेरगावाहून आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, दुपारच्या सुमारास दोन्ही मुले शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांना बंगल्याचा दरवाजा व मुख्य गेट उघडे दिसले. त्यांनी ही घटना शेजार्‍यांना सांगीतली. शेजार्‍यांनी एकंदर घटनेचा कानोसा घेतल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची खबर राहुरी पोलिसांना दिल्यानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. दिवसाढवळ्या खुलेआम बंगल्यात चोरी करून दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांना आव्हान दिले असून शहरात घडलेल्या चोर्‍यांचा तपास तातडीने लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याच कॉलनीतील प्रा. शिंदे यांचा बंगला यापूर्वी फोडून धाडसी चोरी झाली होती. त्या घटनेचा तपास गुलदस्त्यातच राहिलेला असताना आता पुन्हा दिवसाढवळ्या चोरी झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून राहुरी पोलिसांच्या अकार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त केला आहे. 

LEAVE A REPLY

*